Cough Syrups: ज्याच्यापासून डिटर्जंट बनवतात, त्यापासूनच कफ सिरपचे उत्पादन! मॅरियन बायोटेकवर गंभीर आरोप, 19 मुलांचा झाला होता मृत्यू
Cough Syrups : भारतीय औषधी कंपनी मॅरियन बायोटेकवर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. या कंपनीच्या कफ सिरपमुळे उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांना प्राण गमवावे लागले होते.
Cough Syrups : गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरप प्यायल्याने 19 मुलांचा मृत्यू झाला होता. नोएडातील मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे कफ सिरप बनवले होते. आता रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे कफ सिरप तयार करण्यासाठी औषधी घटकांचा वापर करण्याऐवजी, विषारी इंडस्ट्रीयल-ग्रेड घटकांचा वापर करण्यात आला. या प्रकरणाशी संबंधित दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली.
माया केमटेककडून रासायनिक घटकांची खरेदी
वृत्तानुसार, मॅरियन बायोटेक (Marion Biotech) माया केमटेक इंडियाकडून (Maya Chemtech India) प्रोपलीन ग्लायकोल Propylene Glycol (PG) हे घटक खरेदी केले होते. परंतु एका सुत्रानुसार, मायाकडे फार्मास्युटिकल-ग्रेड घटकांची विक्री करण्याचा परवाना नव्हता. हे फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांमध्ये व्यापार करते.
नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले की, 'आम्हाला माहित नव्हते की मॅरियन त्याचा वापर कफ सिरप बनवण्यासाठी करणार आहे. आम्ही पुरवठा करत असलेले रासायनिक घटक साहित्य कोठे वापरले जात आहे हे आम्हाला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हा घटक डिटर्जंट बनवण्यासाठी वापरला जातो
दोन सूत्रांनी 'रॉयटर्स'ला सांगितले की कफ सिरप हे इंडस्ट्रीयल Propylene Glycol ग्रेडपासून बनवण्यात आले आहे. हा एक विषारी पदार्थ आहे ज्याचा वापर लिक्विड डिटर्जंट्स, अँटीफ्रीझ, पेंट्स, कोटिंग्जमध्ये तसेच कीटकनाशकांची परिणामकता वाढवण्यासाठी केला जातो.
आणखी एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "मॅरियनने व्यावसायिक दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकोल विकत घेतले होते." फार्मास्युटिकल उत्पादनांसाठी राष्ट्रीय मानकांनुसार इंडियन फार्माकोपिया-ग्रेड घेणे आवश्यक होते.
वापराआधी चाचणी नाही
तपासकामातील एका सुत्राने सांगितले की, मॅरियनने उझबेकिस्तानमध्ये विक्री करण्यात येणाऱ्या सिरपचा वापण्याआधी याची चाचणी घेण्यात आली नाही. भारतामधील नियमांनुसार, औषधे अथवा सौंदर्यप्रसाधने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी. त्यासाठी कंपन्या स्वत: जबाबदार आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने केली होती कारवाई
उत्तर प्रदेश सरकारने नोएडा येथील मॅरियन बायोटेक कंपनीचा परवाना निलंबित केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने मॅरियन बायोटेकने तयार केलेल्या एम्ब्रोल आणि डॉक-1 मॅक्स सिरपबाबत इशारा जारी केला होता.