(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India GDP: भारताचा आर्थिक विकास दर दुसऱ्या तिमाहीतही मंदावला, सलग चार तिमाहीमध्ये घसरणीचा ट्रेंड कायम
India GDP Data 2024: आर्थिक वर्ष 2024-25 मधील दुसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर घटला आहे. जीडीपीसंदर्भात सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
India GDP Data 2024 मुंबई : आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै -सप्टेंबर 2024 या कालावीत भारताचा आर्थिक विकास दर घटल्याचं समोर आलं आहे. भारताचा आर्थिक विकास या तिमाहीत 5.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.1 टक्क्यांवर होता. यंदाच्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक विकास दर 5.4 टक्के राहिला असून सलग चौथ्या तिमाहीत घसरणीचा ट्रेंड कायम आहे.
महागाईचा दर वाढल्यानं जीडीपीवर परिणाम
रिटेल अन्न धान्य क्षेत्रातील महागाईचा दर वाढल्यानं आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामगिरीमध्ये घसरण पाहायला मिळाल्याचा परिणाम जीडीपीच्या आकेडवारीवर पाहयला मिळाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देखील प्रगतीचा दर कमी केला होता. त्यामागील कारण महागाईचा दर वाढणं हे होतं.
2024-25 च्या पहिल्या तिमाहीत कशी स्थिती?
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जूनमध्ये जीडीपी 6.7 टक्के होता. जीडीपीची त्या तिमाहीतील आकडेवारी त्यापूर्वीच्या पाच तिमाहीमधील सर्वात कमी होती. आरबीआयनं 9 ऑक्टोबरला पतधोरण समितीच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा जीडीपीचा दर 7.2 टक्के राहिला आहे.
जीडीपीच्या दरात घसरण पाहायला मिळाली असली तरी 2024-25 च्या पहिल्या सहामाहीमध्ये म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सकल मूल्यवर्धन दर 6.2 टक्के दर राहिला आहे. हा दर गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सकल मूल्यवर्धन दर 7.7 टक्के होता.
उत्पादन क्षेत्राचा वेग मंदावल्यानं जीडीपीवर परिणाम
उत्पादन क्षेत्रातील वाढीचा वेग दुसऱ्या तिमाहीत 2.2 ट्क्यांवर आला आहे.खाणक्षेत्रात देखील नकारात्मक स्थिती पाहायला मिळाली. खाण क्षेत्रातील आर्थिक विकासाचा दर -0.1 टक्के राहिला.
कृषी क्षेत्रात काय स्थिती?
कृषी क्षेत्रातील वाढीच्या दरात गेल्या चार तिमाहींच्या तुलनेत चांगलं चित्र पाहायला मिळालं. या क्षेत्रातील जीडीपीचा दर 3.5 टक्के राहिला.
बांधकाम क्षेत्रात काय स्थिती?
बांधकाम क्षेत्रात देखील चांगली परिस्थिती राहिली. दुसऱ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्रातील विकासाचा दर 7.7 टक्क्यांवर पोहोचला.
सेवा क्षेत्रात कशी स्थिती राहिली?
सेवा क्षेत्रात देखील दुसऱ्या तिमाहीत स्थिती चांगली राहिली. सेवा क्षेत्राचा विकास दर 7.1 टक्के राहिला आहे. याचं कारण व्यापार हॉटेल, वाहतूक क्षेत्रातील 6 टक्के विकासदराचं पाठबळ राहिलं.
इतर बातम्या :