(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय व्यापाराच्या दृष्टीनं मोठी बातमी, नेपाळनं 'या' भारतीय मसाल्यांवर घातली बंदी, नेमकं प्रकरण काय?
भारतीय व्यापाराच्या (Indian Trade) दृष्टीनं एक मोठी बातमी समोर आलीय. आपल्या शेजारचा देश असलेल्या नेपाळने (Nepal) काही भारतीय कंपन्यांच्या मसाल्यावर बंदी (Ban on spices) घातली आहे.
Business News : भारतीय व्यापाराच्या (Indian Trade) दृष्टीनं एक मोठी बातमी समोर आलीय. आपल्या शेजारचा देश असलेल्या नेपाळने (Nepal) काही भारतीय कंपन्यांच्या मसाल्यावर बंदी (Ban on spices) घातली आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरने (Hong Kong and Singapore) देखील काही भारतीय मसाल्यांच्या ब्रँडवर बंदी घातली होती. त्यानंतर आता नेपाळने काही मसल्यांवर बंदी घातली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मसाल्यांच्या विक्रीवरही देशात बंदी
नेपाळमध्ये भारतातून अनेक वस्तूंची निर्यात केली जाते. पेट्रोल आणि डिझेलपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. पण नेपाळने आता भारतीय कंपन्यांच्या काही मसाल्यांवर बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळने केवळ भारतातून पाठवलेल्या काही मसाल्यांच्या उत्पादनांची आयातच थांबवली नाही, तर त्यांच्या विक्रीवरही देशात बंदी घालण्यात आली आहे. नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
नेमकी का घातली बंदी?
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कंपन्यांच्या काही मसाल्यांच्या ब्रँडमध्ये इथिलीन ऑक्साईड किंवा ईटीओ हा घटक आढळून आल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळं या मसाल्यांच्या खरेदीवर निर्बंध घातलेत. हाँगकाँग आणि सिंगापूरच्या बंदीनंतर शुक्रवारी नेपाळनेही दोन भारतीय मसाला कंपन्यांच्या 4 उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे. यामध्ये मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि मिक्स मसाला करी पावडर तसेच फिश करी मसाला यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. नेपाळच्या अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर, मिक्स मसाला करी पावडर तसेच फिश करी या 4 उत्पादनांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त इथिलीन ऑक्साईड आढळून आले आहे. त्यामुळं अन्न नियमन-2027 BS च्या कलम-19 अंतर्गत, या उत्पादनांच्या देशात आयात आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळच्या अन्न गुणवत्ता नियंत्रण युनिटनेही आयातदार आणि व्यापाऱ्यांना ही उत्पादने मागे घेण्यास सांगितले आहे.
भारतानं सुरु केली संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय काही मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरने बंदी घातल्यानंतर भारतात घडामोडींना वेग आलाय. भारताच्या अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केलीय. त्याचबरोबर भारतातील मसाल्यांच्या व्यवसायावर लक्ष ठेवणाऱ्या स्पाईसेस बोर्ड ऑफ इंडियाने काही कंपन्यांच्या उत्पादनांची चाचणी न करता निर्यात करण्यास नकार दिलाय. भारत हा जगातील सर्वात मोठा मसाल्याचा निर्यातदार देश आहे. मात्र आता काही देशांनी काही मसाल्यांच्या आयातीवर बंदी घातल्यानं भारतीय व्यापाराला काही प्रमाणात फटका बसत आहे.
महत्वाच्या बातम्या: