Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांना सरकारने दिली नववर्षाची भेट, व्याजदरात वाढ जाहीर; 'पीपीएफ'वर काय निर्णय झाला?
याआधीही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आले होते. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे.
Sukanya Samriddhi Yojana :सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारने नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी, योजनेचे व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आले आहेत. याशिवाय 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याज 7 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आले आहे. तथापि, इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. विशेषत: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF चे गुंतवणूकदार पुन्हा एकदा निराश झाले आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दुसऱ्यांदा वाढले
वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या कालावधीतील छोट्या बचत योजनांचे व्याजदरांचे पुनरावलोकन केलं आहे. छोट्या बचत योजनांमध्ये फक्त सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर बदलण्यात आले आहेत. विशेषत: मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या योजनेचा व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे. याआधीही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आले होते. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे.
या योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही
अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत बचत ठेवींवर 4 टक्के व्याज मिळेल. 1 वर्षाच्या ठेवीवर 6.9 टक्के व्याज, 2 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7 टक्के व्याज आणि 5 वर्षांच्या ठेवीवर 7.5 टक्के व्याज मिळेल. 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींवर 6.7 टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 7.7 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.5 टक्के व्याज मिळेल आणि ते 115 महिन्यांत परिपक्व होईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर या तिमाहीत 8.2 टक्के व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस मंथली इनकम अकाउंट स्कीममधील गुंतवणुकीवर 7.4 टक्के व्याज मिळेल.
पीपीएफ गुंतवणूकदारांमध्ये निराशा
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना केवळ 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. एप्रिल 2020 पासून PPF च्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या