Loan Apps : कर्जाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या ॲपवर गुगल प्ले स्टोअरची मोठी कारवाई, 2000 ॲप प्ले स्टोअरवरून हटवले
Loan Apps Banned : गुगल प्ले स्टोअरने (Google Play Store) कर्जाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या दोन हजार ॲपवर (Instant Loan Apps) कारवाई करत ते प्ले स्टोअरवरून हटवले आहेत.
Google Banned 2,000 Loan Apps : सध्याच्या काळात कर्ज अर्थात लोन (Loan) मिळवणं सोपं झालं आहे. ऑनलाईन कर्ज मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये तुम्हाला अगदी काही तासांमध्येही कर्ज (Instant Loan) उपलब्ध होतं. मात्र याचा फायदा घेत काही बनावट कर्ज देणाऱ्या म्हणजेच लोन ॲपकडून (Loan Apps) अनेकांचा फसवणूक होत असल्याचं समोर आलं होतं. हे इंस्टंट लोन ॲप्स (Instant Loan Apps) ग्राहकांना लुबाडत होते. त्यानंतर आता गुगल (Google) प्ले स्टोअरने अशा ॲपवर मोठी कारवाई केली आहे. गुगल प्ले स्टोअरने (Google Play Store) 2000 हून अधिक बनावट लोन ॲप्स प्ले स्टोअरवरून हटवत मोठी कारवाई केली आहे. या ॲप्सकडून अटी शर्थीचं उल्लंघन होत असल्याचं गुगलने म्हटलं आहे.
अपुरी माहिती देत ग्राहकांची फसवणूक
ॲपवर केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना गुगलने म्हटलं आहे की, गुगलकडून दोन हजार बनावट लोन ॲप्स हटवण्यात आले आहेत. या ॲप्सकडून गुगलच्या अटी आणि शर्थींचं उल्लंघन होत असल्याचं आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या ॲप्सकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती. हे ॲप्स अनेक माहिती लपवत असल्याचं समोर आलं आहे. हे ॲप्स ग्राहकांना अपुरी माहिती देत त्यांची फसवणूक करत होती.
गुगलने प्ले स्टोअरवरून 2000 हून अधिक ॲप्स हटवले
गुगलने प्ले स्टोअर (Google Play Store) वरून दोन हजारहून ॲप्स हटवले आहेत. या ॲप्सवरून ग्राहकांना कर्जाच्या विळख्यात अडकवलं जात होतं. नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यामुळे गुगल कंपनीने जानेवारी महिन्यापासून प्ले स्टोअरवरून अनेक ॲप्स काढून टाकले आहेत. यासोबतच गुगलने असंही म्हटलं आहे की, अनेक ॲप्स त्यांची माहिती लपवतात आणि अपुरी माहिती देत खुलासा करत नाहीत, अशा ॲप्सवरही कारवाई करण्यात आली आहे. माहिती लपवणे हे गुगलच्या धोरणाचं स्पष्ट उल्लंघन मानलं जाईल आणि अशा कर्ज देणाऱ्या या ॲप्सवर पुढेही कारवाई करण्यात येईल.
गुगलकडून युजर्सच्या सुरक्षेला प्राधान्य
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलचे एशिया पॅसिफिक क्षेत्राचे वरिष्ठ संचालक आणि ट्रस्ट आणि सेफ्टी हेड सॅकत मित्रा यांनी सांगितलं आहे की, गुगल कंपनी योग्य ऑपरेशनसाठी बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. गुगल नेहमीच युजर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा आणि सायबर गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. गुगल कंपनी आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारसोबत मिळून उपाययोजना करत आहे.
कोरोनाकाळात नोंदणी नसलेल्या ॲप्सची संख्या वाढली
कोरोनाच्या काळात जगभरासह देशातही आर्थिक संकट निर्माण झालं होतं. या काळात लोकांना पैशाची चणचण होती. त्यामुळे नोंदणी नसणाऱ्या कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं दिसून आलं. लोकांना कर्ज दिल्यानंतर हे ॲप त्यांच्याकडून 200 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारत होते. या ॲप्सच्या कर्जाच्या जाळ्यात अडकून अनेकांनी आत्महत्याही केल्याचं समोर आलं आहे. या ॲप्सच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांना या अनोंदणीकृत लोन ॲप्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. RBIने कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या ग्राहकांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं आहे.