Gold Silver Rates Today: 24 तासांत सोन्यात 2940 रुपयांची वाढ! चांदी 9 हजारांनी वाढली, ग्राहकांची द्विधा, सोनं 10 ग्रॅममागे किती?
तीन दिवसांतच सोन्याचे दर सुमारे 5,000 रुपयांनी वाढले आहेत, ज्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघेही ‘थांबावं का, विकत घ्यावं का?’ या द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.

Gold Rates Today: दिवाळीच्या तोंडावर घसरणाऱ्या सोन्याच्या दरानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचा बाजार तेजीत झळकतोय. काही दिवसांपूर्वीच सोन्याचे दर 1,30,000 रुपयांवरून थेट 1,20,000 रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र आता या दरात पुन्हा वाढ होत असून, गेल्या 24 तासांत तब्बल 2,600 रुपयांची उसळी नोंदवली गेली आहे. सध्या जीएसटी वगळता सोन्याचे दर 1,26,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. (Gold Prices)
सोन्याच्या या जलद वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून बाजार विश्लेषकांनी सोन्याचे दर आणखी खाली येतील, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्षात त्याच्या उलट परिस्थिती दिसून आली आहे. केवळ तीन दिवसांतच सोन्याचे दर सुमारे 5,000 रुपयांनी वाढले आहेत, ज्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघेही ‘थांबावं का, विकत घ्यावं का?’ या द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.
Gold Today: सोन्याचा भाव नेमका किती?
बुलीअन्स असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्रॅम किंमत 1 लाख 27 हजार 170 रुपये सुरु आहे. 24 तासांपूर्वी हा दर 1 लाख 24 हजार 230 रुपये एवढा होता. म्हणजे जवळपास 2940 रुपयांची वाढ झालीय. तोळ्यामागे सोन्याचा भाव 148,329 रुपये गेलाय. चांदीचा दर किलोमागे 165,090 रुपयांवर आहे. काल किलोमागे चांदीचा दर एक लाख 56 हजार 10 रुपयांवर होता. म्हणजे 9 हजार रुपयांची वाढ आहे.सोन्याचा हा ‘चढता दर’ बाजारात नव्या उत्सुकतेचा आणि संभ्रमाचा विषय बनला आहे. विश्लेषकांच्या मते, पुढील आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींवर सोन्याचे भाव अवलंबून राहणार आहेत.
सोन्याच्या किमतींमध्ये वाढ कशाने?
सोन्याच्या या वाढीमागे अनेक कारणं असल्याचं विश्लेषक सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने आयात होणारं सोनं अधिक महाग पडलं आहे. त्याचबरोबर, मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदर धोरणातील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळण घेतले आहे.
भारतात पारंपरिकरित्या सोन्याची मागणी सण-उत्सव आणि लग्नसराईच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर वाढते. दिवाळीनंतरही लग्नांचा हंगाम सुरू असल्याने बाजारात मागणी कायम आहे. या वाढत्या मागणीचा परिणामही दरांवर झाल्याचे ज्वेलर्स सांगतात. दरम्यान, सोन्याच्या दरातील या सततच्या चढ-उतारामुळे छोट्या गुंतवणूकदारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अनेकांनी दिवाळीच्या काळात घसरणीच्या काळात खरेदी केली असली, तरी सध्या वाढलेले दर पाहून नफा घ्यावा का, आणखी थांबावं का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
























