Crude Oil Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ; 123 डॉलर प्रति बॅरल पार
Crude Oil Price : 8 मार्चनंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे भाव 123 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे.
Crude Oil Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा 123 डॉलर प्रति बॅरल पार झाले आहेत. 8 मार्चनंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे भाव 123 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. अमेरिकेतील वाढती मागणी आणि चीनमध्ये कोव्हिडच्या नियमात शिथीलता आल्यानंतर अनेक शहरं खुली होतायत, त्याच पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ
रशियन तेलावर निर्बंध लादल्यानंतर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, ओपेक संघटनांकडून तेलाच्या मागणीची पुर्तता होत नसल्यानं बाजारातील पुरवठ्यात घट, तर मागणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आरबीआयकडून कालच स्पष्ट करण्यात आलंय, भारताला तेलाचे भाव वर्षभर १०५ डाॅलर प्रति बॅरलनं खरेदी करावं लागू शकतं, आधी हा अंदाज 100 डॉलर प्रति बॅरल होता
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम
कच्च्या तेलाच्या किमतींवरून जगभरात गोंधळ सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्याचे भाव गगनाला भिडले. हे युद्ध सुरू झाल्यानंतरच कच्च्या तेलाची किंमत 139 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचली होती, दरम्यान, सौदी अरेबियाने उचललेल्या या पाऊलामुळे आशियाई देशांच्या अडचणी वाढल्या आहेत. वास्तविक, जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदार देशाने आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ केली आहे.
सौदी अरेबियाच्या निर्णयामुळे भारताला झटका
जुलै महिन्यासाठी, आशियाई देशांसाठी अरब लाइट क्रूड ऑइलची अधिकृत विक्री किंमत (OSP) जूनच्या तुलनेत प्रति बॅरल $ 2.1 ने वाढली आहे. उन्हाळ्यात तेलाची मोठी मागणी पाहता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे भारतालाही मोठा झटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे, कारण भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. जरी विश्लेषकांनी आधीच सौदी अरेबियाच्या अशा हालचालीचा अंदाज लावला होता, परंतु त्यांना कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे $ 1.5 ची वाढ अपेक्षित होती. जी वाढ करण्यात आली आहे ती यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका 'या' देशांना बसणार
जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामकोने जुलैमध्ये तेलाचे उत्पादन दररोज 6,48,000 बॅरलने वाढवण्याचा ओपेक प्लस देशांमधील करार असतानाही हा निर्णय घेतला आहे. यामुळे आशियाई देशांच्या समस्या वाढल्या आहेत. आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा सर्वात जास्त परिणाम भारत आणि चीनवर होणार आहे. जरी भारत आणि चीन सतत रशियन तेल खरेदी करत आहेत. सौदी अरामकोने रविवारी रात्री कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ केली. मात्र, अमेरिकेसाठी कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.