(Source: ECI | ABP NEWS)
Kailas Kuntewad KBC : पैठणवरुन KBC पर्यंत कसे पोहोचले, 1 कोटीचा प्रश्न का सोडला, 50 लाख जिंकलेल्या शेतकऱ्याची जबरदस्त कहाणी
Kailas Kuntewad KBC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कैलास कुंटेवाड यांनी "कौन बनेगा करोडपती"मध्ये 50 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे.

Kailas Kuntewad KBC : "मनात काही करून दाखवायचं असेल, तर परिस्थितीची बंधनंही हार मानतात." ही ओळ सार्थ ठरवणारा एक शेतकरी युवा यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) पैठण (Paithan) तालुक्यातील तांडा बुद्रुक गावातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड (Kailas Kuntewad) यांनी "कौन बनेगा करोडपती" (Kon Banega Karodpati) या देशातील सर्वात मोठ्या क्विझ शोमध्ये 50 लाख रुपयांचं बक्षीस जिंकून साऱ्यांना अचंबित केलं आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन करत असलेल्या 'केबीसी'च्या 17 व्या सीझनच्या मंगळवारच्या भागात कैलास कुंटेवाड हॉटसीटवर विराजमान झाले. एकामागून एक 14 प्रश्नांची अचूक उत्तरं देत त्यांनी थेट 50 लाख रुपयांचं बक्षीस आपल्या नावावर केलं. कैलास कुंटेवाड यांचं फक्त दोन एकर कोरडवाहू शेतीचं उत्पन्न हेच त्यांच्या कुटुंबाचं मुख्य आधार. आर्थिक परिस्थितीमुळे बारावी नंतर शिक्षण थांबलं, पण शिकण्याची ओढ मात्र कायम राहिली. त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर यूट्यूब आणि पुस्तकांच्या माध्यमातून सामान्य ज्ञान वाढवलं, आणि केबीसीमध्ये जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. 'कोण बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होण्याचा कैलास यांनी तीन वेळा प्रयत्न केला. पहिल्या दोन वेळेस अपयश आलं, पण खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हॉटसीटपर्यंतची मजल मारली. आपल्या ठाम इच्छाशक्तीने त्यांनी हा क्षण सोन्यासारखा जिंकला. केबीसीमध्ये तब्बल 50 लाख रुपये जिंकण्यासाठी कैलास कुंटेवाड यांनी केलेल्या मेहनतीबाबत त्यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे. तर 1 कोटी रुपयांचा प्रश्न का सोडला? याबाबत देखील त्यांनी भाष्य केलंय.
Kailas Kuntewad KBC : सहा-सात वर्षांपासून प्रयत्न
तुम्ही केबीसीपर्यंत पोहोचले कसे? याबाबत विचारले असता कैलास कुंटेवाड म्हणाले की, केबीसी हे सर्वसामान्यांसाठी असलेले व्यासपीठ आहे. त्याला कुठलीही फीज वगैरे लागत नाही. आपल्या ज्ञानाच्या बळावर येथे पोहोचावे लागते. जवळपास पाच फेऱ्या पूर्ण कराव्या लागतात. पाच फेऱ्यात यशस्वी झाल्यानंतर तुमची निवड होते. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो. यंदा 2025 साली मला यश मिळाले, असे त्यांनी म्हटले.
Kailas Kuntewad KBC : यूट्यूब आणि पुस्तकांच्या माध्यमातून सामान्य ज्ञान वाढवलं
तुम्ही इतका अभ्यास कसा केला? असे विचारले असता कैलास कुंटेवाड म्हणाले की, माझी स्मरणशक्ती इतकी पक्की आहे की, 1995 सालापासून मी शाळेत जे काही शिकलो आहे ते मला आज देखील लक्षात आहे. माझ्यावर भगवंताची कृपा आहे असेच मला म्हणता येईल. दोन-तीन वेळेस वाचन केले की ते माझ्या कायम लक्षात राहते. त्यानंतर आता youtube वरून मी जास्तीत जास्त जनरल नॉलेजचे व्हिडिओज पाहत असतो. मी केबीसीचे मंच टारगेट ठेवले होते. त्यासाठी जितका अभ्यास करता येईल तितका मी करत होतो, असे त्यांनी सांगितले.
Kailas Kuntewad KBC : धोका न पत्करता 50 लाखांचे बक्षीस स्वीकारले
केबीसीचे प्रश्न कसे होते? हे याबाबत विचारले असता कैलास कुंटेवाड म्हणाले की, एखादा विषय आपल्याला येत असला आणि तो किती अवघड असला तरी तो आपल्याला सोपा वाटतो. मात्र एखादा विषय सोपा असेल आणि आपल्याला येत नसेल तर तो आपल्याला अवघड वाटतो. चौदाव्या प्रश्नापर्यंत केवळ एकच लाईफलाईन मला लागली. 1 कोटी रुपयांच्या पंधराव्या प्रश्नाला दोन लाईफलाईन माझ्याकडे शिल्लक होत्या. मी त्या दोन्हीही लाईफलाईन वापरल्या. परंतु तो प्रश्न मी कधीच वाचलेला नव्हता. त्यामुळे मी धोका न पत्करता तो प्रश्न सोडून दिला आणि 50 लाखांचे बक्षीस स्वीकारले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा

























