(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautam Adani: एका अहवालाचा फटका, अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण; गौतम अदानींची संपत्ती सात अब्ज डॉलरने घटली
Gautam Adani: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, उद्योजक गौतम अदानी यांना एकाच दिवसात सुमारे 50 हजार कोटी गमवावे लागले आहेत.
Gautam Adani : आज, बुधवारी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. या घसरणीत अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी समूहाच्या 9 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या घसरणीमागे एक अहवाल कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. आज झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेतील Hindenburg Research LLC ने अदानी समूहाबाबत जाहीर केलेल्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअरवर परिणाम झाला असल्याचे म्हटले जात आहे.
अदानी समूहाकडून अदानी एंटरप्रायझेजचा 2000 कोटींचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफर खुला होणार आहे. त्याआधीच Hindenburg Research LLC चा अहवाल समोर आला. या अहवालानंतर आज शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट
आज अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनादेखील बसला. अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. एकाच दिवसात अदानी यांच्या संपत्तीत 6.5 अब्ज डॉलरची (सुमारे 54000 कोटी रुपये) घट झाली. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती 5.17 टक्क्यांनी घटून ती 119.1 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
Hindenburg Research च्या अहवालात काय म्हटले?
Hindenburg Research ने आपल्या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो असे या अहवालात म्हटले. त्याशिवाय, अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार आणि इतर प्रकार केले असल्याचा आरोप केला आहे. अदानी समूहाने मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा दावा केला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर अधिक असून मूल्यांकनापेक्षा सुमारे 85 टक्के अधिक दर आहेत.
कोणत्या कंपनीत किती टक्के घसरण?
अदानी समूहातील अदानी पोर्टसच्या शेअर दरात 6.10 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, अदानी ट्रान्समिशनमध्ये 5.69 टक्के, अदानी टोटल गॅस 4.72 टक्के, अदानी पॉवरमध्ये 4.75 टक्के, अदानी विल्मरच्या शेअर दरात 4.97 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 3.67 टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 1.57 टक्क्यांची घसरण दिसून आली. अदानी समूहाने नुककेच खरेदी केलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअर दरात 8.14 टक्के आणि एसीसीच्या शेअर दरात 7.11 टक्क्यांची घसरण दिसून आली.
अदानी समूहाने काय म्हटले?
अदानी समूहाने Hindenburg Research च्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले. अदानी समूहाचे ग्रुप सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी म्हटले की, हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाशी कोणतीही चर्चा न करता, कोणतीही तथ्ये न तपासता हा अहवाल प्रकाशित केला असल्याचे म्हटले. अदानी समूहाची बदनामी करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.