Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
UIDAI नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' पोस्ट करुन आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवल्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे. नव्यानं देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. आधार कार्ड जारी करणाऱ्या यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं यासंदर्भातील अपडेट दिली आहे. यूआयडीएनं दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड धारकांसाठी ही सुविधा वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड धारक आता 14 जून 2026 पर्यंत कागदपत्रांच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करु शकतात. ही मुदत यापूर्वी 14 जून 2025 पर्यंत होती. आधार कार्ड मध्ये कागदपत्र अपडेट करण्यासाठी यूआयडीएआयकडून प्रोत्साहन दिलं जात आहे.
मोफत आधार कार्ड अपडेट कसं करायचं?
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी लोकांकडे एक मार्ग आहे. यूआयडीएआयनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. या माहितीनुसार मोफत आधार कार्ड अपडेटची सुविधा myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे ऑनलाईन पोर्टलद्वारे डेमोग्राफिक इन्फॉर्मेशनला अपडेट करता येऊ शकते.
सीएससी केंद्रावरुन अपडेटचा पर्याय
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पत्ता पुरावा, ओळखीचा पुरावा या संदर्भातील कागदपत्रं अपलोड करता येतील. यूआयडीएआयनं स्पष्ट केलं की आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी एका वर्षांची मदत देण्यात आली आहे. मात्र, मर्यादित सुविधा फक्त ऑनलाईन अपडेट करता येतील. एखाद्या आधार कार्ड धारकाला बायोमेट्रिक अपडेट करायचं असेल तर त्यासाठी शुल्क द्यावं लागेल. यासाठी त्याला जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जावं लागेल.
बायोमेट्रिक अपडेट ऑनलाईन करता येत नाही. त्यामुळं ते आधार सेवा केंद्रावर जाऊन करता येईल. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही 1947 या टोल फ्री क्रमांकावर फोन करु शकता. याशिवाय help@uidai.gov.in ला ईमेल देखील करु शकता.
10 वर्षात आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक
सरकारनं काही महिन्यांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर ते अपडेट करु शकता. त्यानंतर सरकारनं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोफत सेवा सुरु केली. नियमानुसार एखाद्या व्यक्तीला त्याचं आधार कार्ड 10 वर्षात अपडेट करावं लागेल. बाल आधार म्हणजेच मुलांचं आधार कार्ड 5 वर्ष ते 15 वर्ष या दरम्यान अपडेट करावं लागेल.
























