Zomato : 'झोमॅटो'चा आफ्रिकेतून गाशा गुंडाळण्याचा निर्णय
Zomato : झोमॅटो कंपनीसाठी परदेशातील कमाई ही तोकडी राहिली आहे. त्यामुळेच सिंगापूर, युकेनंतर आता दक्षिण आफ्रिकेतील शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Zomato : फूड डिलिव्हरी असलेली कंपनी झोमॅटोने दक्षिण आफ्रिकेतून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बीएसईकडे दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटो साऊथ आफ्रिका प्रोप्रायटरी लिमिटेडची नोंदणी 3 जानेवारी 2022 पासून रद्द करण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्येच कंपनीने डिझोलेशनची प्रक्रिया सुरू केली होती. कंपनीने गेल्या वर्षी जो अहवाल सादर केला होता त्यानुसार साऊथ आफ्रिकेत कंपनीला हवा त्या प्रमाणात बिझनेस मिळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणची शाखा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. परंतु साऊथ आफ्रिकेतील शाखा बंद झाल्यामुळे कंपनीच्या उलाढालीवर अथवा महसूलावर परिणाम होणार नाही असा दावा कंपनी प्रशासनाने केला आहे.
गुरुग्रामस्थित कंपनीने सिंगापूर आणि युनायटेड किंगडममधील जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय उपकंपन्या बंद केल्या आहेत. ऑगस्टमध्ये, झोमॅटोने आपली यूएसचीही उपकंपनी बंद केली आणि नेक्स्टटेबल इंक मधील आपला हिस्सा विकला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीने अशा पद्धतीने विविध देशांतील कामकाज बंद करणे हा "क्लिनिंग अपचा" एक भाग असल्याचं म्हटलं आहे. सध्या, झोमॅटोची UAE उपकंपनी सुरू आहे. ऑगस्ट 2021 मध्ये दाखल केलेल्या तिमाही कमाईच्या अहवालानुसार, यूएई आणि काही इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून झोमॅटोने 31 कोटी रुपये कमावले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीचा विस्तार वाढवण्याकडे एक संधी म्हणून झोमॅटोने पाहिले होते. परंतु परदेशातील कमाई नेहमीच कंपनीसाठी तोकडी राहिली.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात बेंचमार्क S&P BSE सेन्सेक्स 0.02% घसरून 61,223.03 अंकांवर असतानाही झोमॅटोचे शेअर्स बीएसईवर 0.41% वाढून प्रत्येकी 133.40 रुपये झाला.
आता कंपनीच्या या निर्णयानंतर मुंबई शेअर बाजारातील झोमॅटो शेअर्सच्या किंमतीच्या बाबत काय घडामोडी घडतात याकडे अर्थविश्वाचं लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Vedanta Group : वेदांता कंपनीची सौदी अरेबियात खनिज क्षेत्रात गुंतवणुकीची योजना
- Davos Agenda 2022 : WEF ची दावोस आर्थिक परिषद 17 जानेवारीपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha