तीन मोठे आयपीओ सूचिबद्ध होणार, गुंतवणूकदारांवर पडणार पैशांचा पाऊस?
सध्या शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. 10 जुलै रोजी एकूण तीन कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत.
मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स थेट 80 हजार अंकांच्या पुढे गेला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टी 50 नेही 24400 चा आकडा पार केलाय. सध्याच्या या तेजीत अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अशा तीन कंपन्यांचे आयोपीओ आले होते. या तिन्ही कंपन्या आता 10 जुलै रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. या तिन्ही कंपन्याच्या आयपीओंना ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या आयपीओंत गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार परतावा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एफ्वा इंफ्रा आयपीओला चांगला प्रतिसाद
10 जुलै रोजी एफ्वा इंफ्रा (Effwa Infra), एमक्युअर फार्मा (Emcure Pharma) आणि बन्सल वायर (Bansal Wire) हे तीन आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. या आयपीओंत गुंतवणूक करणाऱ्यांना यावेळी चांगला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एफ्वा इन्फ्रा या आयपीओची ग्रे मार्केटमधील किंमत प्राईस बँडपेक्षा 146 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीने आपला किंमत पट्टा 78-82 रुपये निश्चित केला होता. ग्रे मार्केटमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता हा आयपीओ शेअर बाजारावर रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. हा आयपीओ 133 पटीने सबस्क्राईब करण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनीही या आयपीओत मोठी गुंतवणूक केली आहे. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 224 कोटी रुपये उभे करणार आहे.
एमक्युअर फार्मा आयपीओ देऊ शकतो बम्पर रिटर्न्स
एमक्युअर फार्मा ही कंपनीदेखील 10 जुलै रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. या कंपनीचा आयपीओ 67 पटीने सबस्क्राईब करण्यात आला आहे. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओलाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे आता शेअर बाजारावर प्रत्यक्ष सूचिबद्ध झाल्यावर आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बन्सल वायरचीही ग्रे मार्केटवर चांगली कामगिरी
बन्सल वायर या आयपीओलाही गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्येही ही कंपनी चांगली कामगिरी करत आहे. या कंपनीने आपल्या आयपीओचा किंमत पट्टा 256 रुपये ठेवला होता. मंगळवारी या कंपनीचा जीएमपी 77 रुपये प्रीमियम वर होता. त्यामुळे या कंपनीचा शेअर भांडवली बाजारावर 333 रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
'या' कंपनीने राहुल गांधींना केलं मालामाल, शेअर्सची संख्या 20 पटीने वाढली!
जीम ते फुटविअर, हॉटेल ते फिल्म प्रोडक्शन, महेंद्रसिंह धोनीचा गुंतवणूक फंडा काय? वाचा सविस्तर!