(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! भारत प्रथमच 'या' 4 देशांमध्ये साठवणार कच्चे तेल, आणीबाणीच्या स्थितीत साठे तयार करण्याचा निर्णय
सध्या भारत सरकार देशाबाहेर कच्च्या तेलाचा साठा (Crude Oil) करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
Crude Oil News: भारत (India) आपल्या उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवर (Import of Crude Oil) अवलंबून आहे. तसेच इतर देशांबरोबर हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तेलाचे साठा वाढवण्याचा प्रयत्न भारत करत आहे. सध्या भारत सरकार देशाबाहेर कच्च्या तेलाचा साठा (Crude Oil) करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
भारत 4 देशांमध्ये तेलाचे साठे तयार करणार आहे. यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये तेलाचे साठे तयार करण्याचा भारताचा विचार आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, देशाच्या हिताच्या अनुषंगाने साइट किती व्यावहारिक आहे, या घटकाचा विचार केला जाईल. स्ट्रॅटेजिक स्टोरेजसाठी जागा निवडताना, स्टोरेजचे भाडे वाहतुकीच्या खर्चापेक्षा जास्त होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल.
अमेरिकेसोबत करार झाला होता
भारत देशाबाहेर कच्च्या तेलाचा साठा करण्याचा पर्याय पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारताने अमेरिकेसोबत असा करार केला होता. 2020 मध्ये, भारत आणि अमेरिकेने स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह संदर्भात एक करार केला होता. या करारात अमेरिकेत भारतीय तेल साठवण्याच्या शक्यतांचाही विचार करण्यात आला होता. दरम्यान, आणीबाणीच्या स्थितीत कोणतीही अडचण निर्माण होऊन नये म्हणून भारताने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळं भारत परदेशात कच्च्या तेलाचे साठे तयार करण्याचा निर्णय घेत आहे.
भारतात किती तेलाचा साठा केला जाणार?
देशाबाहेर कच्च्या तेलाचे धोरणात्मक साठे निर्माण करणे हा देशाच्या दीर्घकालीन ऊर्जा गरजा सुरक्षित करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. भारतात सध्या 5.3 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा साठा करण्याची तरतूद आहे. यासाठी विशाखापट्टणम, मंगळुरु आणि पडूर येथे स्टोअर्स तयार करण्यात आली आहेत. चंडिखोल आणि पाडूरमध्येही नवीन साठे तयार केले जात आहेत, ज्यात 6.5 दशलक्ष टन कच्चे तेल साठवण्याची क्षमता असेल. सर्व देशांनी कच्च्या तेलाचा साठा त्यांच्या 90 दिवसांच्या निव्वळ आयातीइतका राखला पाहिजे. ही अट पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. सध्या, भारताच्या सामरिक साठ्यामध्ये 9.5 दिवसांच्या आयातीएवढा साठा आहे. तेल विकणाऱ्या कंपन्यांचा साठा जोडल्यानंतर तो 74 दिवसांच्या गरजेपर्यंत वाढतो. त्यामुळे कच्च्या तेलाचा धोरणात्मक साठा वाढवण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे.
महत्वाच्या बातम्या: