Donald Trump : गोंधळलेलं नियोजन, विश्वास ढासळण्यास सुरुवात, चीनबरोबर वाद, दुसऱ्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची अग्नीपरीक्षा सुरु
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ओळख मास्टर डीलमेकर अशी आहे. मात्र, यावेळी त्यांच्यापुढं मोठी आव्हानं आहेत. टॅरिफच्या मुद्यावर ते गोंधळलेले दिसतात.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षित अशा घटना घडताना दिसत नाहीत. ट्रम्प यांनी चीन सोबत व्यापार युद्धात जी अपेक्षा केली होती त्यापैकी काहीच घडत नसल्याचं दिसून येतंय. यावेळी ट्रम्प यांचा डाव त्यांच्यावर उलटल्याचं दिसतंय. ट्रम्प यांचे डाव केवळ राजकारणालाच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे देणारे ठरले. यामुळं ट्रम्प यांच्या प्रत्येक खेळीवर जगाचं लक्ष आहे.
ट्रम्प यांचं गोंधळलेलं नियोजन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 145 टक्के टॅरिफ लादलं आहे. ते म्हणत आहेत, हा त्यांच्या सविस्तर नियोजानाचा भाग आहे. मात्र, यामुळं जगभरातील बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत गोंधळलेली स्थिती आहे. व्हाइट हाऊसचे अधिकारी सर्व नियोजनाप्रमाणं सुरु असल्याचं सांगत आहेत. मात्र, कधी टॅरिफ लावणं, पुन्हा फोन आणि कॉम्प्युटरवर सूट देणे, पुन्हा म्हणणे त्यावर टॅरिफ लावणार यावरुन ट्रम्प प्रशासन गोंधळात असल्याचं दिसतं.
चीनचं संपर्क टाळण्याचं धोरण
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही. टॅरिफ संदर्भातील कपातीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेपुढं झुकायचं नाही हा चीनचा प्लॅन आहे. चीनसाठी हे व्यापार युद्ध त्यांच्या सार्वभौमत्व आणि जागतिक स्थितीशी संबंधित प्रश्न आहे. यामुळं जिनपिंग कोणत्याही स्थितीत झुकण्यास तयार नाहीत.
अमेरिका चीन वादात नुकसान कुणाचं?
ट्रम्प सरकारच्या दाव्यानुसार अमेरिका शक्तिशाली आहे. चीन जितकी निर्यात अमेरिकेला करतो तितकी निर्यात अमेरिका चीनला करत नाही. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते चीन सरकार आपल्या लोकांवर टाकण्यात आलेला आर्थिक दबाव स्वीकारु शकते. मात्र, अमेरिकेची जनता महागाई, तुटवडा आणि निवृत्तीच्या रकमेतील नुकसानाबाबत अधिक संवेदनशील आहेत. ते हे सहन करतील का हा प्रश्न आहे.
ट्रम्प यांचं रेटिंग घसरलं
अलीकडच्या सीबीएसच्या सर्वेनुसार ट्रम्प यांच्या अर्थव्यवस्था आणि महागाई सांभाळण्यासंदर्भातील रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. 60 टक्के लोक मानतात की ट्रम्प यांना महागाई नियंत्रणात आणता येत नाही. तर, 75 टक्के लोकांना वाटतं टॅरिफमुळं येणाऱ्या काळात किमती वाढतील. ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड त्यांच्यासाठी आपत्ती ठरण्याची शक्यता आहे. कारण ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात घर आणि खाद्यपदार्थांवरील खर्च कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं.
'डीलमेकर' ट्रम्प यांची परीक्षा
डोनाल्ड ट्रम्प स्वत: ला मास्टर डीलमेकर समजतात. यावेळी त्यांच्यापुढं कठीण आव्हान आहे. चीनसोबतचा संघर्ष आता राजकीय प्रतिष्ठा, जागतिक स्थिती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचला आहे. आता व्यापार युद्धात चीन जिंकणार की अमेरिका हे पाहावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी टॅरिफ वॉर अडचणीचं ठरणार हे पाहावं लागेल.



















