Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या दरवाढीसाठी आम्ही जबाबदार नाही, सौदी अरेबियाने हात झटकले!
Crude Oil Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या मुद्यावर सौदी अरेबियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Crude Oil Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत असल्याचे खापर आमच्यावर फोडू नये असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्याच्या परिणाम सौदी अरेबियातील तेल उत्पादनावर झाला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरात झालेली वाढ आणि तेल उत्पादन नियंत्रित करण्यासाठी ओपेक आणि इतर तेल उत्पादक देशांसोबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सौदी अरेबियाने ही भूमिका मांडली आहे.
जगभरात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेने इंधन दर नियंत्रित ठेवण्यासाठी राखीव साठा वापरण्याची घोषणा केली होती. सौदी अरेबिया सरकारची वृत्तसंस्था 'सौदी प्रेस एजन्सी'ने परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले की, हुती हल्लेखोरांच्या प्रतिकारासाठी आणि तेल उत्पादन आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात आले आहे. हुती हल्लेखोरांकडून सातत्याने हल्ले होत असल्याने सौदी अरेबियाच्या तेल उत्पादन आणि पुरवठा करण्याच्या उद्दिष्टावर परिणाम होत असल्याचे सौदी सरकारने म्हटले.
सोमवारी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 112 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक झाली होती. येमेनच्या हुती बंडखोरांनी रविवारी सौदी अरेबियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पावर हल्ले केले. यान्बु पेट्रोकेमिकल्स परिसरावर झालेल्या हल्ल्यामुळे तेल उत्पादनात तात्पुरती घट झाली होती.
भारतात इंधन दरवाढ
देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: