Diesel Price Hike : कोणत्या ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची दरवाढ! ही आहे यादी; सामान्यांवर काय परिणाम?
Diesel Price Hike : तेल कंपन्यांनी घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपये प्रति लिटर दराने वाढ केली आहे. या दरवाढीची झळ सामान्यांना बसणार का याची चर्चा सुरू आहे.
Diesel Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम आता भारतातील इंधन दरावरही होऊ लागला आहे. याआधी विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात दरवाढ झाल्यानंतर आता घाऊक प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 25 रुपयांची दरवाढ सहन करावी लागणार आहे. त्यानंतर हे घाऊक ग्राहक कोण आहेत, त्यांच्या दरवाढीचा परिणाम सामान्यांवर कसा होणार याची चर्चा सुरू आहे.
डिझेल घाऊक प्रमाणात खरेदी करणारे ग्राहक कोण ?
मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करणाऱ्यांचा समावेश घाऊक ग्राहकांमध्ये होतो. यामध्ये संरक्षण क्षेत्रातील विविध विभाग, भारतीय रेल्वे, परिवहन महामंडळे, ऊर्जा निर्मिती करणारे प्लांट, सिमेंट उत्पादक कंपन्या, रसायन निर्मिती करणारे आणि अन्य औद्योगिक उत्पादन कारखाने, विमानतळे, मॉल्स आणि अन्य औद्योगिक संस्थांचा समावेश घाऊक ग्राहकांमध्ये होतो. या संस्थांनी वाढीव दराने डिझेल खरेदी केल्यास त्याचा परिणाम उत्पादन, सेवांच्या दरावरही होण्याची शक्यता आहे.
दरवाढ का झाली ?
अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे तेल कंपन्यांवर दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. मात्र, या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांवर मोठा परिणाम होणार नाही.
घाऊक आणि किरकोळ ग्राहकांसाठी दर काय?
दिल्लीतील पेट्रोल पंपांवर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलची किंमत 115 रुपये प्रति लिटर झाली आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलची किंमत 28 रुपयांनी वाढली आहे.
मुंबईत घाऊक ग्राहकांसाठी प्रति लिटर डिझेलसाठी 122.05 रुपये मोजावे लागणार आहे. सामान्य ग्राहकांना पेट्रोल पंपावर डिझेल 94.14 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंप बंद होणार?
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या महिन्यात पेट्रोल पंपवरील इंधन विक्रीत मोठी वाढ झाली आहे. खासगी बस ऑपरेटर्स, मॉल्स सारखे मोठे घाऊक ग्राहक तेल कंपन्यांऐवजी थेट पेट्रोल पंपावरून इंधन भरत आहेत. त्यामुळे ऑइल रिटेलर्सचा तोटा आणखीच वाढला आहे.
घाऊक ग्राहक आता पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करत असल्याने Nayara Energy, Jio-bp , Shell सारख्या खासगी रिटेलर्सना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे अशा स्थितीत पेट्रोल, डिझेल 136 दिवस स्थिर दराने विकण्यापेक्षा पंप बंद करणे हा उत्तम पर्याय या कंपन्यांना वाटत असल्याचे 'पीटीआय'ने आपल्या वृत्तात म्हटले.