(Source: ECI/ABP News/ABP Majha)
china real estate : चीनमधील बँकिग व्यवस्था कोलमडणार? कारण....जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची बँकिंग व्यवस्था कधीही कोलमडण्याची शक्यता आहे.
china real estate : जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची बँकिंग व्यवस्था कधीही कोलमडण्याची शक्यता आहे. कारण चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील कर्जाची स्थिती बिकट झाली आहे. ही स्थिती चीनच्या बँकिंग व्यवस्थेसाठी धोकादायक ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चिनी बँकांनी वितरित केलेल्या एकूण कर्जांपैकी सुमारे 40 टक्के कर्जे फक्त रिअल इस्टेट कंपन्यांना देण्यात आली आहेत. आता बँकांसाठी ही समस्या बनली आहे. कारण अशा डझनभर कंपन्या आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्स आहेत ज्यांनी कर्ज अद्यापही माघारी दिलेलं नाही. चीनची सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी 'चायना एव्हरग्रेंड' ही सध्या जगातील सर्वाधिक कर्जबाजारी असणारी कंपनी आहे.
हे संकट अनेक वर्षांपासून निर्माण झाले
चीनमधील रिअल इस्टेट कंपन्यांचे कर्ज संकट एक-दोन दिवसांत उद्भवलेले नाही. तर अनेक वर्षांत ते या पातळीवर पोहोचले आहे. चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील या संकटाचे एक कारण म्हणजे प्रचंड कर्ज. याशिवाय मालमत्तेचा जादा पुरवठा आणि घरे आणि इतर मालमत्ता खरेदीच्या निर्णयापासून लोक मागे हटणे ही कारणे आहेत.
चीनमध्ये बँकिंग क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कर्जाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला पुढील अनेक वर्षांसाठी बँकांना बेलआउट पॅकेज द्यावे लागणार आहेत. चीन सरकारनेही यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आह., जसे की बँकांना कर्जदारांना रक्कम परत करण्यासाठी वेळ देण्यास सांगणे. यात धोका असला तरी सध्याचे संकट थोडे टळण्यास मदत होईल. चीनची स्थिती गंभीर आहे कारण तेथील संपूर्ण बँकिंग क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण आहे. लहान-मोठ्या प्रत्येक बँकेत चीन सरकारची हिस्सेदारी आहे.
बँकिंग व्यवस्था बुडेल
हाँगकाँगमधील ओरिएंट कॅपिटल या आर्थिक संशोधन संस्थेचे संस्थापक अँड्र्यू कॉलियर म्हणतात की जर चीन या कर्जाच्या संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरला तर तो मालमत्ता बाजारातील बुडीत कर्जाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावू शकणार नाही. त्यामुळे व्याजाचा खर्च वाढून अर्थव्यवस्थेला हानी पोहोचेल. त्याच बरोबर अशा गुंतवणुकीत भरपूर भांडवल गुंतवले जात राहील ज्याचे कोणतेही मूल्य नाही. असे संकट असूनही, चीनमध्ये रिअल इस्टेटच्या किमती कमी होण्याची आशा कोणालाही दिसत नाही. ज्यामुळं तिथं मागणी वाढू शकते. चीनमध्ये बँकेद्वारे मोठ्या प्रमाणात कंपन्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. याचा मोठा फटका बसत आहे.