राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत; फडणवीसांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2023: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आज अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Budget 2023: राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) आज शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिलावहिला अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. तसेच, महिलांसाठीही अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनं महिलांना सरसकट एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट दिली आहे. तर महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करण्याचीही घोषणा केली आहे.
कालच, महिला दिन साजरा करण्यात आला, राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता 'लेक लाडकी' ही नवी योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली.
महिलांच्या आरोग्यासाठी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत चार कोटी महिला आणि मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील, अशी घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. तसेच, बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल, अशी तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा :
- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
दरम्यान, महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून फडणवीसांचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अवकाळी पाऊस, नापिकी आणि शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, बजेटमध्ये बळीराजासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आला आहे. तसेच, महिलांसाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.