(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना फटका, अर्ध्या तासात बुडाले तब्बल 4.36 लाख कोटी!
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार चालू झाल्यानंतर बीएसई आणि एनएसई निर्देशांक चांगलेच गडगडले. यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे.
मुंबई : सध्या देशातील लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) आणि या निवडणुकीच्या निकालासंदर्भात असलेली अस्थिरता आणि महागाईचे येणारे आकडे याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बीएसई आणि एनएसई या दोन्ही निर्देशांकांत मोठी पडझड पाहायला मिळाली. बाजार चालू झाला तेव्हा मुंबई शेअर बाजार निर्देशांक (बीएसई) तब्बल 700 अंकांनी पडला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (निफ्टी) 22000 अंकांच्या खाली आला. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिग्गज कंपन्यांच्या शेअरचे मूल्य कमी झाले आहे. परिणामी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या साधारण 17 कोटी गुंतवणूकदारांचे साधारण 4.36 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
शेअर बाजार गडगडला
सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. बाजाराला सुरुवात झाली तेव्हा अवघ्या अर्ध्या घंट्यात बीएसई (सेन्सेक्स) 713.78 अंकांनी घसरून 71,950.69 अंकांपर्यंत आला. सध्या सेन्सेक्समध्ये 643.12 अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत असून हा निर्देशांक 72021.35 अंकांवर आहे. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सजेंच अर्थाक एनएसईमध्ये 181 अंकांची पडझड झाली असून 21,874.20 अंकावर पोहोचला आहे.
कोणते शेअर्स गडगडले?
नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर टाटा मोटर्सच्या शेअरर्समध्ये मोठी घसरण झाली. सध्या हा शेअर साधारण 9 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे. बीपीसीएलच्या शेअरमध्ये 2.80 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ओएनजीसी 2.18 टक्क्यांनी तर हीरो मोटर्स आणि कोल इंडिया यांच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर 1.30 टक्क्यांनी घसरला आहे. एसबीआयचा शेअरदेखील दीड टक्क्यांनी घसरला आहे.
गुंतवणूकदारांचे बुडाले 4.36 लाख कोटी
शेयर बाजार गडगडल्यामुळे अवघ्या आर्ध्या घंट्यात गुंतवणूकदारांचे तब्बल 4.36 लाख कोटी रुपये बुडाले. आज सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी बीएसईचे बाजार भांडवल 3,92,19,774.29 लाख कोटी रुपये होते. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर बीएसईचे बाजार भांडवल 3,96,56,440.83 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आज बाजार चालू झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे तब्बल 4.36 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
हेही वाचा :
ड्रीम कार घ्यायचीय पण पैसे नाहीत? चिंता सोडा 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून घरी आणा आवडती कार!
करोडपती व्हायचंय? मग एसआयपीमध्ये किती गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर!