सुप्त ज्वालामुखीच्या शेजारी सोन्याचा मोठा खजिना, एका झटक्यात होऊ शकतो पाकिस्तान श्रीमंत!
पाकिस्तान या देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. हा देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पैसे घेऊन देशाची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा देश आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत बदल व्हावा म्हणून या देशाने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडू कर्ज घेतलेले. मात्र तरीदेखील तेथील शासनकर्त्यांना या देशाची स्थिती सुधारण्यात अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. दरम्यान, या देशाच्या मनात आलेच तर तो एका झटक्यात श्रीमंत होऊ शकतो. कारण पाकिस्तानकडे शेकडो टन सोन्याचा खजीना आहे. हा खजीना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आहे.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात शेकडो टन सोनं आहे. याच सोन्याच्या मदतीने पाकिस्तान आपल्या डोक्यावर कर्ज फेडू शकतो. हे सोनं काही पाकिस्तानच्या तिजोरीत नाही. हे सोनं आहे बलुचिस्तानमध्ये. हा प्रदेश खनिजसंपत्तीने संपन्न आहे. याच भागात पृथ्वीच्या पोटात सोनं आहें. या भागात अनेक सोन्याच्या खाणी आहेत. यातीलच एक रेको दिक नावाची खाण आहे. या खाणीत सोने आणि तांबे हे धातू मोठ्या प्रमाणात आढळतात. याच खाणीत दडलेल्या सोन्याच्या जोरावर पाकिस्तान देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.
रेको दिक खाण पाकिस्तानला श्रीमंत करणार?
असं म्हणतात की पाकिस्तानमधील रेको दिक (Reko Diq) ही खाण जगातील सर्वांत मोठ्या सोने आणि तांबे या धातूच्या खाणींपैकी एक आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार ही खाण पाकिस्तानसाठी मोठा ठेवा आहे. खाणीत सोने आणि ताबे यांचे भांडार आहे. बलूचिस्तानच्या चगाई जिल्ह्यातील रेको दिक या गावाच्या परिसरात ही खाण आहे. या खाणीत शेकडो टन सोनं आहे, असं म्हटलं जातं. सोन्यासोबतच तांब्याचेदेखील या खाणीत मोठे भांडार असल्याचे सांगितले जाते. सध्यातरी या खनीज भांडाराच्या उपयोगाबद्दल कोणतेही ठोस वृत्त नाही. पण लवकरच पाकिस्तान या खनीज संपत्तीचा उपयोग करून कर्जातून मुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जाते.
खाणीत आहे शेकडो टन सोनं
मिळालेल्या माहितीनुसार Reko Diq Mine ही खाण सोने आणि चांदीचे भांडार आहे. याखाणीत एकूण 590 कोटी टन खनिज भांडार आहे, असे म्हटले जाते. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार प्रति टन खनिजामध्ये साधारण 0.22 ग्रॅम सोने तर 0.41 टक्के तांबे मिळू शकते. ही खाण इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमाभागात एका सुप्त ज्वालामुखीजवळ आहे. या खाणीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो.
1995 साली पहिल्यांदा उत्खनन
रेको दिक या खाणीमध्ये1995 साली पहिल्यांदा उत्खनन करण्यात आले होते. पहिल्या चार महिन्यात या खाणीतून 200 किलो सोने तसेच 1700 टन तांबे काढण्यात आले होते. या खाणीत जवळपास 40 कोटी टन सोनं असू शकतं, असा अंदाज तेव्हा व्यक्त करण्यात आला होता. या खाणीतील सोन्याचे किंमत अंदाजे दोन ट्रिलियन डॉलर्स असल्याचे म्हटले जाते. ब्लूमबर्गच्या मार्च 2022 रिपोर्टनुसार या खाणीतून सलग 50 वर्षे 2,00,000 टन तांबे तर 2,50,000 औस सोन्याचे उत्पान घेता येऊ शकते.
दरम्यान 2011 साली या खाणीमधील खोदकाम थांबवण्यात आले होते. आजपर्यंत हे काम पुन्हा चालू झालेले नाही. काही वाद निर्माण झाल्यामुळे हे काम सध्या बंद आहे. लवकरच या खाणीत खोदकाम चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.