(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ATM Cash Withdrawal Charge : 1 जानेवारीपासून ATM मधून कॅश काढणं महागणार; जाणून घ्या नियम काय?
ATM Cash Withdrawal Charge : नव्या वर्षाच्या सुरुवातीला ATM मधून कॅश काढणं महागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
ATM Cash Withdrawal Charge : एटीएममधून पैसे काढणाऱ्या बँक ग्राहकांना 1 जानेवारीपासून एटीएम वापरण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नवी नियमावली जारी केली आहे. ज्या अंतर्गत बँकांना 1 जानेवारी 2022 पासून एटीएम व्यवहारांवर आकारण्यात येणारे शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. या नव्या नियमांमुळे एटीएममधून पैसे काढणं किंवा इतर कोणतेही व्यवहार करणं तुम्हाला महागात पडणार आहे. काय आहेत नियम सविस्तर जाणून घेऊया...
काय असणार नवे ट्रांजेक्शन लिमिट्स?
RBI ने 1 जानेवारी 2022 पासून मोफत मासिक मर्यादेनंतर बँकांना ATM व्यवहारांवर आकारण्यात येणारे शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. 1 जानेवारीपासून मोफत एटीएम व्यवहारांव्यतिरिक्त, तुम्ही रोख रक्कम काढल्यास वाढीव शुल्क भरावे लागेल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार्या या नियमांतर्गत, एटीएममधील मोफत मर्यादेपेक्षा आर्थिक व्यवहार शुल्क 21 रुपये असेल, जे पूर्वी 20 रुपये होते. जर तुम्ही मोफत ट्रांजेक्शनपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला प्रति ट्रांजेक्शन 20 ऐवजी 21 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय ग्राहकांना त्यावर जीएसटीही भरावा लागणार आहे. आरबीआयने 4 दिवसांपूर्वी एक परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
एटीएममधून मोफत ट्रांजेक्शनसाठी तुम्हाला किती पैसे मिळतात?
बँक ग्राहकांना एटीएममध्ये 5 मोफत व्यवहार मिळतात. यामध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश असेल. मेट्रो शहरांमध्ये राहणारे बँक ग्राहक इतर बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला तीनदा मोफत व्यवहार करू शकतात. इतर शहरांतील ग्राहक इतर बँकांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहार करू शकतात. कोणताही कर, लागू असल्यास, या शुल्कापासून स्वतंत्रपणे तो आकारला जाईल. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला 20 रुपयांच्या शुल्काव्यतिरिक्त कर भरावा लागेल, परंतु नवीन वर्षापासून तुम्हाला 21 रुपये शुल्क आणि त्यावर लागू होणारा कर भरावा लागेल.
दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार?
सध्या बँका त्यांच्या ग्राहकांना एटीएममधून एका महिन्यात पाच मोफत व्यवहार देतात, ज्यामध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश होतो. बँकांची ही सेवा यापुढेही सुरु राहिली तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण बहुतांश ग्राहकांचे काम या मोफत ट्रांजेक्शन मर्यादेतच होते.
इंटरचेंज ट्रांजेक्शन शुल्कही वाढणार
आणखी एक बदल आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, बँकांना प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क वाढवण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी हे शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आलं आहे. गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आली आहे.
Axis Bank ने माहिती देण्यास सुरुवात केली
आरबीआयच्या मंजुरीनंतर खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे पाठवली जात आहे. एसएमएसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, अॅक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेनंतर केलेल्या व्यवहारावर 21 रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागणार आहे. यासाठी आधी 20 रुपये आकारले जात होते, परंतु, आता या रकमेत वाढ करण्यात आली असून आता 21 रुपये आकरण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- घराच्या किंमती वाढण्याची शक्यता; सिमेंटचे दर महागणार!
- Fixed Deposit Tips: FD मध्ये गुंतवणूक करत आहात? त्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी
- LIC IPO:तुमच्याजवळ LIC ची पॉलिसी असेल तर IPOमध्ये किती होईल फायदा? पैसे गुंतवावे का?
- Sensex मधील टॉप सात कंपन्यांना झाला 1.29 लाख कोटींचा फायदा, सर्वाधिक फायदा 'या' स्टॉकला