(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारच्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडतोय, निर्यातीला सरकारचा खोडा, अनिल घनवटांचा निशाणा
कांदा निर्यातीला सरकार खोडा घालत असल्याचे म्हणत शेतकरी नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Onion News : कांदा निर्यातीची (Onion Export) सशर्त परवानगी देऊन सुद्धा सरकारच्या कारभारातील सावळ्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडत आहे. निर्यात शुल्क नेमके किती? याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे निर्यात सुरु नाही अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिली आहे. कांदा निर्यातीला सरकार खोडा घालत असल्याचे घनवट म्हणाले.
550 डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य व 40 टक्के निर्यात शुल्क
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने 3 मे रोजी अध्यादेश काढून भारतातून कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. 550 डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य व 40 टक्के निर्यात शुल्क अशा निर्यातीच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर पाहता, व्यापाऱ्यांनी जास्त दर देऊन कांदा खेरदी केला व निर्यातीसाठी बंदरावर पाठवला आहे. मात्र कांदा निर्यात शुल्क 40 टक्के नसून 50 टक्के आहे असे बंदरावरील सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
निर्यात शुल्क नेमके किती हा निर्णय झाला नाही?
निर्यात शुल्क 40 ऐवजी 50 टक्के आकरल्यास, जो कांदा 64 रुपयात निर्यात झाला असता त्याला आता 70 रुपये मोजावे लागणार. या दरात अखाती देशात कांदा निर्यात होणे शक्य नाही. निर्यात शुल्क नेमके किती हा निर्णय आज चार दिवस झाले तरी स्पष्ट होऊ शकले नाही. निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरलेला कांदा सडण्याची शक्यता असल्याचे अनिल घनवट म्हणाले. बंदरावर उभ्या असलेल्या कंटेनर व ट्रकचे ज्यादा भाडे निर्यातदारांना द्यावे लागणार आहे. तातडीने निर्णय न झाल्यास पूर्ण कांदा सडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण
दरम्यान, या गोंधळाचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसला आहे. निर्यात खुली झाल्यानंतर कांद्याचे दर हे 15 रुपये किलोवरुन 22 ते 25 रुपयापर्यंत वधारले होते. कांदा निर्यात होत नसल्याचे लक्षात येताच कांद्याचे दर पुन्हा 15 रुपयांच्या दरम्यान घसरले आहेत.कांदा निर्यातबंदी करायची असल्यास काही तासात अंमलबजावणी केली जाते. मात्र कांदा निर्यात सुरू करायची आहे तर कित्येक दिवसापासून घोळ घातला जात असल्याचे अनिल घनवट म्हणाले. शासनाचे सर्व आदेश ऑनलाईन उपलब्ध होतात. संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी संपर्क करणे ही सहज शक्य असताना हा विलंब का? व्यापारी, निर्यातदार व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कांदा उत्पादकांची मते मिळविण्यासाठी निर्यात खुली केल्याचा देखावा
कांदा पट्ट्यात निवडणुका सुरू आहेत व कांदा उत्पादकांची मते मिळविण्यासाठी निर्यात खुली केल्याचा देखावा केला आहे. मात्र कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून निर्यात शुल्काचा घोळ घातला जात आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या तोट्याला व व्यापारी, निर्यातदार यांच्या नुकसानीला केंद्र सरकार जबाबदार आहे. हा तिढा लवकर सुटला नाही तर याचा मतदानावर मोठा परिणाम होईल असे मत अनिल घनवट यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या: