रिलायन्स जिओची धुरा आता आकाश अंबानींच्या हाती, मुकेश अंबानींचा संचालकपदाचा राजीनामा
Reliance Jio New Ceo: देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कुटुंबीयांपैकी एक असलेल्या रिलायन्स ग्रुपमध्ये पुढच्या पिढीला आता धुरा सोपवण्यात आली आहे.
Reliance Jio New Ceo: देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कुटुंबीयांपैकी एक असलेल्या रिलायन्स ग्रुपमध्ये पुढच्या पिढीला आता धुरा सोपवण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या टेलिकॉम युनिट बोर्डाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी आकाश अंबानी यांना रिलायन्स जिओच्या बोर्डाचे संचालक बनवण्यात आले आहे.
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने मंगळवारी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली. 27 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतरच मुकेश अंबानी यांचा राजीनामा वैध ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आकाश अंबानी यांना बोर्डाचे संचालक बनवण्याची माहितीही दिली. कंपनीच्या संचालक मंडळाने गैर-कार्यकारी संचालक (Non Executive Director) आकाश अंबानी यांची संचालकपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.
याशिवाय अतिरिक्त संचालक म्हणून रामिंदर सिंग गुजराल आणि केव्ही चौधरी यांच्या नियुक्तीलाही बोर्डाने मान्यता दिली. या दोघांची 5 वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पंकज मोहन पवार यांची नियुक्ती करण्यासही बोर्डाने मान्यता दिली. ही नियुक्ती 27 जून 2022 पासून पुढील 5 वर्षांसाठी असेल. या नियुक्त्यांना भागधारकांची मंजुरी मिळणे बाकी आहे.
दरम्यन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्लूमबर्गच्या अहवालात असे सांगण्यात आले होते की, मुकेश अंबानी हे व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या तयारीत आहेत. तेलापासून दूरसंचारपर्यंत पसरलेल्या या व्यवसायासाठी मुकेश अंबानी एकापाठोपाठ एक वॉल्टन (Sam Walton) कुटुंबाचा मार्ग अवलंबतील, असा दावा या अहवालात करण्यात आला होता. रिलायन्स जिओ ही सध्या देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. या कंपनीने 20221-22 च्या चौथ्या तिमाहीत 4,171 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर कंपनीचा महसूल 17,358 कोटी रुपयांवरून 20,901 कोटी रुपयांवर 20.4 टक्क्यांनी वाढला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Share Market : शेअर बाजारात आज अस्थिरता, दिवसभर सेन्सेक्सचा हेलकावा
Indian rupee : डॉलरच्या तुलनेत रुपयाने आजवरची लाज काढली! नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला