भारताच्या कृषी निर्यातीत 10 टक्क्यांनी घट, 'या' वस्तूंच्या निर्यातीत झाली घट
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये भारतीय कृषी निर्यातीत (Agriculture Exports) 10 टक्क्यांची घट झाली आहे.
Agri Exports: चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये भारतीय कृषी निर्यातीत (Agriculture Exports) 10 टक्क्यांची घट झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली असली तरी निर्बंधांमुळं गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत घट झाली आहे. तांदूळ, गहू आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीतही घट झाली. कृषी प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ने कृषी निर्यातीचा डेटा जाहीर केला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत निर्यात घटली
एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत कृषी निर्यात एकूण 15.729 अब्ज डॉलर होती. जी मागील वर्षी याच कालावधीतील 17.425 अब्ज डॉलरच्या तुलनेत 9.73 टक्के कमी आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत बासमती तांदळाच्या शिपमेंटमध्ये 17.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत सौदी अरेबिया आणि इराक सारख्या खरेदीदारांनी जास्त खरेदी केल्यामुळे निर्यातीचा आकडा 3.7 अब्ज डॉलर इतका झाला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 2.87 अब्ज डॉलर्स होता. बासमती तांदळाची निर्यात 9.6 टक्क्यांनी वाढून 29.94 लाख टनांवर गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 27.32 लाख टन होती.
गैर-बासमती तांदळाची निर्यात घटली
देशांतर्गत उपलब्धता सुधारण्यासाठी आणि किमती वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये निर्यात निर्बंध लादल्यामुळे गैर-बासमती तांदळाच्या शिपमेंटमध्ये एक चतुर्थांश घट झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत गैर-बासमती तांदळाची निर्यात 3.07 अब्ज डॉलर होती, जी गेल्या वर्षीच्या 4.10 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. तर गैर-बासमती शिपमेंट गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 115.7 लाख टनांच्या तुलनेत 33 टक्क्यांनी घसरुन 76.92 लाख टन झाली. गेल्या वर्षीच्या 1.50 अब्ज डॉलरच्या तुलनेत गव्हाची निर्यात 98 टक्क्यांनी घसरुन 29 दशलक्ष डॉलर झाली आहे. इतर धान्य निर्यात 429 दशलक्ष डॉलर होती. जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील 699 दशलक्ष डॉलरच्या तुलनेत 38 टक्क्यांनी कमी होती.
मांस आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 6.31 टक्क्यांनी वाढून 2.88 अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 2.70 अब्ज डॉलर होती. म्हशीच्या मांसाची निर्यात 13 टक्क्यांनी वाढून 2.40 अब्ज डॉलर झाली आहे. जी आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये 2.17 अब्ज डॉलर होती. त्याचवेळी, पोल्ट्री उत्पादनांच्या शिपमेंटमध्ये सुमारे 39 टक्क्यांनी वाढ होऊन 113 दशलक्ष डॉलर्सची नोंद झाली. तर, दुग्धजन्य पदार्थांची शिपमेंट 32.86 टक्क्यांनी घसरून 283 दशलक्ष डॉलर झाली.
महत्वाच्या बातम्या: