(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adani Group : अदानी समूह आता ड्रोन निर्मिती करणार, 'या' स्टार्ट अपमध्ये 50 टक्के भागिदारी
Adani Group : अदानी समूह आता ड्रोन निर्मिती क्षेत्रात उतरणार आहे. त्यासाठी कंपनीने एका स्टार्टअपमधील 50 टक्के भागिदारी खरेदी करणार आहे.
Adani Group : देशातील महत्त्वाच्या उद्योगक्षेत्रात वर्चस्व निर्माण करणाऱ्या अदानी समुहाने आता आणखी एका क्षेत्रात प्रवेश केला आहे. अदानी समुहाने ड्रोन निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समुहाने ड्रोन निर्मितीमधील एका स्टार्टअपसोबत मोठा करार केला असून 50 टक्के गुंतवणूक केली आहे.
अदानी समुहाने काही दिवसांपूर्वीच भारतातील आघाडीची सिमेंट कंपनी खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यानंतर आता ड्रोन निर्मितीत अदानी समूह उतरणार आहे.
अदानी समूह संरक्षण क्षेत्रावरही भर देत आहे. अदानी समुहाने या क्षेत्राकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. अदानी समुहाच्या Adani Defence System & Technologiesने बेंगळुरूमधील जनरल एअरोनॉटिक्स (General Aeronautics) सोबत करार केला आहे. ही कंपनी ड्रोन तयार करते. अदानी समुहाने या कंपनीमध्ये 50 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी एक करार केला आहे. अदानी डिफेन्सचे सीईओ आशीष राजवंशी यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. या करारामुळे लष्कराशी संबंधित उपकरणे तयार करण्याच्या कंपनीच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
कृषी क्षेत्रासाठी करणार काम
या करारामुळे लष्करासाठीच नव्हे तर कृषी क्षेत्राचाही फायदा होणार आहे. अदानी समुहाने करार केलेल्या जनरल एअरोनॉटिक्स (General Aeronautics) ही कंपनी मुख्यत्वे कृषी क्षेत्रासाठी काम करते. ही कंपनी रोबोटिक ड्रोनची निर्मिती करते. पिकांच्या संरक्षणासाठी आणि इतर कामांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. त्याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पिकांची देखभाल ही केली जाते.
31 जुलैपर्यंत होणार करार
हा करार नेमका किती रुपयांमध्ये झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, हा करार 31 जुलै 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एव्हिएशन क्षेत्रातही अदानी समुहाने मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीकडे देशातील महत्त्वाच्या विमानतळाची देखभाल करण्यासाठीचे कंत्राट आहे. यामध्ये मुंबई, जयपूर, अहमदाबाद विमानतळाचा समावेश आहे.
केंद्र सरकारदेखील ड्रोन क्षेत्रासाठी विशेष महत्त्व देत आहे. त्यासाठी सरकारने ड्रोनबाबतचे धोरण आखले आहे. देशातंर्गत ड्रोनची निर्मिती वाढावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.