(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AC Sale: एसी, रेफ्रिजरेटरची विक्री उन्हाळ्यात झाली दुप्पट; कूलरच्या विक्रीतही अडीच पट वाढ
AC Sale in Summer Season: उन्हाळा वाढल्याने एसी आणि फ्रीजच्या विक्रीत जोरदार वाढ झाली आहे.
AC Sale in Summer Season: उन्हाळा वाढल्याने एसी आणि फ्रीजच्या विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. देशातील बहुतांश भागात कडाक्याच्या उन्हामुळे रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कुलर, पंखे यांच्या मागणीत वाढ झाली आहे. यंदा उन्हाळी हंगामात या उत्पादनांच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा विक्रेता क्रोमाने एका अहवालात ही माहिती दिली आहे.
एसी सेल तीन पट वाढली (Air Conditioner Sales In india)
'अनबॉक्स्ड समर 2022' अहवालात असे सांगण्यात आले आहे की, 2021 च्या तुलनेत यावेळी रेफ्रिजरेटर्सच्या विक्रीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचवेळी एसीच्या विक्रीत तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय कुलरची विक्री अडीच पटीने अधिक होती. तसेच पंख्यांची विक्रीही पुण्यात दुप्पट झाली असून यातील पाचपैकी एक ग्राहक बेंगळुरूचा होता.
उत्तर भारतात 1.5 टन एसीची विक्री वाढली
मुंबई, ठाणे, पुणे आणि कोलकाता येथे विकले जाणारे बहुतांश एसी एक टनाचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याच वेळी, उत्तर आणि मध्य भारतात 1.5 टन एसी अधिक खरेदी केली गेली आणि या क्षमतेच्या एसींची संख्या एकूण विक्रीच्या 60 टक्के आहे.
जाणून घ्या कोणत्या शहरात कशी झाली विक्री?
हैदराबाद, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरूमध्ये विकल्या गेलेल्या एकूण एसीमध्ये लो-पॉवर 5-स्टार एसी सर्वाधिक आहेत. तर मुंबई, अहमदाबाद, सुरत, चेन्नई, वडोदरा आणि इंदूरमध्ये 3-स्टार एसीच्या खरेदीदारांची संख्या 50 टक्क्यांहून अधिक आहे.
पोर्टेबल एसी कुठे जास्त सर्वाधिक विकले गेले?
याशिवाय 50 टक्के पोर्टेबल एसी मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथे खरेदी करण्यात आले. या उन्हाळ्यात दिल्ली-एनसीआरमध्ये 62 टक्के एसी खरेदी करण्यात आले आहेत. क्रोमाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविजित मित्रा म्हणाले, "ग्राहक आरामदायी आणि कमी वीज वापरणाऱ्या उत्पादनांची निवड करत आहेत."