एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्लॉग : ...पण लक्षात कोण घेतो?
सकाळी घराबाहेर पडलेले आपण सुरक्षितपणे घरी परत तरी येऊ का याची काहीच शाश्वती नसते. ना आपल्याला... ना घरच्यांना...
खरंतर मुंबईकर म्हणून कधीच सुरक्षित वातावरण जाणवत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे आजची दुर्घटना... ज्या मुंबईमध्ये हजारो- लाखो लोक आपल्या स्वप्नांचे पंख घेऊन येतात त्याच मुंबईचा चेहरा दिवसेंदिवस अधिकाधिक विद्रूप होतोय.
मुलगी आणि स्त्री म्हणून कदाचित दिल्ली आणि भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये बरं वाटत असलं तरीही मनावर सतत टांगती तलवार घेऊन प्रत्येक वेळी घरच्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडावं लागतं. सकाळी घराबाहेर पडलेले आपण सुरक्षितपणे घरी परत तरी येऊ का याची काहीच शाश्वती नसते. ना आपल्याला... ना घरच्यांना...
" हे शहर.... ज्याला करता येत नाही मनमानी... ज्याच्यावर असंख्य पावलं धावत राहतात दिवसरात्र... ज्याच्यावरून काळीज चिरणारा भोंगा देत निघून जाते आगगाडी... ज्याच्या छाताडावर उभारलेत आस्मानचुंबी टॉवर्स... ज्याच्या इच्छेला कसलीच किंमत नाही या ब्रँडेड बाजारात.. हे शहर... ज्याचा अक्रोश पाहू शकत नाही कुणीच.. ज्याला फक्त सोसता येतं... ज्याला फक्त पडून राहता येतं... कसलीही तक्रार न करता....!!! "चार वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आजंही जशीच्या तशी आहे... एका शब्दाचाही बदल न झालेली परिस्थिती बघून आपला विकास नेमका कोणत्या दिशेने होतोय याची खात्री करून घ्यावी वाटते. कदाचित माझ्यासोबत हे घडू शकलं असतं किंवा कदाचित तुमच्याही... असंख्य जिवंत प्रेतांना आपल्या बाहू्त घेऊ पाहाणाऱ्या मुंबईची क्षमता आता संपत चाललीय याची तीव्रतेने जाणीव होते. जिवंत माणसं क्षणार्धात मृत्यूच्या सापळ्याचा बळी ठरतात... प्रेतांचा खच पडतो... माणसं तुडवली जातात... व्हिडीओ काढले जातात... लाईव्ह घेतलं जातं...चकचकीत ग्राफिक्स... बातम्या... विदाऊट ब्रेक बुलेटीन या सगळ्यांच्या फेऱ्यात मेलेल्या माणसांची संवेदना हळूहळू बोथट होत जाते. या सगळ्यामध्ये कुणी आपल्या कुटुंबियांना सांभाळणारा एकुलता एक असतो. तर कुणी उद्याच्या दसऱ्याच्या निमित्ताने फुलं विकून चार पैसे कमावून लेकरांना खुश करणारा बाप असतो. कुणी दहीहंडीतल्या पहिल्या थरावरचा थरार अनुभवणारा. तर कुणी आपल्या आईच्या वयाची, चालताना त्रास होणारी बाई शेकडो माणसांच्या पायाखाली तुडवली जात असते. या सगळ्यात प्रशासन आणि रेल्वे मंत्री बिंत्री काहीही करू शकत नसले तरीही एक प्रश्न मनापासून विचारावासा वाटतो की मुंबईकर म्हणून त्यांचं नेमकं चुकलं तरी काय? मरण स्वस्त होत आहे.. हे आजवरच्या कित्येक घटनांमधून मान्य केलेलं असलं तरीही मुंबईकरांचं स्पिरीट या एका वाक्याखाली मुंबईकरांच्या सहनशिलतेचा अंत पाहाण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला? कुणीतरी मस्ती मस्तीत पसरवलेल्या अफवेचे हे 22 बळी.... आणि हात पाय मोडून पडलेले कित्येक लोक... मुंबईसारखी लोकल सेवा जगाच्या पाठीवर कुठेही नाही असं म्हणत बिरूद मिरवणारे राज्यकर्ते या सगळ्या प्रकरणाचं खापर पावसावर फोडून मोकळे होत असताना त्यांना मनातून तरी लाज कशी वाटत नसेल? त्यांना या मेलेल्या माणसांच्या घरच्यांचा आक्रोश झोपू कसा देत असेल? फक्त राजीनामे घेऊन आणि मंत्री बदलून कुठल्याही सेक्टरचा विकास कधीच होणार नाही हे निश्चित. मात्र पैसे भरून प्रवास करत असतानाही किमान सुविधा मिळवण्याचा अधिकार नागरिकांना का नाही? मुंबईची लाईफलाईन म्हणवली जाणारी ट्रेन इतकी व्हेंटिलेटरवर कशी असू शकते. साधारण गणित मांडलं तर एका ट्रेनची कपॅसिटी साधारण 1000 ते 1100 च्या आसपास असताना त्याच ट्रेन मधून गर्दीच्या वेळी 3500 ते 4000 लोक प्रवास करत असतील तर मुंबईची वाहतूक व्यवस्था किती भयानक पद्धतीने रेटली जाते याचा अंदाज येईल. फक्त वाहतूक नाही तर मुंबईवर भार होतोय, असं जाणवणारी कित्येक क्षेत्र आपण दिसत असूनही दुर्लक्षित ठेवतो... आणि त्यामुळे त्याचा असा अचानक फटका बसतो. आज ते 22 जण होते.... कदाचित या नंतर आपल्या जवळची व्यक्ती त्यामध्ये असू शकेल.... किंवा कधीतरी आपणंच.... त्यावेळी श्वास घुसमटत असताना आपल्यालाही तुडवून कुणीतरी निघून गेलेलं असेल... आपलंही शरीर पावसामध्ये रस्त्यात पडून भिजत असेल... कधीतरी पोलिस आणि अँब्युलन्स येऊन आपल्याला हॉस्पिटलला नेलं जाईल... आणि तोवर आपलंही नाव मृत म्हणून घरी कळवलं जाईल. सध्या भीती वाटू लागलीय.... शहरं अंगावर येऊ लागली आहेत.... या झगमगाटाच्या मागे असणारा मुंबईचा विद्रूप चेहरा मनात काहीली निर्माण करू लागलाय... किंकाळ्या फोडणाऱ्या माणसांचे आक्रोश बघून घशाला कोरड पडू लागलीय.. फक्त उद्या त्यांच्या ठिकाणी मी पांढऱ्या कपड्यात बांधून घरी येऊ नये या एकाच आशेवर माझ्यासारख्या अनेक घरातली माणसं घराबाहेर पडलेल्या माणसांकडे डोळे लावून बसली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement