एक्स्प्लोर
जागतिक रंगभूमी दिन : आपलं नाटक एकटं पडलंय?
मुंबईत आता रसिक उरलाच नाहीय? नाही, पण असंही नाही म्हणता येत. कारण या महोत्सवाला इतर प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. म्हणजे सामान्य माणसांना किमान पक्षी काही कुतूहल आहे नाटकाबद्दल...
तुम्हाला तुमच्यासाठी ज्यावेळी पुरेसा वेळ असेल त्यावेळी हा ब्लाॅग वाचा.
कारण हा ब्लाॅग लिहिताना मला काही प्रश्न पडले. ते प्रश्न मी इथे मांडणार आहे. हा ब्लाॅग वाचता वाचता तो प्रश्न आला की तुम्हाला आपल्या पुरतं का होईना याचं उत्तर द्यावं लागेल. याचं जे उत्तर येईल ते उत्तर तुमचं स्वत:चं असेल हे लक्षात घ्या.
चला करायची सुरूवात?
(मनातून उत्तर हो असं आलं तर पुढे जा. नकारार्थी उत्तराकडे झुकत असाल तर माघारी फिरायला हरकत नाही.)
तुम्ही रंगकर्मी म्हणवता?
नाटक आवडतं तुम्हाला?
मराठी नाटकं बघता तुम्ही?
सध्या मुंबईत प्रभादेवीसारख्या मध्यवस्तीत थिएटर आॅलिम्पिक सुरू आहे. याची तुम्हाला कल्पना आहे?
तुमच्या माहितीसाठी गेल्या दोन दिवसांपासून हा महोत्सव सुरू झालाय. तो ७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. देशातल्या अनेक भागातून इथे नाटक सादर करण्यासाठी संघ येतील. परदेशातूनही अनेक नाटकं इथे सादर होतायत. काही परिसंवाद होतायत. परदेशी पाहुणे यात सहभागी होताहेत. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी एकत्र येऊन मुंबईकरांसाठी ही पर्वणी आणली आहे. आता ही झाली प्राथमिक माहिती.
...
आज जागतिक रंगभूमी दिन आहे याची तुम्हाला कल्पना आहे?
मग जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्याची घाई तुम्ही केली असेलच. अच्छा है.
आता मुद्दा असा, की तुम्ही रंगकर्मी आहात. स्वत: ला रंगकर्मी म्हणवून घेत असताना आपल्याच गावात असलेला हा रंगदेवतेच्या उत्सवाला जावं असं तुम्हाला का वाटलं नाही?
चित्र फार भयानक आहे. आज जागतिक रंगभूमी दिनाच्या मोक्यावर थिएटर आॅलिम्पिक आपल्या मुंबईत होत असताना या महोत्सवाला यावं असं का नाही वाटत कुणालाच?
वेळ नसतो?
मग कशासाठी असतो वेळ?
संध्याकाळी धुम्रकांड्या पिकवत तिसऱ्या माणसाने केलेल्या नाटकाच्या नाड्या सैल करण्यात आपल्याला धन्यता वाटते?
परदेशातले लोक कसे करत असतील नाटक, हा प्रश्न का नाही पडत आपल्याला?
तुम्हाला गंमत माहितीये का, हा जो महोत्सव चालू आहे ना तो फुकट आहे. तो फुकट आहे म्हणून नसेल का गर्दी होत?
की मुंबईत आता रसिक उरलाच नाहीय?
नाही पण असंही नाही म्हणता येत. कारण या महोत्सवाला इतर प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. म्हणजे सामान्य माणसांना किमान पक्षी काही कुतूहल आहे नाटकाबद्दल. मग आपण जे स्वत:ला रंगधर्मी समजतो, आपल्या सर्वांना का नाही वाटत नाटक बघावं?
आजच्या परिसंवादाचा विषय होता, आपलं नाटक म्हणजे थिएटर संकुचित होतंय का?
सकाळी एनएसडीचे संचालक वामन केंद्रे यांनी पहिली सूत्रं आपल्या हातात घेतली.. त्यांनी अतिशय लाॅजिकल मुद्दे मांडले. पण ते एेकायला आपण कुठे होतो?
यावेळी बोलता बोलता वामन केंद्रे यांनी एक मांडलेला मुद्दा मनात रुतला. ते म्हणाले की आपलं नाटक एकटं पडलंय.
आता मुळात नाटक ही समूह कला असं एकदा मान्य केलं तर ते एकटं कसं पडेल असं वरवर एखाद्याला वाटणं साहजिक आहे. पण आपलं नाटक खरंच एकटं पडलंय. म्हणजे, पूर्वी नाटकाला पुढं घेऊन जाणारं संगीत आता हळूहळू नाटकातून जाऊ लागलंय. गाणं, वादन, नृत्य या कलाही हळूहळू आपआपलं अंग काढून घेताना दिसतायतं. आता नाटक उरलं आहे ते फक्त शब्दांपुरतं. मग ते शब्दबंबाळ होतं. एककल्ली होतं आणि ते आपआपलं बडबडतंय की काय असंही वाटून जातं.
गेल्या अनेक महिन्यांपासून तर नाटकात एकवेळ योग्य संहिता नसली तरी चालते, पण स्टार कलाकार असावा लागतो अशी गत झालेली दिसते. स्टार कलाकार घ्या आणि मग त्या कलाकाराला बघायला.. त्याच्यासोबत सेल्फी काढायला प्रेक्षक येतात. गर्दी होते. त्याच्या बातम्या होतात आणि त्यातच आपण धन्यता मानायला लागतो. पण मुळात रंगदेवतेच्या मंदिरात आपण ज्या कारणासाठी एकत्र आलोत, सोहळा आपण पाहायला जातो, तो आपल्याला खरंच लाभतो का? आपल्याला खरंच नाटक पाहायचं असतं का?
थिएटरमध्ये गेल्यावर समोर रंगमंचावर जीव तोडून कोणीतरी आपली कला सादर करत असतो. एक नवा जीवनानुभव आपल्याला देऊ पाहात असतो तो आपल्याला खरंच घ्यायचा असतो का?
घ्यायचा असतो?
तर मग एक सांगा.. मोबाईल अस्तित्वात येऊन जवळपास 10 वर्षं उलटली. तरी आजही नाटक सुरू होण्यापूर्वी आपल्याला तो मोबाईल बंद करण्याची सूचना का करावी लागते?
तिकीट काढून नाटकाला गेल्यानंतरही पुढ्यातले दोन तास संपूर्णपणे एकसंध नाटक का पाहावं वाटत नाही आपल्याला?
म्हणजे आपली प्रायाॅरिटी नाटक पाहाणं ही उरलेली नाही?
मग आपला प्राधान्यक्रम नेमका काय आहे?
म्हणजे आपल्या नाटकाला आता आपला असा प्रेक्षकही उरलेला नाही?
आपल्या नाटकाला राजाश्रय तर कधीच नव्हता. पण आता लोकाश्रयाचं छत्रंही जर हरपलं तर?
शफाअत खान म्हणतात तसं, नाटक मरणार नाही. पण नाटकाच्या जगण्यालाही आपण अर्थ देणार आहोत की नाही? की ते केवळ जिवंत असण्यातच धन्यता मानली जाणार आहे?
मग खरंच नाटक एकटं पडलंय का?
नाटकाचा लोकाश्रय कमी होतोय याचं जिवंत उदाहरण आज रविंद्र नाट्यमंदिरात पाहायला मिळालं. प्रेक्षक तर फार पुढची बात. पण हौशे, नवशे यांनाही या महोत्सवाला येऊन काय चाललंय ते पाहावं वाटत नसेल तर मग मात्र आपण थोडं जागं व्हायला हवं.
हे सगळं आपल्यासाठी सुरू आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं.
मराठी सिनेमाने भरारी घेतल्याची चर्चा आता रंगते खरी. पण मराठी नाटकांनी आपली प्रतिभा आणि प्रतिष्ठा कघीच दाखवून दिली आहे. आता तीी टिकवण्याची जबाबदारी आपली नव्हे काय?
जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा लिहून मोकळं होण्यापेक्षा निदान एक दिवस जरी अशा नाट्यमहोत्सवांना आपण हजेरी लावली तर ही शुभेच्छा फलद्रुप होईल.
नाटक सादर करणाऱ्या परदेशी वा परराज्यातल्या पाहुण्यांना हुरूप येईल.
आपलं म्हणाल तर, नवं.. जिवंत काहीतरी पाहिल्यानंतर मिळणाऱ्या आनंदाबाबत मी तो पामर काय बोलणार?
शुभेच्छा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement