World Book Day : 'पुस्तकं आपल्याला काय देतात ?' जगण्याचा अनुभव देतात, बोथट जाणिवा टोकदार करतात...

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने…अॅड.अभिधा निफाडे यांचा विशेष ब्लॉग
लहानपणी आजोबांना वाचताना पहिल्याचं आठवतं. मोठ्या भिंगाचा चष्मा, समोर पुस्तक, त्याच्या बाजूला नोंदवही अशा थाटात लायब्ररीचं दार लावून आजोबा तासनतास पुस्तक वाचायचे. अशावेळी त्यांच्या वाचनात व्यत्यय आणण्याची आम्हा नातवंडांना परवानगी नसे. पण मग आम्हीही तिथे बसून दंगा करणार नाही, फक्त वाचन करू अशी आईला ग्वाही देऊन मिळेल ते पुस्तक हातात घेऊन तिथे बसायचो. पहिल्यांदा पुस्तकांमधली फक्त चित्र पाहिली मग हळूहळू चंपक, चांदोबा वाचू लागलो आणि मग नंतर लहान मुलांसाठीची पुस्तके लायब्ररी मधून आजोबांना खास आणायला सांगू लागलो.तिथून पुस्तकांची गोडी लागली ती आजतागायत तशीच आहे, किंबहुना अजून वाढलीये.
सुरवातीला परीकथा, चतुर बिरबल, तेनालीराम, इसापनीती हे वाचून त्यातल्या आवडत्या गोष्टीवर नाटुकली लिहून ते आल्यागेल्यांसमोर सादर करणे हा छंद जडला. पुढे शिक्षणासाठी गावातून पुण्यात आले असताना काही दिवस प्रेम कथा आणि कविता यांत रमले . 'प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं' असे म्हणणारे कुसुमाग्रज आपले वाटू लागले आणि व.पु.च्या कल्पनेतला पार्टनर कोणात सापडतोय का याचीही चाचपणीही झाली ! याचदरम्यान माझी पुण्यातल्या वेगवेगळ्या तसेच इतर ठिकाणांहून पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या अनेकांशी मैत्री झाली.हे लोक मराठी तर वाचतच पण जगातील लेखकांची आणि त्यांच्या साहित्याची त्यांना ओळख होती , याचं मला फार कौतुक वाटलं.मलादेखील अशी माहिती असावी असे मला मनोमन वाटे.म्हणून मग मी पुस्तकं विकत घेताना माझ्या या मित्र-मैत्रिणींना विचारे.त्यांच्यामुळे मला जॉर्ज ओरवेल, दोस्तोव्हस्की , गब्रीएल गार्सिया मॅकवेझ, मुराकामी असे अनेक लेखक कळले आणि त्यांच्या पुस्तकांची ओळख झाली. सुरवातीला माझी इंग्रजी भाषा यथातथाच असल्याने मी यातील फक्त मराठी भाषांतर झालेली पुस्तकेच वाचे पण कालांतराने प्रयत्नपूर्वक इंग्रजी भाषा सुधारून हळूहळू इंग्रजी पुस्तके वाचू लागले .आणि त्यामुळे एक मोठं पुस्तक आणि विचारभांडार माझ्यासमोर खुलं झालं. आणि मग मी वाचतच सुटले , हातात येईल ते, अगदी कोणत्याही विषयावरचे. यातही विविध प्रकार आहे आणि त्यांच्या आस्वादाच्या पद्धती आहेत हे समजायला वेळ लागला. त्यातून मग मला माझा कल लक्षात यायला लागला. वाचनाचीही एक शिस्त असते आणि ती पाळायला हवी हे पटायला लागलं. आणि मग पुस्तकांनी झपाटून टाकलं !
आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पुस्तकं आपल्याला काय देतात ?' या प्रश्नाचा मी जेव्हा विचार करते तेव्हा मला जाणवतं ते म्हणजे पुस्तकांनी मला संवेदनशील केलं , विचार करायला भाग पाडलं आणि पडलेल्या प्रश्नांना स्वतःच उत्तरं शोधायला मदत केली ! वीणा गवाणकरांच्या 'एक होता कार्व्हर' मधल्या कार्व्हरने आयुष्यात कितीही संकटं, संघर्ष आला तरी ध्येयावरची निष्ठा ढळू द्यायची नाही हे शिकवलं, रिचर्ड बाखच्या 'जोनाथन लिविंगस्टन सीगल' ने स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून मोठी स्वप्नं बघायला आणि त्यांचा पाठपुरावा करायला शिकवलं, साने गुरुजींच्या 'श्यामच्या आई' ने 'पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना , तसा मनालाही घाण लागू नये म्हणून जप हो श्याम' असं सांगत नकळतपणे जीवनाचा धडा दिला तर 'डायरी ऑफ अॅन फ्रँक' मधून अॅनने आजूबाजूला कितीही काळोख असला तरी मनात आशेचा किरण जागवत 'माणसं मूळात चांगलीच असतात'' यावरचा विश्वास तसूभरही कमी होऊ द्यायचा नाही हा दृष्टीकोन दिला.
अनेकदा पुस्तकांमधल्या पात्रांत मला माझं प्रतिबिंब दिसलं, मुराकामीच्या 'नॉर्वेजियन वूड' मधली मस्तमौला 'मिदोरी' कधी मला जवळची वाटली तर कधी कधी स्वतःला 'मिदोरी' समजणारे आपण प्रत्यक्षात सदैव चिंताग्रस्त 'नाओको' तर नाही ना अशीही शंका आली ! अनेकदा जो, मेग , बेथ , एमी या 'चारचौघीं' मधली एक असतो तर किती छान झालं असतं असं तीव्रतेने वाटलं आणि जेव्हा कंटाळा आला तेव्हा गिलियन फ्लीनच्या 'गॉन गर्ल' मधली सगळं सोडून एक दिवस अचानक गायब होणारी एमी व्हावंसं वाटलं. हे असं 'मन वढाय वढाय' होण्याचं श्रेय निःसंशय पुस्तकांचं ! मात्र कल्पनेच्या जगात अलगत नेऊन ठेवणारे हे पुस्तकरूपी मित्र धाडकन जमिनीवर कधी आदळतील याचा काही काही नेम नाही.आजूबाजूच्या समाजाविषयी जास्त समजून घ्यायचं असेल तर पुस्तकं त्याचा आरसा बनतात.समाजाचं वेदनादायी वास्तव, शोषण, अन्याय, स्त्री-पुरुष विषमता, लिंगभेद,आणि वर्ग संघर्ष यांचा खोलवर अनुभव देणारी पुस्तकं वाचताना रिऍलिटी चेक देतात. कमला भसीन असतील किंवा महाश्वेता देवी, यांचं लेखन वाचताना सामाजिक शोषणाचं आणि स्त्री विरोधी विचारांचं गांभीर्य समजून येतं, विशेषतः महाश्वेता देवींची 'हज़ार चौरासी की माँ ' किंवा 'द्रौपदी' ही कथा केवळ साहित्य नव्हे, तर अस्वस्थ करणारा अनुभव आहे. प्रत्यक्षात जरी एखादी परिस्थिती अनुभवली नसली तरी ती जगण्याचा अनुभव पुस्तकं आपल्याला देतात आणि आपल्या बोथट जाणीव टोकदार करतात.
आजकाल सोशल मीडियाच्या चमकणाऱ्या स्क्रीनवर झपाझप पुढे सरकणाऱ्या पोस्ट्स आणि रील्सच्या गर्दीत शांतपणे पुस्तक हातात घेऊन वाचत बसणं अवघड झालंय. पण आधीपेक्षाही हे असं वाचन आता जास्त महत्वाचं आहे कारण चहूबाजूंनी भडीमार होणारी माहिती केवळ पुरेशी नाही; त्या माहितीवर विचार करण्याची क्षमता हवी. या माहितीच्या महासागरात पोहताना, नेमकं काय योग्य आणि काय दिशाभूल करणारं आहे याची विभागणी करणं तितकंच कठीण झालं आहे. अशा वेळी, या साऱ्या माहितीचं विश्लेषण करणं, त्या मागचे संदर्भ समजून घेणं आणि त्या अनुषंगाने स्वतःचं स्वतंत्र मत घडवणं , हे कितीही आधुनिक तंत्रज्ञान आलं, तरी केवळ पुस्तकंच शिकवू शकतात !
पुस्तकं केवळ ज्ञान देत नाहीत, ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात. समोर येणाऱ्या गोष्टी गृहित न धरता, त्यामागचा हेतू शोधायला लावतात. पुस्तकं वाचल्यावर काही प्रश्न पडतात, काही प्रश्नांची उत्तरं मिळतात. ही मानसिक हालचाल म्हणजेच खरं पुस्तकांचं सामर्थ्य ! एकविसाव्या शतकात क्रांती करायची म्हटलं तर , ' स्क्रोल कल्चर' मध्ये क्षणभर थांबून, एखाद्या विचाराचा आस्वाद घेणं, हीच आजची क्रांती आहे. आणि या क्रांतीचं माध्यम पुस्तकं आणि वाचन आहे.वाचन हे केवळ एक कौशल्य नसून, एक समाज परिवर्तनाचं साधन आहे. जी पिढी वाचते, ती विचार करते. आणि जी विचार करते, ती कृती करते आणि या कृतीतून समाज बदलतो.
यासाठी 'जागतिक पुस्तक दिन' ही एक संधी आहे.या दिवसाचं महत्त्व केवळ पुस्तकांवर प्रेम व्यक्त करणं एवढंच नाही तर वाचनाची गोडी जिथे पोहोचलेली नाही, अशा ठिकाणी ती पोहोचवण्याचा संकल्प करण्याची ही संधी आहे. वाचनाची आवड ही केवळ वैयक्तिक गोष्ट न राहता, ती एक सामाजिक चळवळ व्हायला हवी.कारण वाचनातूनच विचार घडतो !
आपल्या सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- अॅड.अभिधा निफाडे या वकील असून ‘अरुणा’ या संस्थेच्या माध्यमातून महिला आणि कामगार यांच्या हक्कांवर काम करतात.

























