BLOG : हिरव्या देठाची पिवळी केळी
निदा फाज़ली यांचा एक शेर आहे...
धूप में निकलो
घटाओं में नहाकर देखो।
ज़िन्दगी क्या है
किताबों को हटाकर देखो।।
आयुष्यात पुस्तकं वाचलीच पाहिजेत, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्या भोवताली दर क्षणाला नव्यानं बदलणारं जग आणि त्याचे व्यवहार वाचता आले पाहिजेत. माणसं वाचता आली पाहिजेत. निसर्गाचे रंग, रूप, रस, गंध, स्पर्श अनुभवता आले पाहिजेत. त्यातूनच खरा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या नवव्या भागात साकेत देवस्थळी नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे. ही मालिका एबीपी माझा वाहिनीवरून दर रविवारी दाखवली जाते.
साकेतला त्याचे आईवडील मानसतज्ज्ञाकडे घेऊन येतात. त्यांची तक्रार असते की साकेत दहावीत आहे आणि त्याला अभ्यास लक्षात राहत नाही. डाॅक्टर जेव्हा साकेतला एकट्याला विचारतात तेव्हा तो सांगतो की, "एक विषय वाचायला घेतला की त्याला दुसर्याच विषयातले काही विसरते की काय अशी भीती वाटते." लहान मुलाच्या छोट्या छोट्या हातांमध्ये दहा वस्तू कोंबल्या तर त्यातल्या आठ खाली पडणार हे निश्चित. तसे साकेतचे झालेले असते. त्याचा टाइम टेबल घट्ट बांधलेला असतो. (मुंबईकर माणसासारखं घड्याळ त्याच्या मनगटाला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं.)
नंतर साकेतची आई आणखी एक धक्कादायक माहिती सांगते की, साकेत लहानपणापासूनच हुशार होता. लवकर चालायला, बोलायला लागला म्हणून त्याची जन्मतारीख मागे घेऊन त्याला तीन वर्षे आधीच शाळेत घातलेले आहे. त्याच्या वडिलांना डॉक्टर होता आले नाही म्हणून साकेत डाॅक्टर व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसतो. एक तर शाळेतला अभ्यासक्रम ठरवताना त्याची पातळी एक वर्ष पुढची ठेवलेली असते. (म्हणजे "दहावीचा अभ्यासक्रम अकरावीच्या मुलांना झेपेल असा बनवतात", असे पाठ्यपुस्तक मंडळाचे म्हणणे आहे. पण तुम्हाला अनुभव असेल की, दहावीचे पुस्तक प्रौढ माणसाला थोडे-फार कळते.)
या केसमध्ये तर साकेत तेरा वर्षांचा असूनही दहावीत असतो. म्हणजे आठवीच्या वयात दहावीचा अभ्यास त्याच्या माथी मारलेला असतो. त्याच्या बोलण्यातही जड शब्द येतात. हे पाहून डाॅक्टरांना कृत्रिमपणे पिकवलेल्या केळ्यांची आठवण येते. कार्बाइडच्या द्रावणात बुडवून अकाली पिकलेली केळी पिवळी दिसत असली तरी त्यांचे देठ मात्र हिरवेच राहिलेले असते.साकेतचीही तीच अवस्था असते. डॉक्टर त्यांना सल्ला देतात की, साकेतला एक वर्ष शाळेत घालू नका. त्याला थोडा रिकामा वेळ द्या. त्याला नैसर्गिकरित्या पिकू द्या. तो वेळेआधीच प्रौढ झाला तर प्रौढांचे सगळे आजार त्याला लवकर येऊन चिकटतील. साकेतच्या पालकांनाही ते पटते.
पुढे त्याचे वडील सांगतात की, "विनाकारण वेळ जातो म्हणून आम्ही घरात कथा, कादंबरी वगैरे ठेवतच नाही. साकेत फक्त अभ्यासाची पुस्तके वाचतो. डाॅक्टरांकडे येतानाही कारमध्ये त्याच्या आईने त्याला रसायनशास्त्र वाचायला दिले होते."
आता डाॅक्टर सांगतात की, "घरी जाताना कोणतेही पुस्तक त्याला देऊ नका. कारची काच खाली करा. बाहेरची मोकळी हवा, धूळ, ऊन त्याला अनुभवू द्या. उंच इमारती, गजरेवाले, पोलिस, भिकारी, माणसे पाहू द्या."
येथे हा भाग संपतो; पण अतिघाई करणार्या पालकांना एक विचार देऊन जातो की, 'पुस्तकातल्या रसायनशास्त्रासोबतच आयुष्यातल्या रसायनाची भट्टीही जमलीच पाहिजे.'
विनोद जैतमहाल इतर ब्लॉग