Vasai Virar Mahanagarpalika Election 2026: मोठी बातमी : ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
Vasai-Virar Mahanagarpalika Election 2026: वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे

Vasai-Virar Mahanagarpalika Election 2026: वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी (Vasai-Virar Mahanagarpalika Election 2026) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आलेल्या पाच उमेदवारांनी ऐनवेळी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकारामागे राजकीय दबाव तसेच आमिषाचा वापर झाल्याची शक्यता शिवसेना उबाठा गटाने व्यक्त केली आहे.
अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 19-ब (एस.टी. आरक्षित) येथील आरती वाढाण, प्रभाग क्रमांक 13-ड येथील हरिश्चंद्र पाटील, प्रभाग क्रमांक 13-अ येथील ऋतुजा चोरघे, प्रभाग क्रमांक 24-ड येथील श्रीकांत महाकाल आणि प्रभाग क्रमांक 21-ब येथील मोहन बर्वे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व उमेदवारांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. असे असतानाही त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेना उबाठा गटासाठी ही बाब धक्कादायक ठरली आहे.
Vasai-Virar Mahanagarpalika Election 2026: आता 89 जागांवरच लढावं लागणार
याशिवाय प्रभाग क्रमांक 21-ब मधील उमेदवार अर्चना नलावडे यांचे मतदार यादीतील नाव चुकीचे आढळल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. या सर्व घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आता वसई–विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ 89 जागांवरच उमेदवार उभे करू शकणार आहे.
Vasai-Virar Mahanagarpalika Election 2026: पक्ष नेतृत्वाकडून प्रकरणाची गंभीर दखल
या संपूर्ण प्रकरणाची पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यामागची कारणे आणि त्यामागे दबावतंत्र किंवा प्रलोभनाचा वापर झाला आहे का, याची चौकशी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत जर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा दबाव असल्याचे स्पष्ट झाले, तर त्याविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. वसई–विरारमध्ये आधीच तीव्र राजकीय चुरस पाहायला मिळत असताना, या घडामोडीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून, पुढील काळात या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची चिन्हे आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या




















