एक्स्प्लोर
प्रताप तायडे - गर्दीतला देवदूत!
हल्ली माणसं रस्त्यावर तडफडून जीव सोडतात पण भोवताली उभी असलेली माणसं फोटो काढणं सोडत नाहीत. कॅमेरा क्रांतीच्या युगातली ही असंवेदनशीलता वारंवार कॅमेऱ्यातच कैद झाली. म्हणूनच कोरड्या होत चाललेल्या आपल्या समाजाला ही कहाणी सांगणं खूप गरजेचं आहे.
ही कहाणी तुमच्या माझ्या बाजूला असलेल्या गर्दीतलीच आहे. तिला भावभावना आहेत... तीव्र संवेदना आहेत... यात टोकाचं समर्पण आहे आणि गरीबीचा फेराही आहे... नाही फक्त त्याचा ओळखीचा चेहरा...!
हे सगळं वाचल्यावर तुम्ही स्तब्ध व्हाल... थोडे अस्वस्थही व्हाल...कदाचित क्षणभर यावर विश्वासही बसणार नाही... मग मनालाच म्हणाल, हे सगळं खरं असेल का? या जगात अशीही माणसं असतील का? वगैरे वगैरे... मग मनापासून एक सॅल्यूट ठोकाल... झालंच तर त्याच्यासाठी टाळीही वाजवाल...! पण त्याला ना आमच्या टाळीची, ना सॅल्यूटची कशाचीच पडलेलीय... थुकरट प्रसिद्धीला तर तो हुंगूनही विचारत नाही. म्हणूनच गेली 15 वर्षं तो या गर्दीत अदृष्यपणे मनसोक्त जगतोय आणि माणसांना जगवतोय देवदूत बनून.
विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातलं कवठाळ... या गावातल्या झोपडीत गरिबीच्या पोटी प्रतापच्या कहाणीचा जन्म झाला... तो 3 वर्षाचा असेल तेव्हा गरिबीनं बाप गिळला. परिस्थितीपुढे पाय खोरुन मेलेल्या बापाचं चित्र मनावर गोंदलं गेलं. ते मिटण्याआधीच आईला कॅन्सरनं गाठलं. तेव्हा प्रताप जेमतेम 11 वर्षांचा होता, म्हणजे चौथीत. चड्डी सावरायच्या वयात घर सावरायची वेळ आली. परिस्थितीच्या चटक्यांनी पोराला अकाली प्रौढ बनवलं. आईला घेऊन फाटक्या कपड्यावर म्हाताऱ्या आज्यासोबत त्यानं मुंबई गाठली.
मरणाच्या दारात उभ्या असलेल्या देशातील लाखो रुग्णांसाठी मुंबई ही शेवटची लाईफलाईन असते. मुंबईच्या गर्दीला विचारत विचारत कसंबसं जे.जे. गाठलं. धर्मशाळेत आसरा मिळाला. डॉक्टरांनी सांगितलं उपचारांसाठी 80 हजार खर्च येईल. म्हणाले, सरकारच्या जीवनदायी योजनेतून 40 हजार मिळतील. मग उरलेल्या 40 हजारांची तजवीज करण्यासाठी प्रतापचा संघर्ष सुरु झाला.
त्याने मुंबईच्या अफाट गर्दीपुढे आईसाठी हात पसरले. जंगजंग पछाडलं. कधी सिग्नलवर, कधी लोकलमध्ये हात जोडून पै पै जमा करायचे आणि औषध गोळ्यांची भरती करायची हे रोजचं काम. आई औषध गोळ्या आणि आईला रोज कॅन्सर खात होता. पण पैशांची तरतूद काही झाली नाही. आईनं प्रतापच्या मांडीवर जीव सोडला. दूर्दैवानं त्याची लढाई आईला जगवू शकली नाही. जिथं जित्या पोटातली आग विझवायला खिशात दमडी नव्हती, तिथं निर्जिव देह जाळण्यासाठी कसलं आलंय कफन आणि कसलं दफन? आई असली तरी. गावी नेणं तर शक्यच नव्हतं. चिमुकल्या प्रतापनं आईचं प्रेत उचललं आणि दादरच्या विद्युत वाहिनीच्या हवाली केलं आणि थकलेल्या आज्यासोबत पुन्हा गाव गाठलं.
मुंबईत असताना वर्षं सव्वा वर्षात त्याने जे पाहिलं, भोगलं, गमावलं त्यातून त्याच्या मनावर खोलवर जखमा झाल्या. त्यातून आलेली अस्वस्थता शांत बसू देत नव्हती. म्हणून त्यानं आयुष्याचं ध्येय्य ठरवलं. आपण आपल्या माय बापाला जगवू शकलो नाही, पण दुसऱ्यांना जगवायचं! याच दरम्यान त्याला कळलं की ओमप्रकाश बच्चू कडू नावाचा एक माणूस आहे, जो रुग्णांना मदत करतो. त्यांच्यासाठी धडपडतो. गाव खेड्यातल्या गरीब लोकांना मुंबईला नेऊन त्यांच्यावर उपचार करतो. प्रताप बच्चू कडूंकडे गेला. बच्चू कडूंनी प्रतापला मुंबईला पाठवलं. जे काम आधी बच्चू कडू मुंबईत येऊन करायचे ते काम त्यांनी प्रतापवर सोपवलं.
विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून पेशंट बच्चू कडूंकडे यायचे. त्यांना ते मुंबईत पाठवायचे. मुंबईत येणाऱ्यांची जबाबदारी त्यांनी प्रतापकडे सोपवली आणि प्रतापची जबाबदारी बच्चू कडूंनी आपल्या खांद्यावर घेतली. मुंबईत पोटाची व्यवस्था झाली. जे करायचं होतं ते काम मिळालं. त्यानं आयुष्य झोकून दिलं.
पहाटे चार वाजल्यापासून विदर्भातून मुंबईत ट्रेन यायच्या. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर ट्रेन थांबल्या की प्रतापचा दिवस सुरु व्हायचा. पहाटे स्टेशनवर जाऊन सगळे पेशंट गोळा करायचे. 30-35 पेशंट, त्यांचे नातेवाईक असा जथ्था घेऊन धर्मशाळा गाठायची. संत गाडगेबाबा धर्मशाळेसह इतर धर्मशाळा या पेशंटसाठी मोठा आधार. 35 रुपयात नाश्ता, दोन वेळचं जेवण आणि राहण्याची सोय व्हायची. बाड बिस्तरा टेकवला की पेशंटच्या आजारांची माहिती घ्यायची. कागदपत्रं गोळा करायचे. हार्टचा पेशंट असेल तर नायर आणि जे.जे, कॅन्सरचा असेल तर टाटा, किडनीचा पेशंट असेल तर केईएम आणि छोट्या मोठ्या ऑपरेशनसाठी जे. जे. गाठायचं. त्यांची तपासणी, अॅडमिशन झालं की सरकारी जीवनदायी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी धडपडायचं.
जीवनदायी योजनेच्या लाभासाठी 20 हजाराच्या उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि ग्रामपंचायतीचा रहिवाशी दाखला लागायचा. पेशंटकडून कागदपत्र घेऊन त्यांच्या फाईल बनवायच्या आणि आरोग्य भवनात दाखल करायच्या. सरकारी मदतीसाठी लालफितीला धडका द्यायच्या. पण दरवेळी नुसत्या सरकारी मदतीवर भागायचं नाही. मोठ्या ऑपरेशनसाठी लाखो रुपये लागायचे. मग मुंबईतल्या सिद्धिविनायक, टाटा सारख्या ट्रस्टच्या दारावर जाऊन हात जोडायचे. त्यातून थोडीबहूत तरतूद व्हायची. अनेकांचे जीव वाचवण्यात या संस्थांनी खूप मोठं योगदान दिलंय.
नव्या फाईल देणं, जुन्यांचा पाठपुरवा करणं यात प्रतापने आरोग्यभवनाच्या अक्षरश: पायऱ्या झिजवल्यात. संध्याकाळी पुन्हा जे.जे., नायर, केईएम, टाटा हॉस्पिटल गाठायचं. पेशंटची विचारपूस करायची. ज्यांना डिस्चार्ज मिळाला त्यांना पुन्हा ट्रेनला बसवून द्यायचं. तिकीटाला पैसे नसतील तर प्रसंगी पदरमोडही करायची. जेव्हा प्रतापकडे माणसं यायची तेव्हा ती अनोळखीची नसायची पण जाताना मात्र त्यांच्याशी नाळ जोडलेली असायची. प्रतापची ही रोजची दिनचर्या.
बच्चू कडू यांच्याकडे 5-6 वर्षं काम केल्यानंतर आरोग्य क्षेत्रात मोलाचं काम करणाऱ्या ओमप्रकाश शेटे यांच्यासोबतही प्रतापनं कामाला सुरुवात केली. विदर्भाबरोबर आता मराठवाड्यातले पेशंटही त्याच्याकडे येऊ लागले. दोन ओमप्रकाशांनी (बच्चू कडूंचं नावंही ओमप्रकाश आहे) प्रतापच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. गेल्या तीन वर्षांपासून प्रताप मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात काम करतोय. ओमप्रकाश शेटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीची दारं पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी खुली झाली. कारण शेटे सरांची तळमळ आणि प्रतापसारखी रक्त आटवणारी माणसं. त्यांच्या सेवेला राजाश्रय मिळाला म्हणून हजारो लोकांचे प्राण वाचले. हा कक्ष घराघरात पोहोचला.
खरंतर आपल्या घरात कोणी आजारी पडलं तर सगळं घर डिस्टर्ब होतं. आपली कितीतरी चिडचिड होते. उबग येतो. आपण वैतागून म्हणतो, दवाखान्याची पायरी चढू नये. पण प्रताप लोकांच्या सेवेसाठी दवाखान्याच्या पायरीवर झिजला. गेल्या पंधरा वर्षात त्याच्याकडे हजारो पेशंट आले. त्या अनोळखी लोकांची आजारपणं तो आपल्या अंगावर वागवतोय. स्वाईन फ्ल्यू, टीबी सारख्या कित्येक पेशंटची सेवा केली पण कधी संसर्ग झाला नाही, कधी काळजीही घेतली नाही. त्यांच्या आजारणाचा त्याला कधीच कंटाळा आला नाही. उलट प्रत्येक पेशंटच्या हृदयात मला देव दिसतो ही त्याची भावना आहे. तो म्हणतो, मरणाच्या दारातून बाहेर आलेल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे. त्यातच समाधान आहे.
पैशांच्या श्रीमंतीनं अनेकदा त्याचं दार ठोठावलं. पण पॅकेजसाठी उड्या टाकाव्या लागतात हा आमच्यातला प्रोफेशनॅलिझम त्याच्यात नाही. कामाबद्दलचं त्याचं समर्पण, प्रामाणिकपणा आणि तळमळ पाहून अनेक मंत्र्यां संत्र्यांनी त्याला मोठ्या पगाराच्या ऑफर दिल्या. काहीजणांनी दिल्ली दाखवायचं स्वप्नंही दाखवलं. पण तो कधी बधला नाही. पैशाच्या मेनकेपुढे त्याची तपश्चर्या कधी भंगली नाही. त्याचं कारण सांगताना तो म्हणतो, ज्यांनी ऑफर दिल्या त्यांच्या मनात भाव नव्हता. मनात भाव असल्याशिवाय सेवा घडत नाही. म्हणून मी कुणाकडे जात नाही. हे सगळं समर्पणाशिवाय शक्य नाही. पैशानं समर्पण विकत घेता येत नाही.
प्रतापकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची एक वेगळी कहाणी असते. ते किडनी, हार्ट, कॅन्सर, मेंदूच्या दुर्धर आजारानं आणि गरिबीच्या रोगानं त्रस्त असतात. गरीब आजारानं कमी आणि पैशावाचून जास्त मरतात हे इथलं वास्तव. अशावेळी जगण्याची धडपड करणाऱ्या माणसांसाठी आणि रक्ताच्या नात्यांनी बेवारसपणे फेकून दिलेल्या प्रेतांसाठीही या माणसांच्या गर्दीत एक देवदूत आहे. त्याचं नाव प्रताप तायडे. रस्त्यावर तडफडणाऱ्यांचे फोटो काढण्यातच धन्यता मानणाऱ्या समाजात प्रतापचं समर्पण वेगळं ठरतं. दखल घ्यायला भाग पाडतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement