(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Blog | ट्रोलिंग चॅम्प्स..
ट्रोलिंग हे आजच्या सोशल मीडियाचं वास्तव आहे, नुकताच 'इंडियन आयडॉल' या रियालिटी शो वर कित्येक कलाकार ते प्रेक्षकांनी शोमध्ये गाण्यावर फोकस करा, प्रेमप्रकरण किंवा सुरू असलेल्या ड्रामेबाजी वर नको असे ट्रोलिंग करत कानपिचक्या दिल्या. सोबतच आजकाल रियालिटी शो हे स्पर्धकांच्या दुःखावर, गरिबीवर चालवले जातात आणि हे प्रेक्षकांनाही हल्ली सहजतेने सहज कळतं, टीका होते पण दरवेळी खिल्ली उडवण्याचा प्रकार किंवा उगाचच त्रास करून लक्ष वेधण्याचा प्रकार नेटिझन्स मुद्दामही करतात; पण हेल्दी क्रिटिसाईज म्हणून याकडं पाहायची देखील गरज आहे हे खूपच जाणवतंय, कारण एखाद्या कार्यक्रम/शो बाबत कित्येक प्रेक्षकांचं नातं-भावना जोडल्या गेलेल्या असतात, अश्यातच तो 'दर्जा' वेशीवर टांगून सुरू असलेल्या चमकोगिरीवर अगदी सहजपणे सोशल मीडियावर चर्चेचा विषय होते, याचं निमित्त ही ताजेचं आहे ते म्हणजे 'सा रे ग म प मराठी लिटिल चॅम्प्स'
'बिग बॉस मराठी' आल्यावर, शोचे होस्ट महेश मांजरेकर यांच्यावर नेटकऱ्यांची 'ट्रोल धाड' झाली, याला कारणही तसंच होतं 'बिग बॉस' या ओरिजल कॉन्सेप्टचे चाहते मराठीमध्ये आलेल्या या सिजन मधील बऱ्याच गोष्टी पसंत करत नव्हते, तसं पाहिलं तर चॅनेलचा दृष्टिकोन आणि तश्या स्ट्रॅटेजीचा नाहक त्रास महेश मांजरेकरांना झाला, ते त्या शो वर होणाऱ्या ट्रोलिंग वर सुद्धा एका एपिसोडमध्ये व्यक्त झालेले आपण पाहिलं!
ट्रोलिंग मग ते एखाद्याने थेट लक्ष करून केलेलं असेल किंवा सोशल मीडियावरील तमाम नेटिझन्सने केलेलं असो; याचं स्वरूप एका धाग्यात बांधता येत नाही. कारण नेटिझन्सला व्यक्त होयचंय, या माध्यमावर नेटिझन्स व्यक्त होत असतात किंवा त्यांच्या दृष्टीने एखाद्या गोष्टीची चुकीच्या बाजूवर टीका केलेली जाते. तशाच चांगल्या प्रतिक्रिया देखील देतात, अश्यातच कित्येक मिम्स आणि असंख्य प्रेक्षकांनी सोशल मीडियावर 'सा रे ग म प चॅम्प्स'च्या सुरू झालेल्या या पर्वावर ट्रोल धाड केली, यापैकी काही फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया पैकी, सध्या साठे-जोशी असं म्हणतात की "सारेगमप लिटिल चॅम्प या कार्यक्रमात जजच्या खुर्चीवर बसलेली पंचरत्नं दिसतात तेव्हा, भातुकली खेळताना आईची ओढणी साडीसारखी गुंडाळल्यामुळे स्वतःला आई समजणारी आठ वर्षांची मुलगी किंवा शिक्षक दिनाच्या दिवशी फुलपॅन्ट फुलशर्ट घालुन शिक्षकांसारखा रुबाब करणारा दहा वर्षाचा मुलगा.. आठवतो'
तर महेश मुळ्ये यांची सुद्धा फेसबुक पोस्ट अगदी विचारात पाडणारी होती ते म्हणतात.. '
'सा रे ग म प मधील सर्व स्पर्धक मुलं, वादक वगळता बाकी सगळाच आनंद आहे, परीक्षक पैकी कोणी अवधूत गुप्ते तर कोणी महेश काळेंची नक्कल करण्यात मश्गुल. सोलापूरच्या राष्ट्रमाता इंदिरा शाळेच्या मुलाचे गाणं सुरू होताच परिक्षकांच्या कायिक आणि गाणं संपल्यावर वाचिक प्रतिक्रिया पाहून मनात तो स्पर्धक रजनीकांतचा धावा करु लागला असेल. परीक्षकांचा उतावीळपणा छोट्यांच्या उत्साहाला मागे टाकणारा ठरेल'
या प्रतिक्रिया अट्टल ट्रोलरच्या नाहीत बरं, चारोळीकार चंद्रशेखर गोखले, यांनी तर चक्क वाहिणीला ग्रहण लागल्याचे म्हणलंय किंवा कोणीतरी खरंच चॅनेल बुडवून टाकायचा विडा उचलला आहे, अशी प्रतिक्रिया फेसबुकवर मांडली.
खरंतर चॅनेल आणि त्यांचे शो त्याची स्ट्रॅटेजी ठरली जाते आणि त्यानुसार ते अमलात आणलं जातं. कदाचित रंजकता यावी म्हणून हलके फुलके विनोदही गरजेचे असतात. पण डोळ्यात आलेलं पाणी, किंवा जजची खुर्ची सोडून स्टेजवर ताल धरायला लावणं हे आतून येणं आणि उद्देशाने करणं किंवा करायला लावणं म्हणूनच काहींची टीका थेट चॅनेल प्रमुखांकडेही वळते. सोबतच बऱ्याच मिम्स कॉमेंट्स सोबत प्रत्येकाचं मत वैयक्तिकरित्या जाणून घेतल्यावर हे नक्की पटतंय की आताचे प्रेक्षक हे किमान मनोरंजन म्हणून रियालिटी शो किंवा कोणत्याही कार्यक्रमाकडे पाहत नाहीत, त्यांना गृहीत धरलं नाही पाहिजे, कारण प्रेक्षकांना सुरू असलेला ड्रामा किंवा शो चालावा म्हणून मुख्य उद्देशाला बगल देत सुरू असलेला 'स्ट्रॅटेजीक कार्यक्रम' मात्र, त्यांचा पसंतीला उतरत तर नाहीच शिवाय मग त्यावर व्यक्त ही होतात!
आता ट्रोलिंग हेल्दी घ्यावी की खरंच काही त्यानुसार आवश्यक बदल करावे का, ही चॅनेलची भूमिका ठरेल! पण 12 वर्षा पूर्वीचे सा रे ग म प लिटिल चॅम्प्स चे 'पंचरत्न' रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि आर्या आंबेकर यांना अशाप्रकारे परीक्षक जज असण्याची भूमिका कोणाला Over acting वाटतेय तर सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे यांच्याही भूमिकेवर तुफान मिम्स, जोरदार ट्रोलिंग सुरू झालंय... कार्यक्रम स्पर्धेत टिकण्यासाठीच्या धडपडीत, नवे प्रयोग नक्कीच स्वागतार्ह आहेत, पंचरत्न असलेल्या जजेस पण त्यांच्या क्षेत्रात नाव मोठं केलेली आहेतच त्याचं मार्गदर्शन प्रेरणा नक्कीच लहान मुलांना प्रेरित करत आलेली आहे. परंतु, 'लिटल' स्पर्धकांचं टॅलेंट मात्र जजेज च्या Over Acting वर झालेल्या ट्रोलिंगमध्ये लपून मात्र गेल्याचं जाणवतंय!
साजूक तुपातले चिमुकले स्पर्धक 'भवऱ्याचा लागलाय नाद..' यासारखी गाणी आणि त्यांना वि-लक्षण जजेसचा मिळणार प्रतिसाद मार्गदर्शक ठरो, सीजनचा पुढील प्रवास कसा असेल हे ही तितकंच पाहण्यासारखं ठरेल आणि यातुन इतर चॅनेल्स त्यांच्या पुढील कार्यक्रमाचे नियोजन करताना असं हसू होणार नाही याची नक्की काळजी घेतील!