एक्स्प्लोर
एकतेचं प्रतिक 'पाणी'
८ मार्च जागतिक महिला दिन… मागच्या वर्षीपर्यंत ऑफिसमध्ये महिलांनी एकत्र येऊन खेळलेले खेळ, किंवा मिळालेलं छोटसं गिफ्ट आणि सगळ्यांनी एकत्र येऊन कापलेला केक… इतकाच काय तो साजरा होणारा महिला दिन. पण यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचं सगळ्यांनीच ठरवलेलं. आमच्या ऑफिसमधल्या आम्ही १५ जणी निघालो होतो जाखणगावात. तिथं पानी फाऊंडेशनच्या मदतीने आम्ही श्रमदान करणार होतो. खरं सांगायचं तर माझ्यासकट अनेकींनी यासाठी नाकं मुरडली होती, महिला दिनाला मस्त स्पा किंवा कुठेतरी डे आऊटला जायचं सोडून कुठे भर उन्हात श्रमदान करायचं? पण ऑफिस व्यतिरिक्त कुठेतरी जायला मिळणार यातचं आम्ही समाधान मानलं. ५ मार्चला शेवटी आम्ही निघालो. निघताना सगळ्याच खूप उत्साही होतो. तसं पाहिलं तर निघताना आमच्यातल्या अनेकिंना एकमेकींविषयी थोडा राग, रुसवा किंवा गैरसमज होते. ज्याला ऑफिसमधले अनेक प्रसंग कारणीभूत होते. पण आम्ही निघालो. आमचा होणारा पुढचा प्रवास खरचं आम्हाला विचारांनी खूप पुढे नेणारा होता.
जाताना खूप गमती जमती झाल्या, गप्पा-गाणी अगदी चालत्या बसमध्ये डान्ससुद्धा झाला. त्यातला अनुभव म्हणजे स्पीकर सुरु होत नसल्याने आमच्यातल्या अनेक मॅकेनिकसुद्धा जाग्या झाल्या. मजल दरमजल करत आम्ही जाखणगावात पोहोचलो. अगदी तुतारी ढोल, लेझीम खेळणाऱ्या मुलांनी आमचं दणक्यात स्वागत केलं. पानी फाऊंडेशनचे अनेक कार्यकर्तेसुद्धा आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी हजर होते. चिमुरड्यांचा डान्स झाला त्यांनी त्यातून दाखवलेल्या क्रिएटिव्हिटीला खरचं हॅट्सऑफ.
गप्पा झाल्या जेवण झालं, उद्या काय काय करणार त्या प्लॅनची आखणी झाली. हे करता करता रात्री २ वाजले होते. सगळ्याजणी सकाळी ५.३० शिवार फेरीला जाण्याच्या भीतीने कधी गुडूप झाल्या कळलंच नाही.
सकाळी आलार्म वाजायच्या आतच अनेक जणी उठून तयार होत होत्या. पुढच्यांना आवरायला मिळावं यासाठी काहीजणी आधीच तयार होऊन रुम बाहेर उभ्या होत्या. सूर्य उगवण्याआधीच आम्ही तयार होतो. कॅमेऱ्यात 'सनराईज'चे शॉट्स मिळावेत याहेतूने आमचं काम सुरु होतं. सूर्य उगवण्याच्या वेळा आम्ही सगळ्या डोंगरावर होतो. समोरुन सगळं नयनरम्य दृष्य डोळ्यात साठवत होतो. येणाऱ्या या सूर्याने आमच्या विचारांमध्ये ही वेगळी उर्जा वेगळी आशा पल्लवीत केली होती. श्रमदानासाठी आमचे रात्रीच गट पाडले होते. आतापर्यंत आपापल्या मैत्रिणी-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये राहणाऱ्या प्रत्येकीच्या गटात ऑफिसातल्या आणि गावातल्या मुलींचा समावेश झाला. कदाचित याच गोष्टी आमच्या पुढे झालेल्या विचार बदलांना कारणीभूत ठरल्या असतील.
शिवार फेरी झाली, ज्या कामासाठी गेलेलो ते श्रमदान झालं. वेगळा अनुभव देऊन जाणारं होतं हे आमच्यासाठी…. श्रमदानामुळे १२५० लिटर पाणी आम्ही खणलेल्या चरामध्ये (खड्ड्यांमध्ये) साचणार होतं हे खरचं सुखावणारं होतं. स्वतःचा अभिमान वाटावा असं काम पहिल्यांदाच माझ्याकडून घडलंय. स्वतःसाठी केलं तर आपल्याला असतो तो र्गव पण सामाजिक कामं केल्यानंतर मिळतो तो निखळ आनंद, हे त्या दिवशी समजलं.
आम्ही केलेलं काम, केलेली धमाल सगळ्यांनीच टीव्हीवर पाहिली अनेकांनी अगदी कौतुकाची थापसुद्धा दिली. पण माझ्यामते आमच्या १५ जणींव्यतिरिक्त कोणालाही जणवली नसेल ती गोष्ट म्हणजे आमची एकमेकांविषयी वाढलेली 'आपुलकी'. जसं जाखणगावात असलेल्या भांडणांना पाण्याने एकत्र आणलं, तसचं आमच्यातल्या काहीजणींमध्ये असलेले हेवेदावे, गैरसमज किंवा राग-रुसवा या पाण्यासाठी केलेल्या कामामुळेच दूर झाला. पाण्यासाठी अनेकदा आपण बायकांची भांडण पाहिली, ऐकली पण या पाण्याने आम्हाला एकत्र आणलंय. या सगळ्या ३६ तासांच्या प्रवासात आम्ही मजा मस्तीच तर केलीच, पण एकमेकींना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या आम्हाला समजल्या. एकमेकींना समजून घेण्याची, त्यांची काळजी करण्याची, त्यांना कामात येणाऱ्या अडचणी आपल्याकडून कशा कमी होऊ शकतात? हे पाहण्याची समज मला वाटंत त्या उगवत्या तेजस्वी सूर्यानेच आम्हाला दिली असावी.
'झालं गेलं ते विसरुन सारं गावाचा विकास करायचं' हे गाणं श्रमदानाच्या वेळी गावकरी म्हणतात. पण 'झालं गेलं ते विसरुन सारं एकमेकींचा विकास करायचं' , हा विचार आम्ही सगळ्याच जणी एकमेकींविषयी ऑफिसमध्ये करु लागलोय.
स्वरदा वाघुले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement