एक्स्प्लोर
मातीतल्या माणसांसोबतचा भन्नाट दिवस
आता मी काय लिहू? व्हॉट्सअपच्या ह्या इमोजीसारखी माझी अवस्था झालीय. ऑफिसमधल्या जवळपास सगळ्याच मुलींनी जाखणगाव, श्रमदान, महिला दिनविषयी लिहिलंय. त्यात आता मी काय लिहू हा प्रश्न पडलाय मला. 'आता मी पण जाखणगावावर ब्लॉग लिहू शकतो, एवढे अनुभव ऐकल्यावर, वाचल्यावर. आणि तो बस ड्रायव्हरच आता ब्लॉग लिहायचा राहिलाय," असं माझा टीममेट मस्करीत म्हणाला. ह्यावरुनच जाखणगावाबद्दल किती जणींनी, किती भरभरुन लिहिलंय याची कल्पना येईल.
असो, तर आम्ही म्हणजे एबीपी माझाच्या १५ मुली महिला दिनाला साताऱ्याच्या जाखणगावात गेलो. बरं आमच्यासोबत धाकड बापू अर्थात संदीप सर, दोन कॅमेरामन होते. एवढ्या मुलींसह प्रवास करणं, फक्त प्रवासच नाही तर त्यांची बडबड ऐकणं खरंच त्यांच्यासाठी मोठा टास्क होता. त्यांनी तो पार पाडला हे महत्त्वाचं.
तर, गावात गेल्यावर आम्ही काय काय केलं हे यामिनी, ज्ञानदा, अनुजा, कोमल, राखी, स्वरदा यांनी लिहिलंय, त्यामुळे मी काही फार लिहिणार नाही. www.abpmajha.in ह्या आमच्या वेबसाईटवर सगळे ब्लॉग वाचता येतील. (तेवढंच वेबसाईटचं प्रमोशन)
बरं महिला दिनाला काहीतरी हटके करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मी महिलादिनाला कळसूबाई शिखरावर गेले होते. तेव्हा आधी खूपच राग आलेला, ज्यांनी हा प्लॅन केला त्याला मनसोक्त शब्दांचे मार दिले, अर्थातच मनातल्या मनात. नंतर समजलं तो प्लॅन माझेच डिपार्टमेंट हेड मेघराज सरांचा होता, सो शब्द परत घेतले, कारण बॉस इज ऑलवेज राईट. पण अनुभव जबरदस्त होता. मी भरकटत चाललेय ना. पुन्हा येते सीधे पॉईंटवर.
पानी फाऊंडेशनचं ट्रेनिंग सेंटर असलेल्या जाखणगावात रात्री उशिरा पोहोचलो. गावच्या लोकांचं आदरातिथ्य, लहान मुलांचा डान्स, सगळंच भारावणारं होतं. हे सगळे सोपस्कार आटोपल्यानंतर पहाटे ५.३० वाजता तयार होऊन मिशन श्रमदानसाठी आम्ही तयार होतो. डॉ. अविनाश पोळ यांच्या प्रयत्नाने जाखणगावाने दुष्काळी ही ओळख बऱ्याच प्रमाणात पुसली. गावातले स्त्री, पुरुष, आबालवृद्ध सगळेच ह्या कामात हिरीरीने सहभागी झाल्यानेच हे शक्य झालं.
गाव एकत्र येणं ही सहज गोष्ट नसतेच. गाव म्हटल्यावर वाद, भांडण, तंटा आलंच. पण हिंदी सिनेमात जशी हिरोची एन्ट्री होते, तशी डॉ. अविनाश पोळ यांची झाली. गावातील दोन्ही वाड्या पाण्यासाठी भांडण विसरुन एकत्र आल्या. डॉ. पोळ यांच्या मार्गदर्शनाने आणि गावकऱ्यांच्या मेहनतीने गावात पाणी आलं. गावातले लोक डॉ. पोळ यांना देवाच्या स्थानी मानतात ते उगाच नाही.
तर, सुखदेव भोसले म्हणजेच तात्यांनी जमिनीचा उतार कसा काढायचा हे सांगितलं. पण हे सगळं मिचेल जॉन्सनच्या बाऊंसरप्रमाणे होतं, डोक्यावरुन जाणारं. हे गणित जर चुकलं तर सगळी मेहनत वाया. म्हणून तात्यांसारख्या हुशार लोकांनी ते काम पूर्ण केलं. मग वेळ आली श्रमदानाची. दोन गटांनी पहिल्या पावसात सुमारे १२५० लिटर पाणी साचेल एवढे चर खोदले. त्यावेळी माझ्या डोक्यात तर "साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठना" हेच गाणं वाजत होतं.
एक सांगायंच राहिलं सुखदेव भोसले यांच्या वेळू गावाने 'सत्यमेव जयते वॉटर कप'च्या पहिल्या मोसमाचं विजेतेपद पटकावलं होतं.
चर खोदण्यासाठी गावातल्या बायका आमच्यासोबत होत्या. सगळ्यांनी हसत खेळत काम केलं. शहरातल्या मुली आणि गावच्या मुली, स्त्रिया ह्यामधली 'पारदर्शक' भिंत कधीच तुटली होती. फक्त त्यांच्यामधलीच नाही तर आम्हा १५ जणींमधली पण. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतो. त्यामुळे फार बोलणं होत नाही. पण जाखणगावच्या निमित्ताने आम्ही दीड दिवस सोबत होतो. त्यामुळे आमची नव्यानेच ओळख झाली होती.
सगळं आटोपल्यानंतर फोटोसेशन झालं. त्यानंतर ग्रुपमधल्या एक ताई म्हणाल्या की, एरव्ही डोक्यावर पदर घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हतो. आम्ही कधीच एवढ्या रात्री बाहेर थांबलो नव्हतो. पण तुमच्यामुळे आम्हाला काही वेळ डान्स करायला मिळाला, मज्जा केली. त्यांची ही प्रतिक्रिया म्हणजे महिला दिनाला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट होतं.
काही जणी तर पहिल्यांदाच सगळ्यांसमोर हातात माईक घेऊन बोलत होत्या. हात थरथरत होते, भावूक झाल्या होत्या. पण एवढ्या लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास त्यांना आमच्यामुळे मिळाला होता.
गावातल्या महिलांचा साधेपणा, सच्चेपणा मनाला भावला होता. तर आमच्याकडून त्यांना मिळालेली प्रेरणा ही मोठी गोष्ट होती. महिला दिनाला जाखणगावातून समाधानाची हीच शिदोरी घेऊन आम्ही पुन्हा मुंबईला रवाना झालो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement