गेले अनेक महिने संपूर्ण देश कोरोनाबाधितांची संख्या कमी कशी करता येईल, या करता रात्र-दिवस झटताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच आहे. एका बाजूला लॉकडाउन मधील शिथिलता वाढवून आर्थिक व्यवहाराची घडी बसवतानाचे राज्य शासन प्रयत्न करीत असताना रुग्णवाढ होणे निश्चितच सध्याच्या घडीला आपल्याला परवडणारे नाही. कारण सध्या राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या पावसाळी आजारांना दुर्लक्षित करून चालणार नाही.


अनेकवेळा हा युक्तिवाद केला जातो की टेस्टिंगचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मात्र, मूळ मुद्दा तसाच राहतो, तो म्हणजे ते टेस्टिंग केल्यामुळे जो रुग्ण निर्माण झाला आहे तो रुग्णच आहे, त्याला उपचाराची, विलगीकरणाची आणि अलगीकरणाची गरज आहेच. त्यामुळे या 'रुग्णसंख्या वाढीला केवळ टेस्टिंग वाढ' जबाबदार असल्याचे साधं लेबल लावण्याऐवजी ती रोखता कशी येईल यासाठीच प्रयत्न केला गेला पाहिजे.


आरोग्य विभागातर्फे जी रोज आकडेवारी जाहीर केली जाते, सहा ऑगस्टच्या आकडेवारीनुसार राज्यात 11,514 नवीन रुग्णांचे निदान झाले असून एक दिवसातील रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उचांक आहे. तसेच 10,854 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 3,16,375 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.94% एवढे झाले आहे. त्याचप्रमाणे 316 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.50% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 24,87,990 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 4,79,779 (19.28 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,76,332 व्यक्ती घरी विलगीकरणामध्ये आहेत तर 37,768 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात सध्या 1,46,305 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.


शहरातील मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे सांगतात की, "रुग्ण वाढ दुर्लक्षित करून चालणार नाहीच हे मान्यच, मात्र नागरिकांनी सुद्धा घराबाहेर पडताना सुरक्षिततेचे नियम पाळलेलेच पाहिजे. कारण जशी मोकळीक मिळत आहे तसे नागरिक घराबाहेर पडत आहे. मात्र, यावेळी आपण कसे सुरक्षित राहू याचा विचार नागरिकांनीच केला पाहिजे. मुंबईमध्ये जर बघितले तर रुग्णसंख्या बरी आहे, यापेक्षा कमी होणे अपेक्षित आहे. त्याकरिता प्रयत्न करत रहावेच लागणार आहे आणि त्यापद्धतीने मुबंईत आरोग्य यंत्रणा काम करत आहे. त्यापेक्षा विशेष म्हणजे एकंदरच आपल्या येथील मृत्यूदर वाढत नाही. हीसुद्धा आपल्यासाठी जमेची बाजू आहे, तो दर आणखी कमी कसा करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. इतर देशाच्या तुलनेने आपला मृत्यूदर खूप कमी आहे. राज्यातील रुग्णसंख्या वाढ बघितली तर आता नवनवीन हॉटस्पॉट तयार होत आहे. ही 'वेव्ह' आहे ती खाली वर होत राहणार आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढीला कोणतेही कारण न देता ती कशी कमी करता येईल याकडे प्रामुख्याने पाहिलंच पाहिजे."


सुरुवातीच्या काळात संपूर्ण देशात मुंबईची रुग्णसंख्या अधिक होती. मात्र, मुंबई महानगर पालिकेने मोठ्या प्रमाणात, खासगी रुग्णालयाच्या मदतीने काम करून ही संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. मात्र, त्या तुलनेने पुणे आणि नाशिक शहरातील रुग्ण संख्या वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट सातत्याने बदलत आहे. शहरातील कोरोना आता ग्रामीण भागात पोहचला आहे. त्याशिवाय आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने काही प्रमाणात काही होईना लोकं एका शहरातून दुसऱ्या शहरात जातील किंवा स्थानिक पातळीवर एकत्र होऊन छोटेखानी स्वरूपात सणांचा कार्यक्रम साजरा करतील. शासनाने या संदर्भातील स्पष्ट सूचना लोकांना दिल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे अन्यथा ही रुग्णसंख्या वाढेल आणि त्यामुळे धोके निर्माण होऊ शकतात.


कोरोनाचे संकट टळलेल नाही हे यापूर्वीच शासनाने जाहीर केलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही फाजील आत्मविश्वास न बाळगता सुरक्षिततेच्या नियमांना धाब्यावर बसवू नये. जर सुरक्षिततेचे नियम पाळले तर रुग्णसंख्येला आळा बसेल परिणामी आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. ज्या पद्धतीने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे आणि त्यातच पावसाळी आजाराची सुद्धा वाढ झाली तर आरोग्याच्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. जरी कोरोना काळात आता सर्वांनीच साधारण आयुष्य जगायचं असे अनेक जण म्हणत आहे पण त्यात आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे.


राज्य शासन विविध उपाय योजना करत आहे. राज्याच्या विविध भागात नवीन टेस्टिंग लॅब उभारल्या जात आहेत. रुग्णांना वेळेत बेड्स मिळावेत जंबो फॅसिलिटी फील्ड हॉस्पिटलची अजूनही नवीन शहरात उभारणी करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.


रुग्णसंख्याचे उचांक येतील, अजूनही येतील मात्र आपण सगळ्यांनीच मिळवून या रुग्णसंख्येचा नीचांक कसा आणता येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे. काही नागरिकांना कोरोना गायब झाल्याचा फील येत आहे, त्यामुळे ते बिनधास्त हिंडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या छोट्या गोष्टी भविष्यात महागात पडू शकतात. कोरोना झाला तर बरा होतो हे तेवढंच खरे असले तरी काही लोकांना तो जिकिरीस आणल्याची उदाहरणे पण आपल्याकडे आहेत. त्यामुळे सध्याच्या या कोरोनाकाळात सुरक्षितता हीच मोठी गुरुकिल्ली हे विसरून चालणार नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग