या वैश्विक महामारीच्या काळात भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तो केरळ राज्यात. जानेवारी महिन्यात कोरोनाचं आगमन या राज्यात झालं तेव्हा इतर राज्यात या संसर्गाबद्दल कोणतीही कुणकुण नसताना मोठ्या 'हुकबीने' या राज्यातील शासनाने आणि प्रशासनाने नवनवीन क्ल्युप्त्या आखून या आजाराशी मोठ्या दिमाखादारीने झुंज दिली. इतर राज्यात ह्या कोरोनाचा हाहाकार होत असताना केरळ देशातील पहिलं राज्य होतं की त्या राज्यात 1 मे ह्या दिवशी कोरोनाचा कोणताही नवा रुग्ण सापडला नव्हता, त्यांच्या या कामगिरीबद्दल त्या राज्याचं देशपातळीवर खूप कौतुकही झालं.


केरळ मॉडेलची चर्चा होऊ लागली. मात्र, कोरोनाच्या भविष्यातील वर्तनाबाबत कुणीही सांगू शकत नव्हते, तेच या राज्यात घडलं. कालांतराने पुन्हा येथे नवीन रुग्ण सापडू लागले. 'आपल्याला रोग्याशी नाही रोगाशी लढायचंय' हे वाक्य डोक्यात ठेवून त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. 'समूहसंसर्ग' हा शब्द काढला तरी इतर राज्ये आणि केंद्रीय सरकार तसं काहीच झालेले नाही, अशी झिडकारून देणारी उत्तर देत असताना, केरळ देशातील पहिलं राज्य आहे त्यांनी स्वतः कबुली दिली की आमच्या एक जिल्ह्यातील दोन गावात समूहसंसर्ग झालेला आहे.


तिरुवनंतपूरम या जिल्ह्यातील दोन गावात समूह संसर्ग झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. एकाच दिवशी केरळ राज्यात नवीन 791 रुग्णांचे निदान झाले आहे. पुनथुरा आणि पुलाविला या दोन गावात सरकारत्मक चाचणी येण्याचे प्रमाण जास्त वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केरळमध्ये 11 हजार 66 इतकी रुग्णसंख्या असून, 4 हजार 995 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत आणि 6 हजार 33 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजारात आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 जानेवारी रोजी केरळ राज्यात देशातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. केरळमध्ये त्रिसूर जिल्ह्यात आढळलेला हा रुग्ण चीन येथील वूहान शहरातील एका विद्यापीठात शिक्षण घेत होता. तेथील प्रशासनाने तात्काळ त्यास तेथील रुग्णाचे अलगीकरण कारण केले आणि उपचारास सुरवात केली होती.


साथीच्या प्रसाराचे तीन टप्पे असतात, त्यात पहिल्या टप्प्यात बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना साथीच्या आजाराचा संसर्ग झालेला असतो तर प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या लोकांना या आजाराची लागण होत असते. दुसरा टप्प्यात स्थानिक प्रसार होतो आणि तिसरा टप्पा म्हणजे म्हणजे कुठलाही प्रवास ना केलेले आणि या बाधित लोकांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात व्यक्तींना होते. या टप्प्यात संसर्गाची लागण समाजामध्ये पसरत असते. या तिसऱ्या टप्यात संसर्गाचा प्रसार कसा होतो, याबाबत छडा लावणे मुश्किल होत जाते. कारण एक विशिष्ट भागात शहरात किंवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसायला लागतात, त्यावेळी समूह संसर्गाला सुरुवात होते असे म्हटले जाते.


दोन मे रोजी, 'देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा' या शीर्षकाखाली सविस्तर लिहिले होते. त्यात केरळ राज्याने कोरोनाशी केलेला यशस्वी लढ्याची त्याची कार्यपद्धतीची माहिती विशद करण्यात आली होती. त्यावेळी केरळ मध्ये एकूण 497 रुग्ण होते, त्यापैकी 392 जण उपचार घेऊन घरी गेले आहेत तर 4 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. तर 101 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत होते. केरळ हे पहिलं राज्य असून त्यांनी त्यांचा कोरोनाबाधितांचा वाढत्या आलेखाची रेषा खाली आणून सरळ ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.


केरळची तुलना महाराष्ट्राबरोबर करता येणार नाही. परंतु, काही चांगल्या गोष्टी घेता आल्या तरी त्या नक्कीच आपल्या फायद्याच्या ठरतील. केरळची लोकसंख्या आपल्यापेक्षा फार कमी आहे, तसेच तेथील साक्षरतेचं प्रमाण 100 टक्के आहे. त्याप्रमाणे तेथील भौगोलीक परिस्थिती आणि आपली परिस्थिती या यामध्ये जमीन आसामानाचा फरक आहे. आपल्याकडे घनदाट लोकवस्तीच्या वस्त्या आहेत, झोपडपट्टीच प्रमाणही आपल्याकडे जास्त आहे. या राज्यातील मोठा वर्ग हा आखाती देशामध्ये कामाला आहे. त्यामुळे कोरोनाचा संकट जगावर ओढावलेलं असताना या बहुतांश नागरिकांनी मायदेशी यायचा निर्णय घेतला. मात्र, येथील प्रशासनाने घेतल्याला खबरदारीमुळे ते कोरोनाला अटकाव करण्यात यशस्वी झाले होते.


त्यावेळी केरळ मेडिकल कौन्सिल, उपाध्यक्ष, डॉ. व्ही जी प्रदीप कुमार, यांनी सांगितले होते की, 'या सर्व गोष्टीचं श्रेय जात ते केरळ प्रशासनाला, त्यांनी आरोग्य व्यवस्थेशी सवांद ठेवून योग्य त्या उपाययोजना केल्या आहे. तसेच लोकसहभाग ही तितकाच महत्वाचा होता. ही लढाई आम्ही सर्व एकत्र होऊन लढलो आहोत त्याचं हे फळ आहे."


भारतातील रुग्णसंख्यने 10 लाखाचा आकडा केव्हाच पार केला आहे. मात्र, अजूनही आपण आपली आरोग्य यंत्रणा देशातल्या संसर्गाची फैलावाची चाचपणी करत असते. ज्यावेळी संबंध देशात आणि राज्यात लॉकडाउन होता, मे महिन्यात त्यावेळी 'सिरो सर्व्हिलन्स' चे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्राने 21 राज्यातील 69 जिल्ह्यात स्वैर (रँडम) चाचणी करण्यात आली होती. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यातील 400 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी (इम्युनोग्लोबीन) एलिसा चाचणी करण्यात आली होती. यामुळे या चाचणी करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या शरीरात प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) निर्माण झाल्या आहे का? त्याचे प्रमाण किती आहे?, तसेच त्यांना यापूर्वीच कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे का? हे कळण्यात मदत झाली होती. याकरिता राज्यातील बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, सांगली या जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. ही चाचणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडीज शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी किटद्वारे करण्यात आली होती.


कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉजिटीव्ह येते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा अशाच स्वरूपाचा सर्वे करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.


केरळ हे राज्य आरोग्याशी लढा देण्यासही विविध ननवीन गोष्टी करत असल्याचे सगळ्यांनीच पहिले आहे. केरळ हे देशातील पहिले राज्य होते त्यांनी या थेरपीची सुरुवात करण्याचं सर्व नियोजना त्यांच्या राज्यातील रुग्णालयात करून ठेवलं होतं. आताही दोन गावात रुग्ण संख्या वाढली असताना समूह संसर्ग झाला आहे, हे खुलेपणाने लोकांमध्ये जाहीर करून टाकले. हा निर्णय छोटा वाटत असला तरी धाडसीच म्हणावा लागेल असाच आहे. याकरिता त्यांनी कोणते निकष वापरले हे त्यांनाच माहित. जनतेला योग्य परिस्थीची जाणीव करून देण्यामागे त्यांचा हा बहुतेक हेतू असावा. त्यामुळे तेथील जनतेने यांचे गांभीर्य ओळखून दक्ष राहणे बहुतांश अपेक्षित असावे. तसेच समूह संसर्गाची घोषणा करून संबंध राज्याला एक प्रकारचा 'अलर्ट' देऊन लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळत राहतील अशी आशा केरळ सरकला वाटत असावी.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग