जे होऊ नये असे वाटत होते तेच होण्याची शक्यता अधिक गडद होत चालली आहे, ते म्हणजे लॉकडाऊन. राज्यात दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वर्षभरापूर्वी विस्कटलेली आर्थिक घडी मात्र काही महिन्यांपूर्वीच व्यवस्थित होत असताना या संसर्गजन्य आजाराने पुन्हा आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. 'येऊन जाऊन सगळेच खापर' नागरिक नियमांचे पालन करीत नाही म्हणून कोरोनारुग्ण संख्येत वाढ झाली, असे म्हणत असले तरी ज्या पद्धतीने या आजराचा संसर्ग पसरत आहे त्यामुळे  राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असले तरी या महामारीचा फैलाव थांबविण्याकरिता लॉकडाऊन हा इतर उपायांपैकी एक उपाय आहे. ज्याचा जगभरात प्रभावीपणे वापर केला गेला आहे. कोरोना बाधितांची अशीच संख्या वाढत राहिली तर मोठ्या संकटांना राज्यातील जनतेला सामोरे जावे लागणार आहे. बाधितांची संख्या थांबविण्याची जबाबदारी नागरिकांच्याच हातात आहे. यापुढचा आणखी काही अनिश्चित कालावधी सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून दैनंदिन आयुष्य जगावे लागणार आहे, त्याला सध्या तरी कुठला पर्याय नाही. 


10 मार्चला आरोग्य विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने जी आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार एकाच दिवसात 13, 659 नवीन रुग्णांचे निदान राज्यात करण्यात आले, तर 54 रुग्णांचा मृत्यू त्या दिवसभरात झाला. त्याशिवाय 9 हजार 913 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर नियंत्रित ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मात्र त्याचवेळी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात जी वाढ झाली आहे ती कमी कशी करता येईल, हीच चिंता सध्या प्रशासनाला सतावत आहे. नांदेड, औरंगाबाद, धुळे,  नागपूर या ठिकाणी काही कालावधीसाठी अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सध्या काही भागात अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी वाढत्या रुग्णसंख्यामुळे राज्यातील आणखी काही भागात अशाच पद्धतीने लॉकडाऊन करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या गोष्टींचा दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम होतो. मोठ्या मुश्किलीने कोरोनाच्या या लढाईतून बाहेर सुटल्याचा आत्मविशास लोकामंध्ये निर्माण झाला होता. कोरोनाची दहशत संपत असतानाच पुन्हा या विषाणूने आपले डोके वर काढले आणि सगळ्यांनाच पुन्हा अस्वस्थेच्या गर्ततेत ढकलून दिले. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे. लॉकडाऊन करायची प्रशासनाची इच्छा नसते मात्र काही गोष्टी ह्या ज्यावेळी हाता बाहेर जात आहे असे वाटत असते आणि त्यांना वेळीच आळा घालणे गरजेचे असते त्यावेळी लॉकडाउन सारख्या उपायांची अंमलबजावणी केली जाते.   


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात जाऊन भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली. राज्यात कोराना लसीकरणाला सुरुवात झाली ती 16 जानेवारीपासून. तेव्हापासून सातत्यानं हा प्रश्न विचारला जात होता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी लस घेणार? आज या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतल्यानंतर राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.


जून 2020चा तो पण एक काळ होता, ज्यावेळी राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण कोरोनाच्या प्रादुर्भावावरील आकडेवारीनुसार केली जात होती, म्हणजेच ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा तीन झोनमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली होती. तो काळ होता एप्रिल महिन्यातील. त्यावेळी आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितचं  प्रमाण नसल्यासारखं होत. मात्र दिवसागणिक परिस्थिती बदलत गेली आणि कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुणे शहराच्या जोडीला अक्खा महाराष्ट्र जोडला गेला. शहरापुरता मर्यादीत असणारा कोरोना आता ग्रामीण भागात चांगलाच पसरलाय. या काळात 'झोन' ची टप्पेवारी कधी नाहीशी झाली ही कोणलाही कळले  सुद्धा नाही . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे झोन ही संकल्पनाच मुळात संपुष्ठात आली. ग्रीन झोन म्हणजे राज्यातील असे  जिल्हे, ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या 21 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही, तर ऑरेंज झोन याचा अर्थ असा होता की, ज्या जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. रेड झोनच तर सांगायलाच नको, मोठ्या संख्यने ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे असा परिसर. सध्या राज्याच्या सर्वच जिल्ह्यात कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यावेळी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर हे जिल्हे रेड झोन मध्ये येत होते.  तर ऑरेंज झोन मध्ये येणाऱ्या ह्या जिल्ह्यात रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड यांचा समावेश होता.  त्याचप्रमाणे  ग्रीन झोन मध्ये येणारे या जिल्ह्यांमध्ये  उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होता.


मार्च 10 ला 'कोरोनावर बोलू काही!' या शीर्षकाखाली सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये,  राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत असताना मात्र याबाबत आजही गांभीर्याने नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत नाही. फक्त माध्यमांनी बातम्या द्यायच्या, आरोग्याशी संबंधित यंत्रणेने कोरोनाच्या अनुषंगाने असणारी दैनंदिन माहिती द्यायची हेच सध्या घडत आहे. मात्र यामधून नागरिकांनी बोध घेऊन त्यावर कृती करणे अपेक्षित असताना तसे फारसे काहीच घडत नाही. काही नागरिक या परिस्थितीला अपवाद आहेत. मात्र आजही नागरिक अनाठायी गर्दी करतच आहे, जी गर्दी टाळणे शक्य आहे. बाजारात गर्दी होतंच आहे. सभा, संमेलन. बैठका हे काही दिवसांकरिता टाळणं हे  प्रतिबंधात्मक उपाय आहे,  तसे करणे  गरज आहे. अजून किती रुग्ण आजरी पडल्यावर आपण स्वतःला शिस्त लावून घेणार आहे. प्रशासन जागृत करण्याचे काम करीत आहे. नागरीक निर्बधांची वाट बघत आहे का? असा सवालही येथे उपस्थित होतो. लॉकडाऊन नकोय अशी सगळ्यांचीच भावना असली तरी जो काही या आजराचा संसर्ग पसरत आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काही तरी उपाययोजना कराव्याच लागतील त्यात अत्यावश्यक सेवा वगळून काही काळापुरती संचारबंदी, वाहतुकीवर नियंत्रण असे उपाय योजिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांनी या आजराला न घाबरता सतर्क राहून या आजरांपासून होणारे संभाव्य धोके आणि आजर होऊ नये याकरिता असणाऱ्या उपाय योजनांवर बोलते राहण्याची गरज आहे, काही होत नाही आता सगळं चांगलं चाललंय ह्या वृत्तीतून बाहेर येऊन  कोरोनावर बोलण्याची वेळ आता पुन्हा एकदा सगळ्यांवर आली आहे.    
    
लॉकडाऊनच्या बातम्या आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चलबिचल पाहायला मिळत आहे, काही जण किराणा सामान भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहे. ज्या ठिकाणी अंशत लॉकडाऊन सुरु झाला आहे. त्या नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. गेल्या वेळी लॉकडाऊन केला होता त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. यावेळी आपल्याकडे या आजाराच्या विरोधातील लस उपलब्ध आहे. त्यामुळे जे नागरिक लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी कोणताही किंतु परंतु न आणता लस घेतली पाहिजे. यापूर्वीच सर्वच वैदकीय तज्ञांनी आपल्याला सध्या ज्या दोन लसींना परवानगी दिली आहे त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात नियम पाळून आपला वावर करणे अपेक्षित आहे. कारण सध्या सगळेच जण कोरोनाच्या या लढाईच्या अंतिम टप्प्यात आहोत. हा टप्पा लवकरच संपेल अशी आशा करण्यास हरकत नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग :