BLOG | कुशल मनुष्यबळाची कोरोनाला 'टोचणी'
'कुशल मनुष्यबळाची फौज' किंवा 'कोविड योद्धा' जर प्रशासनाच्या साथीला मिळाले तर नक्कीच रुग्णांना उपचार करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होणार आहे. संपूर्ण राज्यात विविध आरोग्याशी संबंधित विभागात 20-25 हजारपेक्षा जास्त जागा रिक्त असून ते भरण्याचे 'शिवधनुष्य' या सरकारने उचलले असून त्या जागा कधी भरणार याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळू शकेल.
संपूर्ण देशांबरोबरच कोरोनाचा हाहाकार राज्यात मोठ्या प्रमाणात झाला असून त्यावर मात करण्याकरिता आरोग्य यंत्रणा नवनवीन योजना आखत आहे. सगळ्यात मोठं आव्हान व्यवस्थेसमोर उभं आहे ते रुग्णांना दाखल करून त्यांना उपचार देण्याचं. अर्थव्यवस्था सुरळीत करण्याबरोबर नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी महापालिका शहरात विविध ठिकाणी, तात्पुरत्या स्वरूपाचे शेकडो खाटांचे कोविड केअर सेंटर, स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारत आहे. येत्या किमान 10 दिवसात या तात्पुरत्या स्वरूपाच्या सेंटर्समध्ये हजारो खाटांची व्यवस्था शहरातील विविध भागात करण्यात येणार आहे. या सर्व व्यवस्था निर्माण होत असताना याकरिता लागणारी 'कुशल मनुष्यबळाची फौज' किंवा 'कोविड योद्धा' जर प्रशासनाच्या साथीला मिळाले तर नक्कीच रुग्णांना उपचार करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होणार आहे. संपूर्ण राज्यात विविध आरोग्याशी संबंधित विभागात 20-25 हजारपेक्षा जास्त जागा रिक्त असून ते भरण्याचे 'शिवधनुष्य' या सरकारने उचलले असून त्या जागा कधी भरणार याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळू शकेल.
राज्य सरकारच्या अखत्यारीत सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि नगरविकास खात्यांतर्गत येणाऱ्या महापालिकेतील रुग्णालये या व्यवस्थेतून नागरिकांना आरोग्याच्या विविध सुविधा नाममात्र दारात मिळत असतात. याच व्यवस्थेवर राज्यातील अनेक नागरिक हे अवलंबून असतात. सगळ्यात मोठा नागरिकांचा भर या रुग्णालयावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे या सर्व व्यवस्थेवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. या विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून यामध्ये डॉक्टरांचा पदे असून ती नजीकच्या काळात भरण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. तसेच त्यांनी सांगितले की याकरिता कॅबिनेटची मंजुरी मिळाली असून लवकरच या प्राक्रियेला सुरुवात करू. यामुळे कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य यंत्रणेला नवसंजीवनी मिळणार असून याचा फायदा राज्यातील जनतेला नक्कीच होणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्याशी संबंधित काही संस्था राज्यात असून परंतु त्याचं प्रमाण फारच कमी आहे. राज्याच्या आरोग्य विभागात अंदाजे 15-17 हजार, वैद्यकीय शिक्षण विभागात 8-10 हजार तर महापालिका रुग्णालयात हजारो जागा रिक्त आहेत.
याप्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात की, "सध्या कोरोनाच्या काळातील परिस्थिती पाहता आरोग्य विभागातील कुशल मनुष्यबळाची गरज असून त्याकरिता युद्ध पातळीवर सर्व पदं भरणार असल्याचा निर्णय कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये घेण्याला आला आहे. या प्रकरणात संपूर्ण मंत्रीमंडळ गंभीर असून याची आम्ही तात्काळ अंमलबजावणी करणार आहोत. या प्रक्रियेची सुरवात माझ्या विभागाकडून करणार असून, माझ्या विभागाच्या सचिवांनी यांची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही पदे भरली जाणार आहे. कारण कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज असून यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळणे सुखकर होईल."
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण डॉक्टरांची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केले होते. कारण सध्याच्या घडीला मुंबईत खासगी, महापालिकेची आणि शासकीय रुग्णलयातील बेड्स बऱ्यापैकी कोरोनाबाधित आणि कोरोना व्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांनी भरले आहेत. याकरिता महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपातील कोविड आजाराचे उपचार करण्याकरिता केंद्रांची निर्मिती मुंबई शहराच्या विविध भागात केली आहे. यामुळे हजारो बेड्स उपलब्ध करण्यात आले असून काही ठिकाणी रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहे. उपचार घेऊन नागरिक बरे होऊन घरी जात आहे. या सर्व ठिकाणी काही खासगी तर महापालिकेतील, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे.
काही दिवसापूर्वीच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लष्करातील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले तसेच आरोग्य संबंधित प्रशिक्षण घेऊनही हॉस्पीटलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नोकरीपासून दूर राहिलेल्यांनी सध्याच्या संकटात पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन केले होते. तसेच जे कुणी निवृत्त सैनिक आहेत ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे. अनेक निवृत्त परिचारिका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय सहाय्यकाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल अशा लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असेही सांगितले होते. त्याकरिता खास त्यांनी 'कोविड योद्धा' या नावाने राज्य सरकारने एक इमेल आयडी तयार करून माहिती ही मागितली होती. याचा पुनरुच्चर मुख्यमंत्र्यानी केला असून आता अजून जे कुणी डॉक्टर सेवा देत नसतील त्यांनी समाजहिताकरिता पुढे येणे गरजेचे आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव जरी जानेवारी महिन्यात झाला असला तरी महाराष्ट्रात पहिला रुग्ण मार्चच्या दुसऱ्या आठवड्याला मिळला असून तेव्हापासून ते आतापर्यंत राज्याचा आरोग्य सर्वच पातळीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबर डॉक्टरांची फौज कशी उभी करण्यात येईल याकरिता योजना आखात आहे. इंडियन मेडिकल असोसिअशन ही डॉक्टरांची संस्था यांच्याबरोबर शासनाने बैठक घेतली आहे. खासगी क्षेत्रातील काही डॉक्टर स्वतःहून पुढे येत आहे. या कोरोनावर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर नागरिकांना योग्य उपचार मिळणे गरजेचे असून कोविड योद्ध्यांनी रणांगणात येण्याची हीच ती वेळ असून कुशल मनुष्यबळाने कोरोनाला अटकाव करणे शक्य होणार आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा