एक्स्प्लोर
BLOG | कोरोना विरुद्ध 'नो कोरोना' आजार
'सध्या, आपल्याकडे कोरोना विरुद्ध कोरोनाचा आजार नसलेले रुग्ण या दोन घटकात सध्या देश विभागला गेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनुसार, कोणताही आजार हा छोटा किंवा मोठा नसतो.'
कोरोनाच्या (कोविड -19) विषाणूंनी सध्या अख्या जगात धुमाकूळ घातला असताना, सर्व सामान्य जनतेमध्ये 'आजारापेक्षा उपाय जालीम' अशी काहीशी भावना सध्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे. आज अनेकजण थोडा खोकला किंवा ताप आला तर डॉक्टरकडे न जाता 'ओव्हर द काउंटर' मिळणाऱ्या गोळ्याचा आधार घेत स्वतः उपचार करून घेत आहे. जर या सर्व कोलाहलात आपण डॉक्टरकडे गेलो तर आपली रवानगी 14 दिवसांकरता सरकारी रुग्णालयात होईल यांचीच जास्त धास्ती रुग्णांना वाटत आहे. ''सध्या, आपल्याकडे 'कोरोना बाधित किंवा कोरोना संशयित विरुद्ध कोरोनाचा आजार नसलेले रुग्ण' या दोन घटकात सध्या देश विभागला गेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनुसार, कोणताही आजार हा छोटा किंवा मोठा नसतो.'' प्रत्येक आजारावर वेळीच उपचार केले तर त्याला अटकाव घातला जाऊ शकतो, अन्यथा सुरुवातीच्या काळात लहानसा वाटणारा आजार हा गंभीर रूप धारण करू शकतो, यालाच आपल्याकडे 'अंगावर काढणे' असेही म्हणतात.
आजच्या घडीला बऱ्यापैकी खासगी रुग्णालयांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या नावाखाली आपली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुविधा बंद केली आहे, केवळ अत्यावश्यक सेवा देणारा विभाग सुरु ठेवला आहे. याचा अर्थ जर तुम्हाला अचानक पोटात दुखू लागले तर तुम्ही नियमित जात असणाऱ्या रुग्णालयातील तुम्हाला थेट या विभागात प्रवेश करण्याशिवाय पर्याय नाही. बरं, तुमच्या या वेदनेच्या काळात तुम्हाला थेट प्रवेश नाही, या विभागाच्या बाहेर असणारा सुरक्षारक्षक थर्मामीटर गन घेऊन बसलेला असतो, तो तुमच्यावर रोखून तुमच्या शरीरातील तापमान जर नियमात बसणारे असेल तर आत नाही तर बाहेरचा रास्ता दाखवून दुसऱ्या रुग्णालयात जा म्हणून सांगतो. याचा अर्थ तुम्ही आता शासकीय रुग्णालयात जा असाच असतो. अनेक जण शासकीय रुग्णालयात जाण्याच्या भीतीपोटी अन्य कुठे, कोणते काही वेगळे उपचार मिळतात का याचा शोध घेऊ लागतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची म्हटलं तर उत्तर एकच, 'कोरोनाचा संसर्ग होऊ नये, त्याकरिता केलेली ही उपाय योजना.'
इंडियन मेडिकल अससोसिएशनने केलेल्या आवाहनांनुसार अनेक डॉक्टरांनी वस्त्यांमधले आपले दवाखाने सुरु केले आहेत. स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेत ते सध्या रुग्णांना उपचार देत आहेत. तरीही अनेक प्रश्न उपस्थितीत राहत असून अजूनही काही ठिकाणी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. खासगी रुग्णालयांनी पुढाकार घेऊन आता सरसकट कोरोनासाठी काही बेड राखीव ठेवून तेथेच उपचार देण्याची गरज पुढच्या काळात वाढत जाणार असल्याची सद्य परिस्थिती आहे, अनेक सुशिक्षित आणि सधन घरातील नागरिक शासकीय रुग्णालयाच्या नावाने नाकं मुरडतात. उपचार घ्यायचेत पण खासगी रुग्णालयात असं म्हणणाऱ्यांचा आकडा आता निश्चित माहित नसला तरी त्याला प्राधान्य देणारे बरेच आहेत.
सध्यास्थितीला देशात कोरोनापेक्षा गंभीर आजार असणारे बरेच रुग्ण आहेत, काही जणांना शस्त्रक्रिया करून घ्यायच्या आहे. मात्र ह्या काळात नको म्हणून पुढे ढकलणाऱ्या रुग्णांची संख्याही तशी जास्त झाली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब ह्या रुटीन वाटणाऱ्या आजारांना हलक्यात घेऊन चालणार नाही. त्याचप्रमाणे अनेक जण आज अवयव प्रत्यारोपण करून जगणाऱ्याची संख्या कमी वाटत असली तरी तो आकडा फार महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे पूर्वापार चालत आलेला क्षयरोग ( टीबी ) अशा आणि तत्सम रुग्णांची वैद्यकीय तपासणी ही नियमितपणे होत असते. तर स्त्री रोगाच्या व्याधींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे सर्वाना ठाऊक आहेतच. वरिष्ठ नागरिकांनी तर भीतीपोटी त्यांच्या नियमित तक्रारी करायचं बंद केल्याचं दिसत आहे. लहान मुलांचे आजार, स्वमग्न मुलांचे उपचार, मानसिक व्याधींनी ग्रासलेल्या सर्वच वयोगटातील आजार असणाऱ्या रुग्णांचा या घडीला विचार करण्याची गरज आहे. आज अनेक लोक घरीच छोटे-छोटे उपचार करून काही आजारांवर मात करत दिवस ढकलत आहेत. या व्याधीच्या सर्व रुग्णांना नियमित उपचार मिळणे ही काळाची गरज असून उद्या या रुग्णांचे आजार बळावले तर 'दुष्काळात तेरावा महीना' अशी परिस्थिती निर्माण होईल.
शासनाची आणि महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्यांचं काम व्यवस्थितपणे करत आहे. मात्र त्यांच्याच जोडीला आता खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची ही वेळ आहे. अगदी कुणी काही म्हटलं तरी सत्य हेच आहे की आजही अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत करतात. कोरोनाकडून जर काही शिकता आलं तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करावंच लागेल. या व्यवस्थेवर सध्या खर्च करण्यात येणाऱ्या निधीपेक्षा अधिकचा निधी देऊन सरकारी आणि महापालिका रुग्णालयातील व्यवस्था अत्याधुनिक करणं गरजेचं आहे. सरकारी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर हे निष्णात आहेतच, त्याच्या जोडीला पायाभूत सुविधा जर मिळाल्या तर कुणीही सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यास 'कुरकुर' करणार नाही.
संतोष आंधळे यांचे आणखी काही वाचणीय ब्लॉग
BLOG | फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार
BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय... सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ? BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!BLOG | कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement