एक्स्प्लोर
BLOG | कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही!
कोणत्याही नागरिकांनी कोरोना सदृश्य लक्षण असल्यास शासकीय रुग्णालयास भेट देऊन तपासणी करणं अवश्य आहे. प्रत्येक खोकला, ताप आलेला पेशंटला कोरोना होतोच असे नाही.
ज्या वेगात कोरोनाग्रस्तांचा आकडा जगात आणि देशात वाढत चालला आहे, तसतशी सर्वांच्याच मनात धडकी भरली आहे. आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या कहाण्या ऐकून काही जणांच्या मनात भीती निर्माण झाली असून आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. कोरोना झाला तर योग्य उपचारानंतर रुग्ण बरे होऊन व्यवस्थितपणे घरी जात असल्याचं आपण सर्वानी पाहिलं आहे. कुणी स्वतःहून कोरोना व्हावा म्हणून प्रयत्न करत नाही, कोरोना होणे म्हणजे काय गुन्हा नव्हे मात्र तो लपवणं हे कुठल्याही गुन्ह्यापेक्षा कमी नाही . कोणत्याही नागरिकांनी कोरोना सदृश्य लक्षण असल्यास शासकीय रुग्णालयास भेट देऊन तपासणी करणं अवश्य आहे. प्रत्येक खोकला, ताप आलेला पेशंटला कोरोना होतोच असे नाही. परंतु, डॉक्टर्सनी व्यवस्थित तपासणी केल्यास ते समाजाच्या आणि तुमच्या फायद्याचे ठरेल.
विशेष म्हणजे आपण जर योग्य खबरदारी घेतली तर कोरोना हा काय स्वतःहून होत नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास आणि बेसिक स्वच्छतेच्या गोष्टी केल्यास म्हणजे योग्य वेळी सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ धुणे या गोष्टी केल्यास कोरोना होत नाही. कोरोना हा तसा 'ऍरोगंट' व्हायरस आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, तो तुम्हाला भेटायला स्वतः येणार नाही. मात्र तुम्ही स्वतः त्याला भेटायला गेलात तर तेवढ्याच दिलदारीने तो तुम्हाला मिठी मारेल. त्यामुळे आता आपल्यालाच ठरवायचं आहे त्याच्या बरोबर मैत्री करायची की दुश्मनी.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना संबोधून केलेल्या भाषणात स्पष्ट केले की , कुणीही कोरोनाची आपली लक्षणे लपवू नका. कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवा. कोरोना बरा होतो, कुणी जर परदेशवारी करून आला असाल तर स्वतःहून डॉक्टरांना जाऊन भेटा. कुणीही आपली परदेशातून आल्याची माहिती लपवून ठेवू नका. शासनाची आरोग्य व्यवस्था त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पडत आहे. मात्र यामध्ये नागरिकांची साथ महत्त्वाची आहे.
अगदी सुरवातीच्या काळात ज्यावेळी हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण जेव्हा महाराष्ट्रात सापडले होते, त्यावेळी काही नागरिकांनी त्या रुग्णाच्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याच्या घटना आपण सर्वांनी ऐकल्या आहेतच. मात्र आता बऱ्यापैकी लोकांमध्ये या आजाराची जनजागृती आली आहे. हा आजार असा आहे की, आज जर तो तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला झाला आहे तर उद्या तो तुम्हालाही होऊ शकतो. त्यामुळे अश्यावेळी ज्या कुठल्याही कुटुंबातील सदस्याला या विषाणूचा संसर्ग झाला आहे, अशा वेळी तुमच्या मानसिक आधाराची त्या कुटुंबाला गरज आहे. उगाच त्या कुटुंबातील सदस्यांना कुत्सित नजरेने बघू नका. आरोग्य विभागाच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घ्या. ही खरी माणुसकी दखवण्याची वेळ आहे, आज प्रत्येक जण एका दडपणाखाली जगत आहे. मात्र या सर्व प्रवासात तुम्ही एकटे नसून तुमच्या सोबत संपूर्ण देश आणि विश्व सोबत आहे. याकाळात तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसाल, तशा गोष्टी घडत आहे. मात्र कुठल्याही परिस्थितित घाबरून न जाता एकमेकांना धीर देण्याची गरज आहे.
सतत नकारार्थी विचार मनात आणल्याने त्याचा मानसिक आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तणाव वाटेल अशा गोष्टी काही काळ वाचू नका. सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणत्या प्रकराची काळजी घ्यावी याची माहिती आता पर्यंत तुम्हाला मिळाली असेलच त्यानुसार तुम्ही स्वतः आणि घरच्यांना योग्य ती खबरदारी घ्यायला सांगा. मन प्रसन्न राहील अशा गोष्टीत स्वतःला गुंतवून घ्या, सकारत्मक गप्पा मारा. संकटातही संधी असते, उगाच हताश आणि निराश होऊन जाऊ नका. राज्य शासन योगय पद्धतीने पावलं टाकत असून त्यांच्या या लढ्याला बळ प्राप्त होईल अशा गोष्टी करा. लोकामंध्ये या कोरोना विषाणू विषयीची जनजागृती निर्माण करा.
आज आपण प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या बघितल्या असतीलच, तीन ते चार महिन्याच्या यशस्वी लढ्यानंतर चीन देशाने स्वतःला सावरला आहे. सिंगापुर देशाने वेगळ्या उपाय योजना करून अशा विषाणूशी कसं लढायचं याकरिता सर्व जगामध्ये एक आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. सूर्यास्तानंतर, सूर्योदय हा होतोच, या नैसर्गिक प्रक्रियेची सकारात्मक ऊर्जा घेऊन या कोरोनाच्या संकटावर आपण सर्व मिळून मात केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement