BLOG | संघर्ष : अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद!
अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद या दोन पॅथी मधील वाद हा असा सहजासहजी मिटणारा नाही. प्रत्येक पॅथीचे डॉक्टर आपली पॅथी योग्य आहे याचे समर्थन करत आहेदोन्ही पॅथीची स्वतंत्र अशी ओळख आहे. त्यांची उपचारपद्धती आहे. यात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या आहे.
आज अॅलोपॅथी डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए ) आज देशव्यापी ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आहे, आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम ) अधिसूचनेत बदल करून आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. एका बाजूला आयएमएने भूमिका घेतली आहे की, हा लढा आयुर्वेदाविरोधी नाही किंवा आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधीसुद्धा नाही. त्यांचा विरोध वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणाऱ्या 'मिक्सोपॅथी' विरोधी आहे. दुसऱ्या बाजूला ह्या आयुर्वेदच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्याना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात त्यांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. तर आयुर्वेद शाखेतील मंडळी केंद्र सरकारच्या या निर्णयांमुळे डॉक्टरांच्या सेवेमधील कायदेशीर अडचण दूर झाली असून शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्याना यामुळे शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात कायदेशीर अधिकार अधिक अधोरेखित करण्यात आला आहे. त्यामुळे अॅलोपॅथीच्या डॉक्टरांना, आयुर्वेदाचे डॉक्टर आपल्या प्रांतात घुसू पाहत असून त्यांना घुसू देऊ नका अशी भूमिका सध्याच्या घडीला त्यांनी घेतली आहे. या वादातून सरकार काय तोडगा काढते की आपल्या निर्णयावर ठाम राहते ते येत्या काळात कळेलच.
या दोन पॅथीच्या डॉक्टरांची आपआपली एक स्वतंत्र भूमिका आहे. कोणताही पॅथीचा डॉक्टर हा छोटा किंवा मोठा नसतो. प्रत्येक जण आपआपल्याला मिळालेल्या ज्ञानाच्या आधारवर आपले कौशल्य विकसित करून रुग्णांना उपचार देत असतो. शेवटी रुग्णांनी उपचार घेण्याकरिता कुणाकडे जायचे हे प्राधान्याने त्यांनाच ठरवायचे असते. काही लोकांना ऍलोपॅथीचे डॉक्टर अधिक विश्वसनीय वाटतात तर काहींना आयुर्वेद उपचार हे शरीरासाठी फायदेशीर आहे म्हणून ते त्यांचा मार्ग अवलंबतात. या सगळया प्रक्रियेत त्यांनी त्यांच्या शाखेत जे ज्ञान प्राप्त झाले आहे त्याच्या जोरावर उपचारपद्धती विकसित करणे अपेक्षित असून रुग्णांना ती द्यावी. एकामेकांच्या पॅथीच्या अभ्यासावर अतिक्रमण करणे कुणालाच आवडणार नाही. ज्यांनी ज्या विषयात आपल्याला जे शिकविले जाते त्याचा वापर जरूर केला पाहिजे कारण तो त्यांच्या शिक्षणाचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे भांडण चालू आहे. कायदेशीर लढाया सुद्धा याअनुषंगाने झाल्या आहेत. शेवटी जे नियमाला धरून आहे तेच होणार आहे.
आयएमएने प्रसिद्धीपत्रक काढून त्यांची याविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, आयुर्वेदातील अॅलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचीन आणि महान वैद्यकीय शाखेचा विकास खुंटवेल आणि काही काळात त्याच्या अस्तित्व नाहीसे करू शकेल.कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजे एक नाजूक प्रक्रिया असते जी जीवन आणि मृत्यू यांच्यामधली सूक्ष्म सीमारेषा असते. आधुनिक वैद्यकीय सर्जन शरीरशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आणि अनेस्थेशियाचा सखोल अभ्यास करतो. पदव्युत्तर पदवी मिळवण्यापूर्वी अनुभवी आणि ज्ञानी आणि व्यासंगी प्राध्यापकांच्या हाताखाली शेकडो शस्त्रक्रिया करतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रिया आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याने आणखी काही वर्षे झटून काम करतो, याची तुलना आयुर्वेद अभ्यासक्रमाशी करता येणार नाही कारण त्यातल्या कफ, वात, पित्त अशा भिन्न विचारांच्या मूलभूत संकल्पना आहेत.
तसेच, सीसीआयएमने आधुनिक वैद्यकीय शल्यक्रियांचे नामांतर संस्कृत शब्दात करून आणि या सर्व मूळ आयुर्वेद शस्त्रक्रिया असल्याचा खोटा दावा केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद पदव्युत्तर विद्यार्थी आधुनिक वैद्यकाच्या विविध विशेष शाखांमधल्या शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरणार आहे. थोडक्यात, एकच आयुर्वेदिक वैद्य अॅपेंडिक्सचे ऑपरेशन करेल, तोच किडनी स्टोन, कानाची शस्त्रक्रिया करेल, डोळ्यातील मोतीबिंदूही तोच काढेल, त्याला पित्ताशयातील खडा काढण्याची दुर्धर शस्त्रक्रियाही करण्यास परवानगी असेल आणि तोच रुग्णांच्या दातांची अवघड शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरेल. आधुनिक वैद्यक शास्त्रातील ज्येष्ठ आणि कुशल शल्यचिकित्सकांनाही शस्त्रक्रियेतील एवढ्या विस्तृत निवडीची कायदेशीर परवानगी नाही. आयुर्वेदाच्या वैद्यांना एमएस अशी पदवी मिळणार आहे. यामुळे रुग्णांना आपण तज्ञ एलोपॅथिक डॉक्टरांकडून उपचार घेतो आहोत की सीसीआयएमचा हा कोर्स केलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून हे न समजल्यामुळे गोंधळात पडण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे, सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या 4 समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा. त्याचप्रमाणे आयुर्वेद शाखेची भूमिका आहे, आयुष कृती समितीचे सचिव डॉ आशुतोष गुप्ता यांच्या मते, पहिली गोष्ट , हे स्वतःला मॉडर्न मेडिसिन म्हणून घेत आहे ते चूक आहे ते अॅलोपॅथीचे डॉक्टर आहेत. प्रत्येक पॅथी ही मॉडर्न असते, विविध टप्प्यावर प्रत्येक पॅथी ही नवनवीन बदल करत असते. अनेक आयुर्वेद शास्त्रातील औषधांचा वापर आज ऍलोपॅथीचे डॉक्टर करत आहे. शस्त्रक्रियेचे पितामह म्हणून सुश्रुताचार्यांना सर्व चिकित्सा पद्धतीमध्ये ओळखले जाते. सुश्रुताचार्य यांच्याद्वारे वर्णित विविध शस्त्रक्रिया तसेच त्याचे पूर्वकर्म व पश्चातकर्म गत 40 पेक्षा अधिक वर्षांपासून शल्य व शालाक्यतंत्रातील पदव्युत्तर शिक्षणामध्ये अंतर्भूत आहेत इतकेच नव्हे तर काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आवश्यक ते बदल स्विकारुन त्या शस्त्रक्रिया देशातील व महाराष्ट्रातील विविध आयुर्वेदीय शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर यशस्वी रीतीने केल्या जातात. आमच्या डॉक्टरांच्या सक्षमतेवर प्रश्नचीन निर्माण करण्याचा अधिकार आय एम ए संघटनेला नाही. त्यासाठी शासनाच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. आम्ही त्यांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्हं निर्माण करत नाही. टाके कसे घ्यायचे,कोणत्याआणि कशा प्रकारच्या सुया असाव्यात यांच्यावर सर्वात दीर्घ लिखाण हे आयुर्वेदात आहे. रक्तस्तम्भन प्रकार हा आयुर्वेदातील असून तो अॅलोपॅथीचे डॉक्टर वापरतात.
त्याचबरोबर 'मिक्सोपॅथी', 'खिचडीफिकेशन" अशा शब्दांचा वापर करुन नागरिकांना संभ्रमित करून व शस्त्रक्रियेच्या अधिकाराच्या बाबतीत व प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे शस्त्रक्रियेच्या बाबतीत एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी म्हणावा लागेल.प्रत्येक वेळी संप, काम बंद आंदोलन, निदर्शने यांचा वापर करुन सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन कडून जो प्रयत्न सुरु आहे तो देखील समाजहिताच्या दृष्टीने सर्वथा अनुचित आहे. कोणत्याही शास्त्राच्या एकाधिकाराकरिता संघर्ष करण्याऐवजी भारतीय चिकित्सा पद्धती सहित सर्व चिकित्सा पद्धतीचा सन्मान करावा व सामान्य माणसाला उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्याकरिता एकदिलाने काम करणे आवश्यक आहे व तीच काळाची गरज आहे, यादृष्टीने सकारात्मक विचार करावा असे देखील आयुष कृती समितीचे इंडियन मेडीकल असोसिएशनला आवाहन आहे.
नोव्हेंबर 27 ला, ' आयुर्वेदिक सर्जरी ! ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, गेले काही दिवस राज्यात आणि देशात आता आयुर्वेदातील डॉक्टर सर्जरी करणार ह्या मुद्दयांवर जोरदार चर्चा सुरु आहे, ती म्हणजे विशेष करून डॉक्टर मंडळींमध्ये. सर्वसामान्य नागरिकांना मात्र कुतूहल आहे ते म्हणजे आयुर्वेदिक सर्जरी म्हणजे असणार तरी काय ? कारण आतापर्यंत आयुर्वेदिक उपचार म्हटले की सर्वसाधारण भस्म, चूर्ण किंवा जडी बुटीचे मिश्रण, पंचकर्म आणि शारसूत्र अशी उपचारपद्धती डोळ्यासमोर उभी राहाते. मात्र आयुर्वेदातील शास्त्र हे यापेक्षाही मोठे असून अनेक शतकापासून अस्तित्वात आहे. मॉडर्न मेडिसिन (अॅलोपॅथी) च्या आधीपासून आयुर्वेद औषधाचे उपचार आपल्याकडे आहेत. मात्र कालांतराने आयुर्वेदातील औषधपद्धती मागे पडली आणि ऍलोपॅथीच्या उपचारपद्धती आणि औषधांना प्रचंड मागणी निर्माण झाली.आजही आपल्याकडे आयुर्वेदातील डॉक्टर कार्यरत आहेत आणि ते सुद्धा सर्जरी करतात याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये फारशी माहिती असताना दिसत नाही. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतात असे म्हटले जाते, त्यामुळे आता आयुर्वेदिक सर्जरी कशी असते असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
दोन पॅथी मधील वाद हा असा सहजा सहजी मिटणारा नाही. प्रत्येक पॅथीचे डॉक्टर आपली पॅथी योग्य आहे याचे समर्थन करत आहे. प्राचीन काळापासून सुरु असलेले आयुर्वेद ते आधुनिक काळात निर्माण झालेले अॅलोपॅथी ह्या दोन्ही पॅथीची स्वतंत्र अशी ओळख आहे. त्यांची उपचारपद्धती आहे. ह्या सगळ्या प्रकारात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या आहे. मात्र आजही खेडोपाडी अनेक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. आजही देशात अनेक ठिकाणी सक्षम आरोग्य यंत्रणा पोहचलेली नाही. कोण मोठा, ही लढाई करण्यापेक्षा देशातील जनतेला आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील याचा विचार प्रामुख्याने करणे गरजेचे आहे. शासनाने यामध्ये मध्यस्थी करून सुवर्णमध्य काढून या विषावर तोडगा काढणे काळाची गरज आहे, तसे न झाल्यास ही लढाई अशीच निरंतर सुरु राहील.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | आला थंडीचा महिना, मला लागलाय खोकला!
- BLOG | ये तो होनाही था!
- BLOG | कोरोनाचा सिक्वेल येणार
- BLOG | गुड न्युज! प्रतीक्षा संपली