एक्स्प्लोर

ब्लॉग : सोशल मीडियावरची आवर्तने...

सोशल मीडियाला हाडूक लागते चघळायला. एखादी घटना घडली की तिच्या अनिवार लाटा येतात आणि त्या घटनेचा बहर ओसरला की या लाटाही ओसरतात. मग नवी घटना घडते आणि तिच्या लाटा येतात. या लाटांना काहीही पुरते अगदी 'कटप्पाने बाहुबलीला का मारले' यावरही लोकांनी आपल्या भिंतींवर नक्षी करून ठेवली होती.

सोशल मीडियाला हाडूक लागते चघळायला. एखादी घटना घडली की तिच्या अनिवार लाटा येतात आणि त्या घटनेचा बहर ओसरला की या लाटाही ओसरतात.  मग नवी घटना घडते आणि तिच्या लाटा येतात. या लाटांना काहीही पुरते अगदी 'कटप्पाने बाहुबलीला का मारले' यावरही लोकांनी आपल्या भिंतींवर नक्षी करून ठेवली होती. अण्णा हजारेंनी केलेल्या रामलीला मैदानापासूनच्या ते अगदी परवाच्या कठुआ बलात्कार-खून प्रकरणाच्या लाटा देशाने पाहिल्यात, कळत नकळत यात सारेच सामील झाले. टूजी स्पेक्ट्रम, कोल ब्लॉक, कॉमनवेल्थ, रामदेव बाबाचे फसलेले आंदोलन, आसारामची अटक, निवडणुकीतले सत्तापालट, मोदींचे सत्ताग्रहण, बाळासाहेबांचे निधन, भीमा कोरेगावची दंगल, अखलाकची हत्या, गोरक्षकांचा हैदोस, केरळ-बंगालमधील राजकीय धार्मिक हत्या, निर्भया आणि आता कठुआ- उन्नावची घटना. याच्या जोडीला सणवार, जयंत्या, पुण्यतिथ्या, 'डे'ज, इव्हेंट्स यांची झालर होती. अशा अनेक घटना घडून सातत्याने घडत राहतात. या घटना घडताच ताबडतोब प्रतिक्रिया द्यायला लोक बाह्या सरसावून पुढे येतात, जणू काही आता हे बोलले नाही तर आभाळ कोसळणार ! प्रत्येकाला वाटते की आपण प्रत्येक मुद्द्यावर बोललेच पाहिजे. पण हजारो जण जरी आपलं अकाऊंट बंद करून गेले तरी सोशल मीडीयाला फरक पडत नसतो. पण जो तो आपल्या वकुबानुसारची भाषा वापरू लागतो - युजर्सच्या कॉमेंटस, पोस्ट्स अगदी टोकाला गेलेल्या असतात - "याला चौरंगा केला पाहिजे" - अरे भावा, मग वाट कशाची बघतोस, गाडीला किक मार आणि स्वतःच्या हाताने ते पुण्यकर्म करून ये ना ! "यांची गर्दन छाटली पाहिजे" - बाळ, ही घे तलवार आणि छाटून ये "फोडून काढा यांना" - तू की बोर्डवर बाळंतकळा देत बसणार आणि लोकांना सांगणार की यांना फोडून काढा ! तू का जात नाहीस बाबा ! असं जर यांना कुणी समजावत राहिलं तर लोक त्याचेच डोके खातील तर नाहीतर फोडतील तरी ! या आधीच्या काळात मात्र असे नव्हते. लोक पूर्वीही प्रतिक्रिया द्यायचे पण त्याची माध्यमे वेगळी होती. क्वचित प्रसंगी वर्तमानपत्रात वाचकांची मते वा पत्रव्यवहार वा तत्सम नावाखाली लोक आपली प्रतिक्रिया देत. यातली भाषा सौम्य आणि शालीन होती हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आपल्या देशात जेव्हा वर्तमानपत्रे सुरु झाली तेव्हाचा काळ आणि आताचा काळ यात इतकं मोठं अंतर पडलं आहे, की त्या काळातील काही गोष्टी आता दंतकथाच वाटू लागल्यात. वर्तमानपत्राचा आरंभकाळ त्याच्या प्रकाशनासाठी जितका जिकिरीचा होता त्याहून अधिक दुर्दम्य मेहनतीचा होता. अक्षरांचे खिळे जुळवून हातपाय हलवून चालणाऱ्य़ा मुद्रणयंत्रावर त्याची छपाई केली जायची. एकेक वाक्य जुळवावे लागे मग कॉलम, मग सदर आणि मग पृष्ठरचना होई. पुढे जाऊन डीटीपी, ऑफसेट आणि आताची संपूर्णतः डिजिटल प्रिंटींग मशिनरी आली आणि मुद्रण, प्रकाशन सुलभ झालं. याच्या जोडीला मागील दोनतीन दशकात भरमसाठ वृत्तवाहिन्या जगभरात सुरु झाल्या. वर्तमानपत्रेही देशपातळीवर एकाच वेळी प्रकाशित होऊ लागली आणि विविध भाषा, प्रांताच्या वृत्तवाहिन्याही चोवीस तास बातम्या पुरवू लागल्या. माणसं नुसती भंडावून गेली. पण इथे एक क्रांतिकारी बदल एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी घडला तो म्हणजे इंटरनेटवरून व्यक्त होण्याचा ! पूर्वी वर्तमानपत्रातील, नियतकालिकातील घटना माणूस नुसता वाचायचा. हौशी वाचक 'वाचकांची पत्रे'मधून आपला विचार कळवायचा. पण याचे एकुणात प्रमाण अत्यंत नगण्य होते. विविध वृत्तवाहिन्यांवरील घडामोडी पाहिल्या जायच्या पण त्यावर आपलं मत काय आहे हे कोणालाही मांडता येत नव्हते. दरम्यान सर्व अग्रगण्य वृत्तपत्रांनी इंटरनेट आवृत्तीपासून ‘ई-पेपर’चा उपक्रम सुरु केला मग मात्र बातम्यांची लढाई हातघाईवर आली आणि माणसांना यावर व्यक्त होताना मजा वाटू लागली. गरज ही शोधाची जननी आहे आणि तिचा वेळेवर फायदा घेतला पाहिजे हे आपल्यापेक्षा चतुर असलेल्या पाश्चात्त्यांना अधिक ठाऊक असल्याने त्यांनी जगभरातील लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर व्यक्त होता येईल, अशी डिजिटल प्रसारमाध्यमं बाजारात आणली. हे माध्यम म्हणजेच सोशल मीडिया ! जगभरात स्मार्टफोन बोकाळल्यावर तर सोशल मीडिया अस्ताव्यस्त स्वरुपात जगभरात अक्षरशः फोफावला. एव्हाना त्यातही साठमारी सुरु झाली होती. आधी लॉन्च झालेल्या अॅप्लिकेशन्सनी यात बाजी मारली हे जितके खरे तितकेच हेही खरे आहे की, जे अॅप्लिकेशन्स कामचलाऊ, दिखाऊ होते ते हळूहळू मागे पडत गेले आणि त्यांची जागा परिपूर्ण आणि नव्या पिढीची फोटोजेनिक भाषा बोलणाऱ्या सेल्फीप्रवण अॅप्सने घेतली. बघता बघता लहानथोरांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना याची भुरळ पडली. जिकडे तिकडे स्मार्टफोन आणि त्यात गुंतलेली माणसं नजरेस पडू लागली. 'फेसबुक', 'व्हॉटसअप', 'ट्विटर', 'इंस्टाग्राम', 'लिंक्डइन', 'यूट्यूब', 'स्काईप', 'पिंटरेस्ट' ही नावं लोकांना कधी आणि कशी पाठ झाली ते कळलं देखील नाही. आता तर अशी परिस्थिती आहे की स्मशानभूमीपासून ते मंदिरापर्यंत आणि इस्पितळापासून ते पार्कींग लॉटपर्यंत लोकं कुठेही स्क्रीनवर बोटं सरकावताना नजरेस पडतात. सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन्स, एसटी स्टॅन्ड, रोडवेज, फ्लायवेज, कॉलेजेस आदी जागांवर तर याचा अतिरेक होऊ लागल्याचे दिसून येतेय. आपल्या शेजारी बसलेला जिवंत आहे की 'गेलाय' याचेही भान न राहावे इतके लोक यात रमून गेलेले असतात. आजूबाजूच्यांशी बोलणं खुंटत चाललंय पण आभासी विश्वातील हजारो किलोमीटर अंतरावरील मित्रमैत्रिणीशी मात्र तासंतास लोकं चॅटींग करताना दिसताहेत. त्यातून अनेकदा गमतीजमती घडल्या आहेत तर पुष्कळदा दुर्घटनाही घडल्या आहेत. एकाच घरातील नवरा-बायको फेक आयडीवरून एकमेकाशी चॅट करताना गंडले गेलेत, लग्ने जुळण्यापासून ते घटस्फोट होण्यापर्यंत आणि जीव वाचवण्यापासून ते थेट दंगली, युद्धे भडकावण्यापर्यंतचे गुण सोशल सोशल मीडियाने उधळले आहेत. लोकं सोशल मीडियावर इतकी भाळली याचा बारकाईने अभ्यास केला की लक्षात येते की सोपे कम्युनिकेशन, सहज संवाद, वाढते ताणतणाव, अपेक्षा, स्वप्नांची ओढ यामुळे लोक याकडे ओढले गेले आणि नंतर मात्र आपल्या मनातले प्रेम, माया, आस्था, स्नेह व्यक्त करता करता लोकांच्या मनातील द्वेष, मत्सर, क्रोध, मोह, वासना यांनाही व्यक्त होण्याची संधी मिळाली आणि लोकं काय वाट्टेल ते शेअर करू लागले. मग जगभरात याचे कायदेकानूनही निघाले पण सोशल मीडीयावरील नेटीझन्सनी अद्याप तरी त्याला भीक घातलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जगभरात उमटलेले अक्राळ-विक्राळ स्वरूप हाच सोशल मीडियाचा आताचा चेहरा आहे. आपल्याला न पटणाऱ्या कोणत्याही धोरणाचा निषेध गल्लीतील आपल्या वनबीएचकेच्या फ्लॅटमध्ये बसून कॉमनमॅन करु लागला. आपल्या दारातील झाडांना कधी पाणी न घालणारा जागतिक पर्यावरणावर लंबेचौडे लेक्चर झाडू लागला, पक्षांना छतावर पाणी ठेवण्यापासून ते ह्युमनबॉम्बच्या सुचनेपर्यंतच्या अवाजवी आगंतूक माहितीने उच्छाद मांडला. अध्यात्मिक गुरुंपासून ते देशाच्या उच्चपदस्थांपर्यंत सर्वांनी आपले स्टेटस अपडेट करण्याचा सपाटा लावला आणि बघता बघता असा काळ आला की रस्त्यावरील भिकारी देखील ही साधने हाताळू लागला ! या सगळ्या गदारोळात लहान मुलेदेखील ओढली गेली. मैदाने ओस पडू लागली, ग्रंथालयातली गर्दी कमी होऊ लागली. वृद्धांना देखील या माध्यमाचा टाईमपास म्हणून चांगला पर्याय मिळाला. दुरावलेले मित्र जसे जवळ आले तसे नवे दुश्मनही याने तयार झाले. घरात बसून असणाऱ्या बायकामुलींना तर याचा आधी आधार वाटला आणि पुढे त्याचे व्यसन झाले ! अगदी नगण्य पैशात मिळणाऱ्या अफाट डाटामुळे तरुणाई तर यात इतकी मश्गुल झाली की त्यांना खाण्यापिण्याची भ्रांतही राहिनाशी झाली. इतके सारे घडत असताना उद्योग जगतदेखील यात दाखल झाले. बिझनेस कॉर्पोरेट्सपासून ते चपराशापर्यंत सर्वांचे प्रोफाईल बनले गेले. राजकारणी लोकांनी देखील आपल्या मतदारांपासून ते कार्यकर्त्यापर्यंत आपली सक्रियता दाखवून देण्यासाठी सोशल मीडियाला निवडले. सोशल मिडियावर नसलेला माणूस हा आता 'मागासलेला' समजला जातो की काय अशी वेळ आता आलीय. सोशल मीडिया हाताळण्याची प्रत्येक वयोगटाची पद्धतही अनोखी आणि वेगवेगळी आहे. वय, लिंग, उपजीविका आणि बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबीक जडणघडण यानुसार सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं माध्यम निवडलं जातंय. 'इंस्टाग्राम'बद्दल असं बोललं जातं की स्वतःच्या प्रतिमाप्रेमात पडलेली माणसं जास्ती करून या माध्यमात रमतात कारण इथे अपलोड होणारी फोटोंची संख्या ! टीन एजर्स फोटोग्राफी, सेल्फीविश्व, चित्रसृष्टीशी निगडीत लोकं या माध्यमात खूप रमतात. दिवसभर आपल्या विविध छब्या डकवून त्यावर लोकांच्या रिअॅक्शन जाणून घेणं यात कोट्यावधी युझर्स गुंतून पडले आहेत. मोस्ट फोटोजेनिक अॅप म्हणून याकडे पाहिले जाते. आताच्या यंग जनरेशनपैकी अनेकांच्या पहिल्या लुक्सची सुरुवात इथून होत्येय हे विशेष ! 'इंस्टाग्राम'वर किती फॉलोअर्स आहेत यावरून एखाद्या अभिनेत्रीची क्रेझ ठरते यावरून या माध्यमाची लोकांच्या मनावर असणारी फोटोपकड ध्यानी यावी. 'लिंक्डइन'चा जास्ती वापर मीटिंग्ज, डेली रुटीन शेअरींग, इन्फो मेसेजेस आणि डेटा शेअरिंग सोबतच बिझनेस कम्युनिटीसाठी होतो. त्यामुळे या माध्यमात टीन एजर्स खूप कमी आढळतात, व्यावसायिक आणि नोकरदार माणसे मात्र यात मोठ्या प्रमाणात दिसतात. याचा वापर करून अनेकांनी नवीन मोड्यूल्स तयार केली आहेत. अनेक सेवानिवृत्त लोकांना आपले अनुभव शेअर करण्यापासून ते त्याचे नवे मूल्यांकन मिळण्यापर्यंत अनेक फायदे झाले आहेत. यामुळे हे माध्यम वापरणारे काही विशिष्ट वर्गातले लोक जास्ती आढळतात. 'पिंटरेस्ट' हे माध्यम 'इंस्टाग्राम' आणि 'लिंक्डइन'चे कॉम्बिनेशन ठरावे असे आहे. यातल्या फोटो पीनचा वापर करून काहींनी आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यात यश मिळवलंय. सुरुवातीच्या काळात 'व्हॉटसअॅप'कडे उपयुक्त माहितीप्रसारक माध्यम म्हणून पाहिले गेले पण आता त्याचा राक्षस झाल्याचे पाहायला मिळतेय. अफवा पसरवण्यापासून ते फोटोशॉपद्वारे लोकांना उपद्रव देण्यासाठी, ज्ञानबिडीचा धूर पसरवण्यासाठी याचा वापर होतोय. काही लोक तर चोवीस तास यावर पडीक असतात. लहान बाळाचे बाळूते त्याची आई जशी सातत्याने तपासत राहते तसे हे लोक सतत 'व्हॉटसऍप' ओपन करून काही नवीन तर आले नाही ना याची खात्री करून घेत असतात. कमी शब्दात मनातली मळमळ. तळमळ व्यक्त करण्यासाठी आजमितीला जगभरातील सर्वच क्षेत्रातील अग्रगण्य लोकं 'ट्विटर'चा सढळ हाताने उपयोग करताना दिसतात. सर्वसामान्य माणसेही या टिवटिवाटात सामील होऊन एकमेकाची ट्विटस इकडे तिकडे फिरवत बसतात. एका ट्विटवरून आता देशभरात गहजब उडू शकतो हे अनेकांनी ओळखले आहे तर आपण ज्याचे तोंडही बघत नाही अशा माणसावर आपण तोंडसुख घेऊ शकतो याचे इंगितही याच माध्यमाने अचूक हेरले आहे. ट्विटरवरही टीन एजर्स आणि तरुणवर्ग इतरांच्या तुलनेने कमी आढळतो. फोटोजेनिक 'ट्वीटस' हा फंडाही बरेचजण अवलंबतात. आपल्यापासून दूर असलेल्या लोकांशी लाईव्ह व्यक्त होण्याची संधी 'स्काईप'ने दिलीय. त्याचा फायदा तरुणाई घेताना दिसते. तर क्रूरकर्म्या अतिरेक्यापासून ते नुकत्याच प्रसूती पार पाडलेल्या मातेपासून अख्खं जग 'यूट्यूब'वर ध्वनीचित्रफिती अपलोड करताना दिसतं. 'यूट्यूब'ने जगाला इतकं जवळ आणलं की कुठं जरी खुट्ट वाजलं की त्याची चित्रफीत काही अवधीत यावर आलेली दिसते. शिवाय सिनेमावेड्या लोकांना या माध्यमाचा मोठा लाभही झाला आणि पायरसीचा ब्रम्हराक्षसदेखील इथे उभा ठाकला. 'यूट्यूब'वर वृद्धांचा आणि प्रौढांचा वावर कमी असून तरुण आणि मध्यमवयीनांचे हे आवडते दृकश्राव्य माध्यम आहे. सोशल मीडियात सर्वाधिक वापरलं जाणारं आणि सामाजिक क्रांतीपासून ते तख्तापालट करण्यापर्यंतची ताकद बाळगून असलेलं माध्यम म्हणून आजही 'फेसबुक'कडे पाहिले जाते. ‘फेबु’वर टीनएजर्स येतात पण त्यांचे विश्व मित्र, प्रेम, कुटुंब यात सीमित असते. तर तरुणाई आपलं करिअर, आपले नवजीवन, सहजीवन यावर भरभरून व्यक्त होते. गद्धेपंचविशी ओलांडलेले विवाहित मात्र सर्व विषयांचा आस्वाद घेताना दिसतात. वृद्धत्वाकडे झुकलेले लोक देखील विरंगुळा म्हणता म्हणता यात नकळत रममाण होतात, त्यांचे विश्व त्यांच्या अनुभवाबरोबरच नव्या पिढीला समजून घेणारे असते. जगभरातील विचार, लेखन, चळवळी आणि आंदोलने यांना फेसबुकने एक चेहरा दिला. अनेकांना लिहितं करणारे हे माध्यम खऱ्या अर्थाने सोशल आहे पण तितकेच त्याचे असामाजिक रंग देखील आहेत. कारण यावरही लोक आपले हेवेदावे सोडत नाहीत, आपली अभिव्यक्ती विसरत नाहीत, आपला अभिनिवेश त्यागत नाहीत. सोशल मीडियाने वर्तमानपत्रे बंद पडतील असा कयास मांडणारे मात्र तोंडावर पडले आहेत. कारण, आजही वर्तमानपत्रातील विश्वसनियतेची जागा सोशल मीडियाला घेता आलेली नाही. लोक सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुक्त व्हावेत म्हणून त्याची व्यसनमुक्ती केंद्रे उभी राहिली आहेत. इतकी भयानक वेळ येऊनही वर्तमानपत्रे टिकून आहेत ती केवळ आणि केवळ विश्वास आणि सामाजिक कल्याणकारी भूमिकांच्या जोरावरच. पण अलिकडील काळात काही वर्तमानपत्रेच या समजाला छेद देताना दिसत आहेत. हा कदाचित सोशल मीडियाचा वर्तमानपत्रातला नवा मुद्राराक्षसच म्हणावा लागेल. सोशल मीडियाच्या गणितात म्हणूनच बेरीज कमी आहे आणि वजाबाकीच जास्ती आहे. याचाच परिणाम म्हणून सोशल मीडीयावर ट्रोल्स अस्तित्वात आले. एखाद्याने काही विधान केले की त्याला आडवं लावताना सर्व मर्यादा, सर्व स्तर ओलांडून हीनतेची गलिच्छ पातळी गाठत लोकांची टोळधाड त्या व्यक्तीवर येऊन आदळू लागली. परिणामी त्यातले गांभीर्य, प्रभाव कमी व्हावा आणि पोस्टकर्त्याने पुन्हा वाट्यास जाऊ नये हा यामागचा हेतू. आता तर असा काळ आलाय की अनेक राजकीय पक्ष, संघटना विविध ट्रोल्ससाठी आर्थिक प्रयोजन करून ठेवते जेणे करून विरोधक निष्प्रभ व्हावेत. हा नैतिकतेचा दिवसाढवळ्या होणारा खून आहे ज्याला राजमान्यता मिळाली आहे. या मगजमारीमुळे सर्वसामान्य माणसांची भाषा आणि व्यक्त होण्याची पद्धतही लक्षणीय रित्या बदलू लागलीय. एखादी घटना घडली आणि तिची लाट आली की याचा प्रत्यय सोशल मिडीयाच्या सर्व साधनांवर अनुभवता येतो. अशा वेळी बहुसंख्य लोक नुसते आदेश देत असतात. चाबकाने फोडले पाहिजे, फासावर लटकवा, मारून टाका, हाणा त्याला ! मग तू काय करणार आहेस भावा असा प्रश्न विचारायचा झाला तर सगळी सामसूम ! जे हातापायाचे तोडकाम करतात, हाफमर्डरला भीत नाहीत. ते यातलं एकही वाक्य उच्चारताना पाहिलं नाही. गरजेल तो पडेल काय ? ते न बोलता बिनबोभाट आपलं काम करतात आणि इथे केवळ भडकावणारी लोकंच असतात. म्हणूनच सोशल मीडिया हा वावदुक आहे, बोलभांड आहे. इथे पावलोपावली आढळतील भडकावणाऱ्या लोकांचे कंपू, जे धर्माच्या जातीच्या नावावर भडकावतात आणि आपण दारं खिडक्या बंद करून शब्दांचा खेळ करत राहतात. लोक आपली मान कोणाच्याही हाती देतात. सोशल मीडियामुळे कर्तृत्वशून्य आणि अक्कलशून्य लोकांनाही अनेकांना अक्कल शिकवण्याची नामी संधी मिळाली, तर अशा बिनडोक लोकांना भडकावत ठेवून आपली पोळी भाजत राहिलं की आपला प्रचार आपोआप सुरु होतो हे राजकारण्यांना पक्के ठाऊक असते. कुणी तरी एक बाजूची पोस्ट टाकली की त्याच्या विरोधी टोळीचे लोक हजर होतात, कॉपी पेस्टचे गाठोडे सोबत असते, शिवाय काही व्हिडीओ क्लिप्सही असतात. हे कुणी लिहिले, कधी लिहिले, कशासाठी लिहिले, आपणापर्यंत कसे पोहोचले, व्हिडीओतला माणूस कोण आहे -कुठला आहे - त्याचे नाव गाव काय, तो हे सर्व कुणासमोर आणि कधी बोललेला आहे - कुणी शूट केलंय हे सर्व - यांचे संदर्भ काय, कॉपी पेस्ट मजकूर वा व्हिडीओतल्या माहितीच्या सत्यतेची हमी कोण देणार, ही माहिती पाठवणाऱ्याच्या हेतूंचे प्रयोजन काय असे एक ना अनेक प्रश्न मनी यायला हवेत पण तसं होत नाही. आपल्या विचारसरणीच्या एखाद्या मित्राकडून ते आलेलं असतं आपण बिनडोकसारखे ते फॉरवर्ड करतो. मुळात ही फॉरवर्ड करणारी जी लोकजमात आहे तिचे त्या संबधित विषयावरीळ आकलन किती आणि त्यावरची साधक बाधक माहिती किती याचा काहीच पत्ता नसतो. पण उकळत्या तेलात आपणही काही तरी खमंग तळलेच पाहिजे या भावनेचा मोह अनेकांना आवरत नाही. यातून वाकयुद्ध सुरु राहते आणि सोशल मीडिया अनसोशल वाटू लागतो. सोशल मीडीयावर फक्त इतकंच आहे असे काही नाही, इथे गौरवाची, कौतुकाची, नाविन्याची, प्रेमाची, स्नेहाची आणि आदराची गंधभारीत फुलेही आहेत पण लोकांचा कल फुलांकडे कमी आणि हाडकांकडे जास्ती आहे. कदाचित याला कारणीभूत घटकामध्ये बदलत्या कौटुंबिक जडणघडणीपासून ते उसवत चाललेल्या भोवतालच्या सामाजिक जाणिवांचा समावेश आहे हे विसरूनही चालणार नाही. आपल्याला काय हवे आहे, का हवे आहे आणि काय करायचे आहे याची उत्तरे निश्चित केलेली असली तर सोशल मीडियातली समाजद्वेषी आवर्तने टाळून तो आपल्याला हवा तसा वापरता येतो हे मात्र खरे. निर्णय आपल्यालाच घ्यायचाय.. -समीर गायकवाड
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget