एक्स्प्लोर
जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी
कोणी पिशवी हातात घेऊन नुसतं फाडत होतं. कोणी काळी माती उकरत होतं, कुणी बिया फेकून देत होतं. आवरता आवरता घाम निघाला. पहिला दिवस 'फेकून दिलेल्या मातीसारखा' पार ईस्कटून गेला होता. दुसरा, तिसरा, चौथा, दिवस अशेच हवेत विरले.
"पुढं काही लिहायची शक्ती नाही. हात थरथर कापतायत.....
गाव: वडाळा,
तालुका: उत्तर सोलापूर
जिल्हा: सोलापूर.
"काका! एक विनंती होती."
-"बोला'
"आमच्या शाळेतल्या मुलांनीही पानी फाऊंडेशनच्या स्पर्धेला लागणारी रोपवाटिका तयार केली तर चालेल का?"
- "अच्छा, अतिशय छान उपक्रम होईल हा. मलापण आवडेल आपल्या मुलांनी यात सहभाग घेतला तर. पण एक होतं की मुलांना समजेल का काय आणि कसं करायच आहे ते? त्यांना काही त्रास वगैरे झाला तर? आणि समजा नीट नाही केलं म्हणजे पिशव्या अर्ध्या वगैरे भरल्या गेल्या, बिया नीट नाही टोकल्या गेल्या, पाणी कमी जास्त झालं, रोपं वगैरे जळाली तर? आजवर कशालाच तुम्हाला नाही म्हणलो नाही. आताही माझी खूप इच्छा आहे तुम्हाला होय म्हणायची, पण बघा मुलांना त्रास होणार नसेल तरच करा. बाकी लागेल ते सगळं मी पुरवतो."
"नाही काका, पोरं एकदा समजून घेतलं की नीट करतील. अन त्रास नाही होणार, आम्ही सगळी काळजी घेऊ."
यांना मग शाळेशेजारी जागा अन पिशव्या दिल्या गेल्या, ट्रॅक्टरनं माती आणून टाकली गेली, बिया पुरवल्या गेल्या, पाण्याची व्यवस्था केली गेली. 15 एप्रिल पासनं पोरांला सुट्ट्या लागणार होत्या. 10,000 च्या वर रोपं तयार करायची होती. दिवस अतिशय कमी होते.
"होईल पूर्ण काम असंही एक मन सांगत होतं. 15 फेब्रुवारीपासनं काम सुरू करायचं होतं. दिवस उजाडला. सुरुवातीला मुलांना हे काम स्वतः करुन दाखवावं लागेल. 50 मुलं समोर बसलेली, 70 टक्के पोरांचं लक्षही नव्हतं. पोरानो ही पिशवी अशी घ्यायची, यात अशी हाताने पिशवीत माती भरायची, मग त्या मातीत हे एक एक प्रमाणे गुलमोहर, चिंच, भेडा , तरवड, सीताफळ यांच्या बिया टोकायच्या. मग अजून थोडी माती टाकायची. अन अशी हळूच पिशवी बाजूला , माती न सांडता ठेवायची, नंतर एक गठ्ठा मिळुन सगळ्या पिशव्या अशा वाफ्यात ठेवायच्या. बघा अजून एक करून दाखवतो, लक्ष द्या. अजून एक , अजून एक, अजून एक, अजून एक, 15 वेळा करून दाखवलं, थोडं समजलं असं वाटलं."
आता मुलांनी करायला सुरू केलं.
कोणी पिशवी हातात घेऊन नुसतं फाडत होतं. कोणी काळी माती उकरत होतं, कुणी बिया फेकून देत होतं. आवरता आवरता घाम निघाला. पहिला दिवस 'फेकून दिलेल्या मातीसारखा' पार ईस्कटून गेला होता. दुसरा, तिसरा, चौथा, दिवस अशेच हवेत विरले.
"काकांना आपण होय म्हणलोय, उद्या हे नाही जमलं तर? 'स्पर्धेत पहिलं येणारं गाव' आपल्यामुळं मागं पडंल, 100 प्रश्न मनात घोळ करून घोंगावायले. फक्त 60 दिवसात, म्हणजे फक्त 60 ते 100 तासात 10,000 रोपं, कसं शक्य होणार? काका नाही जमणार, माफ करा, सांगून टाकतो उद्या. आपला प्रयत्न फसला, शेवटी काही झालं तरी हे सत्य होतं, ही सगळी 'मतिमंद' मुलं आहेत, आपणच चूक केली. यातल्या कोणाला बोलता येत नाही, कोणाला चालता. अनेकांना 10 वेळा एखादी गोष्ट तेच-तेच शब्द वापरून सांगितली,, तरच समजते, अशी मुले 10,000 रोपांची वाटिका तयार तरी कशी करणार होती---?? अशक्यातलं काम. कोणाचा IQ 25 तर कोणाचा 30... सगळ्या मुलांचे IQ 25 ते 60 च्या रेंज मधले. उद्या जाऊ काका कडं."
पण या आधी, 5 व्या दिवशी काहीतरी प्रचंड घडलं जे आजवर कधीच झालं नव्हतं. या मुलांपैकी 4, 5 जण ज्यांचा IQ 60 च्या आसपास होता असे आता थोड्या थोड्या पिशव्या भरायला शिकले होते. एक जण हातात पिशवी घ्यायचा, दुसरा त्यात आपल्या हाताने माती भरायचा, मग त्यात बी टोकायचा, अन पिशवी बाजूला ठेवायचा.
या सगळ्या मुलात एक, फक्त 25 IQ असलेला मतिमंद मुलगा होता, ज्याला काईच म्हणजे काईच समजत नसायचं, इव्हन नैसर्गिक विधीसुद्धा तो जागेवरच करायचा, ज्याला 24 तास निगराणीतच ठेवावं लागायचं. त्याला ना बोललेलं काही समजायचं ना इतर काही जमायचं. तो चालायचा ही धडपडत अन तोल जात जात.
पण तो त्या दिवशी अचानक उठला, सगळे पहायला लागले.
कसातरी चालत पडत, पिशव्या ठेवलेल्या तिथे गेला, एक पिशवी उचलली अन ती घेऊन परत चालत धडपडत जिथं ती 4, 5 मतिमंद मुलं पिशवीत माती भरत होती तिथं गेला,, अन हाताने चिमटे चिमटे माती, त्या पिशवीत भरायला लागला.. सगळे शिक्षक इतर मतिमंद मुले अंगावर 'शहारे येणे' म्हणजे नेमकं काय असतं ते आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होते. हा कधीच न उठणारा, काहीच न समजणारा, ज्याला विधीचंही समजत नाही, तो आज अचानक असा कसा करतोय?? हे शक्य नाही. पण सत्य सर्वाना डोळ्यांनी दिसत होतं.
तिथून मात्र पूर्ण चित्र पालटलं. हे सगळं इतकं अविशवसनीय होतं की त्या एकट्या मुलाचं बघून इतर सगळी मतिमंद मुलेही हातात पिशव्या घेऊन मातीच्या ठिकाणी गोळा झाली. जी 4, 5 मुले काम करत होती, त्यांच्या मदतीने , त्यांच्याच शेजारी बसुन एक जण पिशवी धरू लागला, एक जण त्यात माती भरायला अन एकजण बी टोकायला लागला. एका तासात मुलांनी 12 पिशव्या एकदम with quality भरल्या. मग मात्र मागे पाहणं नव्हतं. या मुलांचं एक विशेष असतं त्यांना एकदा एक काम समजलं की ते काम, ते इतका वेळ करतात की ते थांबवायला त्यांना खूपदा सांगावं लागतं, अक्षरक्ष: उठवून आणावं लागतं.. म्हणजे त्यांना कोणी थांबवलं नाही तर ते दिवस अन रात्र, पुढचा दिवस अन रात्र, अन असं महिना, वर्ष तेच एक काम करत राहू शकतात. त्या दिवशी सर्वाना थांबवलं.
अन आता थोडी आशा आली होती.
रोज दोनशे पिशव्या भरल्या तर 60 दिवसात 10,000 पिशव्या होणार होत्या. गावची लोकसंख्या 5140, रोपवटिकेचं स्पर्धेचं टार्गेट होतं 10,000.
रोज काम सुरू होतं. 12 सुद्धा पिशव्या आता थोड्या वाटत नव्हत्या, दुसरया दिवशी मुलांनी परत 130 पिशव्या भरल्या, तिसऱ्या दिवशी 250, चौथ्या दिवशी 200, पाचव्या दिवशी 600, सहाव्या दिवशी 170, आठव्या दिवशी 900,
आज 15 एप्रिल उजाडला. उद्यापासून मुलांची सुट्टी होती. अन पिशव्यांची संख्या झाली होती.....
.
.
.
.
19,000!
पुढं काही लिहायची शक्ती नाही. हात थरथर कापतायत..............................
सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग :
श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई
सलाम दोस्तहो...
...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...!
द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement