एक्स्प्लोर
नकोशा केसांवर कायमचा उपाय, लेजर ट्रीटमेंट!
नकोशा केसांपासून आयुष्यभरासाठी सुटका मिळवणं शक्य आहे. त्यासाठी रामबाण उपाय आहे 'पर्मनंट हेअर रिमूवल लेजर ट्रिटमेंट'.

चेहऱ्यावरची लव म्हणजेच नकोसे बारीक केस ही बऱ्याच स्त्रियांना सौंदर्यात बाधा आणणारे वाटतात. मग असे नकोसे केस लपवण्यासाठी कुणी ब्लीच करतं, तर कुणी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगचा पर्याय निवडतात. पण हे सगळं करण्यात बराच वेळ जातो आणि पैसेही. त्यात वारंवार ब्लीच केल्याने कालांतराने चेहरा काळवंडण्याच्या तक्रारी सुरु होतात. तर थ्रेडिंग आणि वॅक्सिंगमुळे नंतर नंतर त्वचा सैल पडते.
पण या नकोशा केसांपासून आयुष्यभरासाठी सुटका मिळवणं शक्य आहे. त्यासाठी रामबाण उपाय आहे 'पर्मनंट हेअर रिमूवल लेजर ट्रिटमेंट'.
20 ते 25 मिनिटांच्या फक्त 5 ते 7 लेजर सिटिंग्जमध्ये तुम्ही या नकोशा केसांपासून कायमची सुटका मिळवू शकता. पण महिलांच्या मनात लेजर ट्रिटमेंटबद्दल बऱ्याच शंका कुशंका असतात. त्यामुळे एक एक मुद्दा घेऊन त्यावरची उत्तरं बघू..
* लेजर ट्रिटमेंट म्हणजे नक्की काय? त्याने नक्की नकोसे केस कायमचे जातात का?
होय.. पर्मनंट हेअर रिमुव्हल लेजर ट्रिटमेंटमुळे चेहऱ्यासोबतच शरीराच्या कोणत्याही भागावरचे नकोसे केस तुम्ही कायमचे घालवू शकता. लेजर ट्रिटमेंटमध्ये एका विशिष्ट क्षमतेच्या लेजर बीमचा मारा चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील नको असलेल्या भागावर केला जातो.. ज्यामुळे त्या केसांची मुळं नष्ट होतात आणि नंतर पुन्हा कधीच त्या ठिकाणी केस येत नाहीत.
पर्मनंट हेअर रिमूव्हल ट्रीटमेंटमध्ये अशा 5 ते 7 सिटिंग्ज/टप्प्यात केल्या जातात. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 7 वेळा क्लिनिकमध्ये जाऊन ही लेजर ट्रिटमेंट घ्यावी लागते. पहिल्या सिटिंगमध्येच सगळ्या केसांच्या मुळांवर लेजरचा मारा झाला असेल असं होत नाही. विशेष म्हणजे लेजर ट्रिटमेंटमध्ये सुरुवातीला जे राठ आणि मोठे केस असतात त्याची मुळं पहिल्यांदा मरतात आणि जी लव अगदी बारीक आणि नाजूक असते ती जास्त चिवट असते. त्यासाठी पुढच्या लेजर सिटिंग्ज घ्याव्या लागतात.
पहिल्यांदा लेजर ट्रिटमेंट झाली की सरासरी 15 दिवसांनी दुसऱ्या सिटिंगसाठी बोलावलं जातं. कारण तोवर उरलेल्या किंवा राहिलेल्या केसांची वाढ व्हायला सुरुवात झालेली असते. दुसरी लेजर सिटिंग झाली की चेहऱ्यावरची लव अजून कमी होते. मग तिसरी सिटिंग महिनाभराने, चौथी 2 महिन्याने, पाचवी 3 महिन्यांनी अशा अंतराने घ्यावी लागते. हळूहळू चेहऱ्यावरची लव गायब झालेली दिसते. कारण त्या नकोशा केसांची मुळं नष्ट झालेली असतात.
* पर्मनंट हेअर रिमूव्हल लेजर ट्रिटमेंटचे फायदे काय?
1) नकोसे केस कायमचे घालवता येतात. ट्रिटमेंटनंतर नकोसे केस कधीच उगवत नाहीत.
2) वारंवार ब्लीच, थ्रेडिंग, वॅक्सिंग करुन त्वचेची होणारी ओढाताण थांबते. वेळ वाचतो.
3) लेजर ट्रिटमेंटमुळे नकोसे केस उगवायचे बंद होतात, कालांतराने तिथली छिद्रही बंद होतात. त्यामुळे त्वचा अधिक मऊ, नितळ, तजेलदार होते..
4) आपल्या त्वचेमध्ये कोलाजीन नावाचा एक घटक असतो. लेजर रेजच्या माऱ्याने आणि त्यातून मिळणाऱ्या उष्णतेने तो उत्तेजित होतो आणि त्यामुळे त्वचा अधिक उजळ आणि तजेलदार होण्यास मदत होते.
5) थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करताना होणारा त्रास लेजर ट्रिटमेंट करताना होत नाही.
* पर्मनंट हेअर रिमुव्हल ट्रिटमेंटबद्दलचे समज-गैरसमज
या ट्रिटमेंटबद्दल बऱ्याच क्लिप सोशल मीडिया किंवा यूट्यूबवर बघायला मिळतात. ज्यात लेजर ट्रिटमेंटचे कसे दुष्परिणाम झाले, त्यामुळे त्वचा जळाली किंवा काळी पडली, चेहऱ्यावर किंवा शरीरावर व्रण आले असं बघायला मिळतं. पण ते सगळच खरं नाही. याबद्दल आम्ही त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पूर्णिमा म्हात्रे यांना विचारलं असता त्यांनी बरीच माहिती दिली.
"लेजर ट्रिटमेंट त्वचारोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सगळी खबरदारी घेऊन आणि तुमच्या त्वचेची पूर्ण काळजी घेऊनच केली जाते. लेजर ट्रिटमेंट करताना खूप त्रास होतो हेही खरं नाही. जेव्हा लेजर बीमचा मारा चेहऱ्यावर होतो तेव्हा सुरुवातीला मुंगी चावल्यासारखा भास होतो आणि किंचित उष्णता जाणवते. पण चेहऱ्यावर जेल लावल्याने आणि कुलिंग सेन्सेशन देत असल्याने अजिबात भीती वाटत नाही. उलट थ्रेडिंग आणि वॅक्सिंगपेक्षा खूपच आरामदायक अशी ही लेजर ट्रिटमेंट आहे."
पुढे डॉक्टर पूर्णिमा म्हणाल्या की, "वयाच्या 13 वर्षापासून नंतर कधीही पर्मनंट हेअर रिमूव्हल लेजर ट्रिटमेंट घेता येते. आज काल महिलाच नाही तर पुरुषही अशा हेअर रिमुव्हल लेजर ट्रिटमेंटला पसंती देत आहेत. हिंदी मराठी चित्रपटातील कलाकार, मॉडेल्स या सर्रास अशा ट्रि्टमेंट एकदाच करुन घेतात आणि आयुष्यभराच्या कटकटीपासून वाचतात."
* ही लेजर ट्रिटमेंट खिशाला परवडणारी आहे का?
खरं सांगायचं तर क्वालिटी गोष्टी मिळवण्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागले तरी चालतं. त्यापैकीच एक लेजर ट्रिटमेंट आहे असं म्हणावं लागेल. कारण विचार करा, वयाच्या 18 वर्षापासून ते किमान 45 वर्षापर्यंत आपण थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करतो.. म्हणजे किमान महिन्यातून एकदा अर्धा तास म्हटलं तर वर्षाचे 6 तास होतात. आणि वयाच्या 45व्या वर्षापर्यंत आपण सरासरी 162 तास नको असलेले केस घालवण्यासाठी घालवतो. आणि एका वेळचा खर्च सरासरी 80 रुपये जरी पकडला तरी 18 वर्षापासूनचा हिशेब होतो तब्बल 26 हजार किंवा त्याहून अधिक. पण त्यात अजून 10 हजार घालून तुम्ही एकदाच लेजर ट्रिटमेंट केली तर तुमची आयुष्यभराची कटकट जाते आणि पार्लरला जायचे 162 तास वाचतात.. तेव्हा लेजर ट्रिटमेंट आपल्याला फायद्याचीच ठरु शकते.
तेव्हा नकोसे केस लपवण्यासाठी किंवा घालवण्यासाठी तासंतास पार्लरमध्ये घालवण्याची गरज नाही. काळाची पावलं ओळखा आणि नव्या तंत्रज्ञानाची कास धरुन नकोशा केसांपासून कायमची सुटका मिळवा.
रेश्मा साळुंखे, प्रतिनिधी, मुंबई
VIDEO:
View More


























