Past Lives (2023) पास्ट लाइव्स - व्यक्त-अव्यक्त प्रेमाची गोष्ट
Past Lives (2023): ऑर्थर (नवरा) - तो तुला आवडतो का?
नोरा (बायको) - माहित नाही? लहानपणी आवडायचा.
ऑर्थर - मला हे एखाद्या कादंबरीसारखं वाटतंय. लहानपणापासून प्रेम करणाऱ्यांमध्ये मी आलोय. कबाब में हड्डी टाईप. (नवरा लेखक आहे.)
नोरा - तू असा का विचार करतोयस? मला तो तेव्हा आवडायचा, आता नाहीय तसं.
ऑर्थर - या स्टोरीत तुझा एक्स-लवर आला म्हणून तू मला सोडून जातेयस, असं घडलं असतं
नोरा - तो काय माझा एक्स लवर नाही.
ऑर्थर - आपण दोघे आर्टिस्ट स्टेमध्ये भेटलो, एकटे होतो, जवळ आलो. सेक्स केला. पैसे वाचावेत म्हणून एकाच घरात राहिलो. ग्रीन कार्ड हवं म्हणून लग्न केलं. त्या आर्टिस्ट स्टेमध्ये तुला कदाचित दुसरा कुणीही भेटला असता. तो कदाचित तुझ्यासाठी जास्त कंपॅटेबल असू शकला असता.
नोरा - मला नाही वाटत, असं प्रत्यक्ष आयुष्यात घडत नसतं.
ऑर्थर - हो पण, आता या घडीला तू त्याच्यासोबत या बेडमध्ये असू शकली असतीस.
नोरा - हे माझं आयुष्य आहे आणि मी तुझ्यासोबत आहे.
ऑर्थर - कोरिया सोडलंस तेव्हा तुला हेच हवं होतं का? या घडीला एका अमेरिकन ज्यू मुलासोबत या बेडमध्ये तू आहेस, हेच स्वप्न तू आणि तुझ्या आईवडिलांनी पाहिलं होतं. का?
नोरा - माझ्या निर्वासित कोरियन फॅमिलीच्या अमेरिकन ड्रीमचं तू उत्तर आहेस, असं तुला वाटतंय का? आज मी इथं आहे. बस, माझ्यासाठी एव्हढं, हेच आहे.
तो अलगद तिच्या मिठीत शिरतो. तिच्या हाताची पकड घट्ट होत जाते.
कोरियन-अमेरिकन दिग्दर्शिका सेलीन सॉन्गच्या पास्ट लाइव्स (2023) मधला हा सीन आहे. बायको अर्थात नोराचा लहानपणीचा मित्र ह्यू संग कोरियाहून आलाय. त्याला ती आवडायची हे नोराला माहितेय. गेल्या 30 वर्षांमध्ये ते दोनदा कनेक्ट झालेत. सेऊल (कोरियाची राजधानी) मध्ये ह्यू नोराचा शेजारी होता. शाळेत ये-जा एकत्र, वर्गात बसणं ही आजूबाजूला. अजाणत्या वयात त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होणं नैसर्गिक आहे. पण ते 10-12 वर्ष वयातलं अव्यक्त प्रेम होते. ते झालंय म्हणजे नक्की काय हे कळण्याची अक्कल तेव्हा नव्हती. नोराची फॅमिली अमेरिकेला जाते. या छोट्याशा लव स्टोरीचा दि एंड होतो. पुन्हा भेटतात 10-12 वर्षांनी. सोशल मीडियावर. मग सतत ऑनलाईन भेटतात. त्याचं अमेरिकाला येणं किंवा तिचं कोरियाला जाणं होत नाही. तिला सिरीयस नाटक लेखन करायचंय. त्यासाठी डिस्ट्रॅक्शन नकोय. त्याच्यासाठी वेगळी होते. आता 12 वर्षांनी दोघांनी वयाची तिशी पार केलीय. आप-आपल्या क्षेत्रात सेटल आहेत. नोरा आता मॅरीड आहे. ह्यूचं ब्रेकअप झालंय. तो फक्त तिला भेटायला आलाय. या भेटीनंतरचा नोरा आणि तिचा लेखक नवरा ऑर्थरला मधला वरचा डायलॉग आहे.
एखादं पुस्तक 10-12 वर्षांनी पुन्हा वाचलं तर ते तसंच असतं का? याचं उत्तर कदाचित नाही, असू असेल. पुस्तक तेच असतं. इतक्या वर्षात वाचणाऱ्याचं भावविश्व बदलतं. आधी आवडलेलं पुस्तक नव्यानं वाचताना पु्न्हा तेव्हढीच एक्साईटमेंट देईल, याची शास्वती नाही. कदाचित आधी न आवडलेलं पुस्तक आता नव्यानं आवडू शकतं. मधल्या काळात अनेक पुस्तकं नजरेखालून गेलेली असतात. पुस्तक आणि वाचकामधलं हे नातं अगदी पर्सनल असतं.
पुस्तकाचा नियम नोरा किंवा अशा प्रसंगात असलेल्या एखाद्या व्यक्तिला लागू होऊ शकतो का? तो किंवा ती 10-12 वर्षांनी भेटली तर? आधी आवडलेली ती किंवा तो पुन्हा भेटला तर? त्याच्याबद्दल वाटणारं आकर्षण तसंच कायम राहिल का ? आता आली का पंचाईत. मामला दिलाचा आहे. चाहतचा आहे. पुस्तकाचा नियम इथं लागू व्हायला काय हरकत आहे. माणूस आणि त्याच्या भावना, मग त्या वस्तू असोत की हाडामासाचा माणूस दोन्हींबद्दल समानच असतात.
नोरा आणि ह्यूचं इतक्या वर्षांनी भेटणं, भटकत राहणं हे पाहिल्यावर ऑर्थरचं इनसिक्युर होणं सहाजिकच आहे. पण त्याची विचार करण्याची पध्दत अमेरिकन आहे. नोरा अर्धी कोरियन अर्धी अमेरिकन आहे. थोडीसी कन्फ्युज आहे. लेखिका आहे. अगदी मोठी नाही पण थोडं नाव आहे. अशावेळी ती काय निर्णय घेईल, हा प्रश्न आणि उत्कंठेभोवती सेलीन सॉन्गचा पास्ट लाइव्स (2023) सिनेमा रेंगेळतो. त्यांचं रेंगाळणं एक्सायटिंग आणि त्याचवेळी प्रचंड डिस्टर्ब करणारं आहे. हे तिघे आता पुढं काय करणार याबद्दल जबरदस्त उत्सुकता आणि त्याचा ताण तोवर प्रेक्षकांवर येतो आणि मग कथानक शेवटाकडे जातं. तो अनपेक्षित आहे, शॉकिंग आहे, असा काही भाग नाही. तोवर प्रेक्षक इमोशनली नोराशी कनेक्ट झालेला असतो. आता शेवटाला त्याला नोराच्या निर्णयाची अपेक्षा असतो. तेव्हा कुठं त्याला चैन पडणार असते. शेवटानं किती प्रेक्षकांना काही तरी भन्नाट पाहिल्याचा आनंद मिळतो. किंबहुना ती प्रक्रिया एन्जॉय करण्याची प्रक्रियाच जबरदस्त आहे. म्हणून पास्ट लाइव्स (2023) वेगळा ठरतो. सिमेनॅटीक आणि इमोशनल या पातळी दोन्हींवर.