अगोदरच्या लॉकडाउनने बऱ्याच लोकांचं कंबरडं मोडलय, अनेकांचा रोजगार गेलाय, अनेकांना कामावरून अचानकपणे काढून टाकलंय, व्यवसायात मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे आता 'लॉकडाउन' या शब्दाने नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाची लढाई आता लॉकडाउनपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर लढली गेली पाहिजे. कठोर निर्बंध, नियम, काही ठिकाणी सक्ती याचा आधार घेऊन आपण कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी प्रमाणात वाढत असली तरी अजूनही परिस्थतीती आटोक्यात आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवेशासंदर्भात जी नियमावली केली गेली आहे, त्याचे पालन होणे गरजेचे असून एकही प्रवाशी नियम तोडता कामा नये.


टेस्टिंगची संख्या वाढवून सगळ्या सुपर स्प्रेडरची चाचणी केली गेली पाहिजे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेलाच पाहिजे. यापुढे काही नागरिकांना जे नियम धाब्यावर बसवतात त्यांना कायद्याचा धाक दाखवून नियम पाळण्यासंबंधी सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. या आणि अशा सर्व गोष्टी पाळल्या गेल्या तर आपल्याकडे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास फार मोठी मदत होणार आहे. प्रशासनाच्या या कामासाठी नागरिकांनी खुल्या दिलाने साथ देऊन या कामी मदत केली पाहिजे. कारण आता प्रतिबंधात्मक उपाय हीच कोरोनाच्या विरोधातील यशस्वी गुरुकिल्ली ठरणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार यावर जोरदार चर्चा चालू आहे आणि ती रास्त सुद्धा आहे. कारण काही दिवसापूर्वी कोरोनाबाधितांची रुग्णसंख्य्या कमी झाली असताताना पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी शाळा उघडण्यात येणार होत्या. मात्र, कोरोना वाढण्याच्या धास्तीने त्यास शाळा चालू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. नागरिकांना इतक्या दिवसाच्या त्या कोंदट वातावरणातून सुटका मिळल्यानंतर त्यांना बाहेर पडावेसे वाटणे साहजिकच आहे. मात्र, बाहेर पडताना सुरक्षिततेचे नियम तितक्याच उत्साहाने पाळणे गरजेचे आहे. नियम हे लोकांच्या सुरक्षितेकरिता आहे ते पाळले गेले तर त्याचा फायदा लोकांनाच होणार आहे.


सुरुवातीच्या काळात नकळत ज्या चुका झाल्या त्या आता पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. गेल्या नऊ महिन्याच्या अनुभवांवरून प्रशासनाला बऱ्यापैकी गोष्टी अवगत झाल्या आहेत, कोणत्या गोष्टी केल्या तर कोरोनाचा संसर्ग होणार नाही. लॉकडाउनमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढणारी रुग्णसंख्या कमी होण्यास नक्की मदत होईल. परंतु, ते थोड्या काळापुरतेच असेल कारण पूर्ण वेळ लॉकडाउन हे उत्तर असणार नाही. कधी ना कधी तो उठवावाच लागतो. मागच्या अनुभवावरून आपण जर प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर दिला तर लॉकडाउन न करता व्यवस्थित कामकाज करणे शक्य होणार आहे.


देशात अनेक राज्यांमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंटेन्मेंट, सर्व्हेक्षण आणि दक्षता यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. या मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 दरम्यानलागू असणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी ज्या शहरात आठवड्याला पॉजिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 10 टक्कयांपेक्षा अधिक असणार आहे, त्याठिकाणी कार्यालयीन वेळेत बदल करावा जेणेकरून एकाच वेळी सर्व कर्मचारी कामावर जाणार नसून त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देऊन पॉसिटीव्ह व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या 80 टक्के व्यक्तीचा 72 तासात शोध घ्यावा. या आणि अशा विविध मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे दिवाळीपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा त्यावेळी घेतला होता. त्यांनी त्यावेळी ज्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यांच्या चाचण्या तात्काळ करून घेण्यावर भर देण्याची गरज आहे.


सध्याच्या घडीला लॉकडाउन कुणालाच नको हवा आहे. मात्र, नागरिकांना सुरक्षित आरोग्य हवे आहे. त्याकरिता आता नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नियमांचे पालन एखादा नागरिक करत नसेल तर नागरिकांनीच त्याची तक्रार प्रशासनाला करावी. कारण आता नाहक आजारी परवडणे कुणालाच झेपणारे नाही. नियमांचा आदर करत कोरोनाच्या संकटावर मात करण्याची हीच ती वेळ, त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग नागरिकांना लागू नये ही फक्त शासनाची जबाबदारी नसून त्यात जनसहभाग महत्त्वाचा आहे. लोकांनी जर प्रशासनाला साथ दिली तर कोरोनाची साथ राज्यातील नागरिकाचे काहीच करू शकणार नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून कोरोनाचा मुकाबला केल्यास आरोग्यदायी महाराष्ट्र होण्यास फार वेळ लागणार नाही.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग