एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
या ब्लॉगचा उद्देश फक्त चायनीज गाड्यांची सुरुवात आणि वाढ कशी झाली हे सांगायचाही नाही. तर ते वापरतात ते साहित्य कसं आणि कुठून येतं हे सांगणं हाही आहे.
चायनीज लोकांच्या खाण्याबद्दल जगात प्रसिद्ध असलेली दोन वाक्य पूर्वी कधीतरी ऐकली होती. ती म्हणजे, ”चायनीज लोक जगात टेबल सोडून चार पाय असलेले काही खाऊ शकतात,” आणि “विमान सोडून आकाशात उडणारे काहीही खाऊ शकतात,”.
रस्त्यावर विनापरवाना हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणे आणि खाणे आपल्याकडे नवीन नाही. भारतीय मार्केटमधे इम्पोर्टेड फॅन्सी चायनीज वस्तूंचे आक्रमण व्हायच्या थोडे आधीच भारतातल्या रस्त्यावरच्या हातगाड्यांवर चायनीज आक्रमण झालं. माझ्या आठवणीप्रमाणे वडापाव, भज्या आणि अंडाभुर्जीपर्यंत मर्यादित असलेल्या हातगाड्यांवर 90 च्या दशकाच्या शेवटी ‘चायनीज’ची लाट आली. तेव्हापासून ठिकठिकाणांच्या स्थानिक राजकीय आश्रयावर गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या एकूणएक शहरात,गावातल्या गल्लीबोळात या चायनीजच्या हातगाड्या राजरोस सुरु आहेत.
एखादा लोकल लेव्हलच्या पुढारी, भाईबरोबर सेटिंग करुन एखादी हातगाडी भाड्याने घेतली की चायनीज गाडीच्या ‘बिझनेस’ची पहिली पायरी यशस्वी. बरं चायनीज खाणं बनवायला मुळातच जागा, सामुग्री आणि पर्यायाने भांडवल कमी लागतं. त्यामुळे एखादी मोठी, एक छोटी कढई, तवा, 1-2 लहानमोठे झारे, खाणं वाढायला शंभरेक रुपयात डझनावारी मिळणाऱ्या कचकड्या प्लॅस्टीकच्या डिशेस, चमचे, गिऱ्हाईकांना बसायला लालपिवळ्या, हिरव्या रंगाची अर्धा डझन प्लॅस्टीकची स्टूल घेतली की संपली चायनीज गाडीची खरेदी. गाडीवर रात्रीचे काम करायला कायमचे पार्टटाईम काम पाहिजे असलेली 2-3 नेपाळी पोरं सहज मिळतात.अजून काय पाहिजे? होतो लगेच चायनीज गाडीचा स्टार्टअप सुरु!
जवळपासच्या एरियात बऱ्यापैकी फेमस असलेल्या अंडाभुर्जीच्या किमतीपेक्षा जरा जास्ती किंमतीत दुप्पट ‘चिकन घालून फ्राईड राईस’,मंचुरियन दिले की हॉस्टेलची, स्वस्त रुम घेऊन राहणारी मुलं, महिना अखेरीला कडकी असणारे बॅचलर्स, रात्री उशिरा पार्टी संपवल्यावर कुठल्याच हॉटेलात जागा न मिळालेले लोक क्षुधाशांतीसाठी शेवटी अशा चायनीज गाडीवरच थांबतात. चायनीजचा धंदा जोरदार चालायला लागतो.
पण या ब्लॉगचा उद्देश फक्त चायनीज गाड्यांची सुरुवात आणि वाढ कशी झाली हे सांगायचाही नाही. तर ते वापरतात ते साहित्य कसं आणि कुठून येतं हे सांगणं हाही आहे. चायनीज गाड्यांचं मुख्य रॉ मटेरियलपैकी पहिले म्हणजे तांदूळ. स्वस्तात कणी, तुकडा तांदूळ देणारी अनेक दुकानं आपल्याकडे रग्गड आहेत. पण चायनीज गाड्यांना लागणारा राईस हा तांदुळाच्या मार्केटमधे सर्वात निकृष्ट दर्जाचा मानला जातो. पाहिजे तर धान्याच्या मार्केट एखाद्या जाणकाराला विचारुन घ्या. पण चायनीज गाड्यावाले बहुसंख्य लोक या दुकानातूनही तांदूळ घेत नाहीत. तर गरिबांच्या सोयीसाठी सरकारने सुरु केलेल्या रेशनच्या दुकानातून घेतात. सगळीच रेशनची दुकानं हा खोटा धंदा करतात हे मी कधीच म्हणणार नाही पण काही रेशनची दुकानं ह्याच कामामधली स्पेशालिस्ट असतात. गरजू लोकांना रेशनकार्डावर तांदूळ न देता, हे दुकानदार रेशनचा तांदूळ ह्या चायनीज गाड्यांना घाऊक प्रमाणात विकतात. रेशनच्या धान्याला मिळणाऱ्या कमिशनपेक्षा तिप्पट-चौपट किमतीत तांदूळ विकला जातो. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, तर बाजारात मिळणाऱ्या तांदुळाच्या पाव किमतीत त्याची खरेदी होते.
चायनीजच्या गाड्यांवर चिकन पुरवणारी लोकं तर फुल्लटाईम फक्त हाच व्यवसाय करतात. आपल्याकडे चांगलं चिकन विकणारी दुकानं, चिकन वजन केल्यानंतर साफ केलेले चिकनचे स्कीनसारखे भाग टेबलाच्या खाली एकत्र करतात. पुन्हा सांगतो, सगळेच दुकानदार नाही पण काही चिकन विकणारे मात्र हे साफ केलेले चिकन चायनीज गाड्यांच्या चिकन सप्लायर्सना जसे आहे तसे 10-15 रुपये किलोच्या भावानी विकतात. चायनीज गाड्यांचे सप्लायर्स हे चिकन विकत घेऊन, ते आपल्या जागी एकत्र करतात. ती जागा अर्थातच एखाद्या सर्वोच्च दर्जाच्या गलिच्छ वस्तीतच असते. तिथे हे चिकन एखाद्या मोठ्या ड्रममधे गरम पाण्यात टाकून त्यातली गरम पाण्यात वर आलेली पिसं वेगळी काढून फेकली जातात. बाकी चिकन एखाद्या काठीने एकजीव करून त्याचे मोठे गोळे केले जातात. हे चिकन चायनीजच्या गाडीवर पोचतं तेव्हा त्याची किंमत किलोला 50-60 रुपये म्हणजे दुकानाच्या फक्त पावपट होते. एकूण खर्च वजा जाता चिकनच्या सप्लायरचा फायदा किलोमागे कमीतकमी 30-40 रुपये असा फायदा जो चिकन ब्रीडिंग करुन 30-60 दिवस त्याची काळजी घेणाऱ्या कुठल्याही पोल्ट्रीवाल्यालाही लाजवेल असा असतो, तोही फक्त एक-दोन दिवसात.
हेच चिकन गाड्यांवर चिकन मंचुरियन, क्लियर सूप करता सर्रास वापरले जातं. आता चिकनच्या चांगल्या दुकानात कुठल्याही सिझनला किलोला 200 रुपये असणारे चिकन पावपट किमतीत मिळालं आणि 10-15 रुपयात किलोभर तांदूळ मिळाले की चायनीजवाल्यांचा फायदा किती पटींनी वाढतो हे वेगळ सांगायला पाहिजे?
चायनीज जेवण बनवणाऱ्याचे नीट निरीक्षण केलंत तर लक्षात येईल, चायनीज कितीही कमी बनवायचं असेल तरी ते बनवताना कढई/पातेली कायम खूप मोठी घेतलेली असतात. त्याबरोबरच त्याखाली असलेली शेगडीची धग कायम मोठी ठेवली जाते. पदार्थ बनवताना त्यावर सोया, अजिनोमोटो सारखे चटपटीत सॉसेस मुबलक ओतल्यावर पदार्थांच्या आतल्या सामुग्रीच्या क्वालिटीचा थांगपत्ता अगदी भल्याभल्या खवैय्या लोकांनाही लागणे मुश्कील असते. असे फक्त टाकूनच देण्याच्या लायकीचे आतून निबर झालेले चिकन वारंवार खाऊन अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. त्या आजारात आत्तापर्यंत कितीजण दगावले असतील त्याची कल्पनाच न केलेली बरी.
एकीकडे चांगल्या दर्जाचे चिकन, तांदूळ आणून पदार्थांचा दर्जा सांभाळणाऱ्या आणि सरकारी नियमात राहून इमानदारीत व्यवसाय करणाऱ्या एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये ज्या किंमतीत एक प्लेट चायनीज मिळत, तीच डिश असे निकृष्ट चिकन, तांदूळ वापरणाऱ्या गाडीवर त्यांच्या पावपट किमतीत विकूनही कुठलेही ओव्हरहेड नसलेले चायनीज जॉईंट कितीतरी फायदेशीर ठरतात.
एक उद्योजक असल्याने कुठल्याही व्यवसायाचा विशेषतः खाण्यासंदर्भातल्या व्यवसायाचा सहज म्हणून लेखाजोखा काढणे, शक्य असेल तेवढा त्या उद्योगाचा अभ्यास करणे हा माझ्या आनंदाचा भाग असतो. पण काहीवेळा असे काही व्यवसायांचे केलेले अभ्यास मनाला त्रास देत राहतात.
खरतर फूड ब्लॉगरनी निरनिराळ्या हॉटेलात जावं, जमेल तेव्हा, जमेल तेवढं फुकटात खावं आणि त्यांच्याबद्दल रसभरीत वर्णन करावं, येवढंच आपल्याकडे सामान्य वाचकांना अपेक्षित असतं. त्यातून असे खुपणारे विषय घेऊन लेखन करायची पद्धत तर आपल्याकडे बिलकुलच नाही. पण आजूबाजूला असे गैरप्रकार घडत असताना आपण फक्त आपल्या आवडीच्या पदार्थांचे, ठिकाणांचे आणि त्यामागच्या माणसांचे वर्णन करायचं, ये बात भी कुछ हजम नही होती भैय्या !
खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग :
वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
क्राईम
Advertisement