एक्स्प्लोर
"शाकाहार Vs मांसाहार : काही दुर्लक्षित, काही अचर्चित मुद्दे"
शाकाहारी घरात सून म्हणून आलेल्या मांसाहारी मुलींची दुखणी तर वरील सर्व प्रकारच्या शाकाहारी-मांसाहारी व्यक्तींच्या दुखण्यांहून मोठी असावीत,असतात. त्यांचं आहारस्वातंत्र्य हे त्यांना मिळालेलं शाकाहारी सासर कधीच स्वीकारत नाही. त्यांना मांसाहार करण्याची मुभा दिली जात नाही. आयुष्यभर तिच्या आहारविषयक इच्छा, आवडी दडपून ठेवाव्या लागतात.

शनिवार दिनांक ३० जून रोजी नागपूरहून संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) शारजाला 2000 बोकडांची विमानानं निर्यात केली जाणार होती. पण जैन समाजाच्या विरोधामुळे ती होऊ शकली नाही. या घटनेच्या अनुषंगानेच शाकाहार विरुद्ध मांसाहार असा शाब्दिक कलगीतुरा मागचे काही दिवस सोशल मीडियावर रंगलेला दिसून आला. कुणी मांसाहाराचे समर्थन केले तर कुणी शाकाहार म्हणजेच सर्वोत्तम आहार असा डंका पिटला. तूर्तास आपण शाकाहार श्रेष्ठ आणि मांसाहार कनिष्ठ किंवा शाकाहार कनिष्ठ आणि मांसाहार श्रेष्ठ किंवा प्राणी मारुन खाणे म्हणजे हिंसा या कोणत्याच वादात पडायला नको. आचार-विचार-पोषाख-अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबतच इथे प्रत्येकाला आहारस्वातंत्र्य आहे. शाकाहार-मांसाहार या वादात कुणाच्याही खिजगणतीत नसणाऱ्या पण काही महत्त्वाच्या पण अचर्चित मुद्द्यांवर चर्चा करुया.
काही घरांमध्ये सगळे शाकाहारी सदस्य असतात तर काही घरांमध्ये सगळेच मांसाहारी. कुणाच्या आहाराचा कुणाला त्रास होण्याचा प्रश्न अशा संपूर्ण शाकाहार अथवा संपूर्ण मांसाहार स्वीकारलेल्या घरांमध्ये येत नाही. हा प्रश्न येतो तो काही मांसाहारी आणि काही शाकाहारी सदस्य असणाऱ्या घरांमध्ये.
पहिल्यांदा आपण ज्या घरात मांसाहारी पुरुष आणि शाकाहारी स्त्रिया असतात अशा स्त्रियांच्या दुर्लक्षित प्रश्नांचा आणि दैनंदिन दुखण्यांचा विचार करुया. कारण आजही आपल्याकडे नोकरी करत असल्या, महिन्याकाठी घरातील पुरुषाइतकाच पगार मिळवत असल्या तरी स्वयंपाक स्त्रियाच बनवतात, भांडीही स्त्रियाच घासतात. प्रत्येक घरांमध्ये काही स्वयंपाक करायला अथवा भांडी घासायला बाई असत नाही. कधीच मांसाहार न केलेल्या, सुरुवातीला मांसाहार केला परंतु काही कारणांनी नंतर शाकाहार स्वीकारला अशा स्त्रियांना घरातील मांसाहारी पुरुषांसाठी मांस, मटन, मच्छी बनवावे लागते. कधी त्या नाईलाज म्हणून बनवायला शिकलेल्या असतात तर कधी "आपल्या माणसांना त्यांचे आवडते पदार्थ करुन खाऊ घालणं हे आपलं परमकर्तव्य आहे." या प्रामाणिक भावनेपोटी शिकलेल्या असतात. बऱ्याचशा स्त्रियांना मांसाहारी पदार्थ नजरेसमोरही नको वाटतात परंतु त्या असे पदार्थ बनवायला अथवा भांडी घासायला मनात असूनही नकार देऊ शकत नाहीत. गळ्यात तुळशीची माळ असणाऱ्या स्त्रियासुद्धा कुठलीही तक्रार न करता मन लावून ज्या तन्मयतेने शाकाहारी पदार्थ बनवतात अगदी त्याच तन्मयतेने मांसाहारी पदार्थही बनवतात. यात स्वेच्छेचा भाग कमी आणि नाईलाजाचच भाग अधिक असू शकतो. पण लक्षात कोण घेतो?
शाकाहार-मांसाहार प्रकरणात सर्वात जास्त कोंडी जर कुणाची होत असेल तर ती म्हणजे लग्न करुन बरेचसे सदस्य मांसाहारी असणाऱ्या घरांमध्ये जाणाऱ्या शाकाहारी मुलींची. मांसाहारी माणसांच्या पंक्तीला बसूनही न जेवणाऱ्या, मांसाहारासाठी वेगळी भांडी असावी असा विचार करणाऱ्या, माहेरी तसा आग्रह धरलेल्या मुलींना जेव्हा मटनाच्या ताटाशेजारी ताट ठेऊन जेवावं लागतं, मटनाची भांडी घासावी लागतात तेव्हा त्यांनी सहनशक्तीची कमाल मर्यादा गाठलेली असते. परंतु ही गोष्ट मांसाहारी लोकांच्या खिजगणतीतही नसते उलट "त्यात काय एवढं हे तर स्त्रियांचं हे कर्तव्यच आहे" तंतोतंत असेच भाव मांसाहारी लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसून येतात. अशा मुलींच्या या कोंडीचा विचार इतर कुणाच्या मनाला शिवण्याची शक्यता दूरदूरपर्यंत असत नाही. यात काही खटकण्यासारखं आहे असं कुणालाही विशेषतः मांसाहारी लोकांना वाटत नाही. आपल्यावर उद्धटपणाचा कायमस्वरुपी शिक्का बसेल या भीतीपोटी त्या खटकणाऱ्या उदा. मांसाहारी पदार्थ बनवायला शिकणे, सातत्याने बनवत राहणे, भांडी घासणे अशा कोणत्याच गोष्टींना शक्यतो नकार देत नाहीत. मन घट्ट करुन नावडत्या गोष्टींना कर्तव्याच्या कोंदणात बसवून त्या आनंदाने सगळं करत राहतात. पण खरंच त्यांना मनापासून हे काम आवडतंय का? की त्यांनी नाईलाजाने स्वीकारलं आहे असा विचार कुणीच करताना दिसत नाही.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसाय म्हणून भांडी घासण्याचं काम स्वीकारलेल्या स्त्रियांविषयीचा. घरोघरी भांडी घासणाऱ्या सगळ्याच स्त्रिया मांसाहारी असतील असं नाही. "आमच्या घरात मांसाहारी पदार्थ बनवले आणि खाल्ले जातात. तुम्ही शाकाहारी आहात तर तुम्हांला मांस शिजवलेली, खाल्लेली भांडी घासायला चालणार आहे का?" असा मानवतावादी, व्यक्तीस्वातंत्र्याचा गौरव केला जाणारा प्रश्न भांडी घासायला बाई ठेवताना संबंधितांकडून विचारला जात असेल का? किंवा शाकाहारी असूनही मांसाहाराची भांडी घासता म्हणून संबंधित स्त्रिला चार पैसे अधिक दिले जात असतील का? तर या प्रश्नाचं उत्तर "नाही" असंच असावं. ही फारच आदर्श कल्पना आणि विचार आहे. आणि ती अमलात आणण्याच्या साध्या शक्यतेचाही विचार मांसाहारी लोकांना हास्यास्पद वाटू शकतो.
अशी फार दुर्मिळ घरं असतील आणि अशा बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती असतील की जे घरातील शाकाहारी बायकांना मांसाहारी पदार्थ बनवण्याची सक्ती न करता स्वतः बनवतात, मांसाहारी पदार्थ बनवलेली व जेवलेली भांडी स्वतः स्वच्छ करतात. किंवा मग हॉटेलमध्ये जाऊन आपली मांसाहारी पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करतात. ज्या घरांमध्ये शाकाहारी पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये शिजवले जातात, वाढले जातात, ज्याचा घरातील इतर शाकाहारी व्यक्तींना शून्य टक्के ही त्रास होऊ दिला जात नाही अशी घरं आहारस्वातंत्र्यासोबतच व्यक्तीस्वातंत्र्याची आदर्श मॉडेल्स वाटतात.
शाकाहारी स्त्रियांची जशी काही दुखणी आहेत मग तशी मांसाहारी पुरुषांची असतील काय? तर नक्कीच असतील. पिढ्यानपिढ्या शाकाहारी असलेल्या, मांसाहारी पदार्थालाच नव्हे तर मांसाहार करुन आलेल्या व्यक्तीलाही घरात घेतले न जाणाऱ्या अशा घरातील एखादी व्यक्ती मित्रांच्या संगतीने मांसाहार करायला शिकलेली असते. परंतु त्याच्या मांसाहारी होण्याचे अशा शुद्ध शाकाहारी घरातून स्वागत होईलच असे नाही. त्याच्या मांसाहाराचा निषेध केला जाऊन घरात मांसाहार शिजवायला अथवा बाहेरुन आणून खायलाही मज्जाव केला जातो. त्याची आहारिक कुचंबना केली जाते. आजघडीलाही अशा काही, शाकाहारी घरांमध्ये मांसाहार करुन आलेल्या व्यक्तीला आंघोळ करुन आल्याशिवाय घरात घेतले जात नाही. ही अतिशयोक्ती वाटली तरी हे वास्तव आहे. शाकाहारी व्यक्तींच्या दुखण्याइतकेच अशा मांसाहारी व्यक्तीचे दुखणे विचार होण्यासारखे आहे.
शाकाहारी घरात सून म्हणून आलेल्या मांसाहारी मुलींची दुखणी तर वरील सर्व प्रकारच्या शाकाहारी-मांसाहारी व्यक्तींच्या दुखण्यांहून मोठी असावीत,असतात. त्यांचं आहारस्वातंत्र्य हे त्यांना मिळालेलं शाकाहारी सासर कधीच स्वीकारत नाही. त्यांना मांसाहार करण्याची मुभा दिली जात नाही. आयुष्यभर तिच्या आहारविषयक इच्छा, आवडी दडपून ठेवाव्या लागतात. हळूहळू अशा मांसाहारी मुली वैतागून संपूर्ण शाकाहारी झाल्याची उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. पण शाकाहारी घरांत मांसाहारी जावई आला तर मात्र त्याच्या सगळ्या खाण्यापिण्याची काळजीपूर्वक बडदास्त ठेवली जाते. हा आपल्या समाजातील प्रचंड मोठा विरोधाभास आहे. असो.
शेवटी इतकंच की शाकाहारी व्यक्तींच्या समूहात राहताना बऱ्याचदा मांसाहारींची कुचंबना होते ती होऊ नये आणि मांसाहारी व्यक्तींच्या समूहात राहताना शाकाहारींची जी घुसमट होते ती होऊ नये हा विचार करुन प्रत्येकला आपापल्या आहारावर नियंत्रण आणता यायला हवे. "कोणताही आहार घेत असताना आपल्यासोबतच्या, आपल्या घरातील किंवा आपल्या संबंधित इतर कोणत्याही माणसांना त्याचा त्रास होऊ न देणं हे प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे." शेवटी ज्यांना जे खायचं ते त्यांनी खुशाल खावं. जशी प्रत्येकाला आपल्या आहारस्वातंत्र्याची कुचंबना होऊ नये असे वाटते तसेच आपल्या आहारस्वातंत्र्यामुळेही कुणाची कुचंबना होऊ नये याचादेखील विचार प्रत्येकाने करणे जरुरीचे आहे. बाकी ज्याचा त्याचा आहार ज्याला त्याला लखलाभ.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
