एक्स्प्लोर
Advertisement
BLOG : मग तुम्ही खुशाल करा उत्सव साजरे.!
देवीचा जागर मांडणाऱ्या या देशात भीती वाटतेय बाई म्हणून जगताना. घरापासून शाळेपर्यंत किंवा कुठल्याही चौकात, पेठेत आणि मंदिरात एवढंच नाही तर आईच्या गर्भातही आम्हाला सुरक्षित वाटत नाही. डोईवर भीतीची कायम टांगती तलवार असते. समोर दिसणारा प्रत्येक पुरुष आमच्या संशयाच्या भोवऱ्यात असतो. कुणी स्वच्छ मनाने मदत करू धजले तरी आम्ही ती घ्यावीशी वाटत नाही.
तुम्ही देवी माँ, तुम्ही गौरी, तुम्ही दुर्गा, तुम्ही महाकाली,तुम्ही आदिमाया, तुम्ही तुळजाभवानी, तुम्ही महालक्ष्मी, तुम्ही रेणूका, तुम्ही ह्यांव, तुम्ही त्यांव, तुम्ही अमक्या, तुम्ही तमक्या, तुम्ही ढमक्या. ब्लाsssब्लाsssब्लाsssब्ला.
पणsssपणsssपणsss,
आमच्या नजरेनंच तुम्ही जग बघायचं.
आमच्या कानानंच तुम्ही ऐकायचं
आमच्या तोंडानंच तुम्ही बोलायचं.
आम्ही म्हणू तेच कपडे अंगावर घालायचे.
आम्ही बस म्हटलं की बसायचं.
आम्ही ऊठ म्हटलं की उठायचं.
आम्ही रांध म्हटलं की रांधायचं.
आम्ही वाढ म्हटलं की वाढायचं.
आम्ही म्हणू तिथवरच आणि म्हणू तेच शिकायचं.
आम्ही म्हणू तेच लिहायचं- वाचायचं.
आम्ही म्हणू तेव्हा आणि म्हणू त्याच मुलाच्या गळ्यात विनातक्रार माळ घालायची.
आम्ही म्हणू तितकी(तीच)मुलं पैदा करायची.
आम्ही 'अरे' म्हटले तरी तुम्ही 'कारे' म्हणायचं नाही.
आम्ही जगू दिलं तसंच जगायचं, आम्ही मारू तेव्हा गपगूमान मरून जायचं.
वगैरे वगैरे वगैरे.... ही यादी अशीच वाढत जाणारी आहे. सूज्ञ वाचकांनी ती आपापल्या मनात तयार करावी. अज्ञजनांनी डोकं खाजवीत बसले तरी काही हरकत नाही. तर असो.
स्कुटरच्या हँडलवरचे मुलींचे हात विमानाच्या ब्रेकवर गेले. मुली घर चालवता चालवता देश चालवू लागल्या. शाळेतल्या स्पर्धा जिंकत जिंकत ऑलंपिक गाजवू लागल्या. क्रिकेटची मैदानं दुमदुमून सोडू लागल्या. प्रयोगशाळेपासून ते व्यायामशाळेपर्यंत आपलं शारीरिक, बौद्धिक कसब पणाला लावू लागल्या. पोलिस दलापासून हवाई दलापर्यंत मुली आपली ठळक मोहोर उमटवू लागल्या. मुली स्वप्नांचे पंख लेऊन ध्येयाच्या आभाळावर स्वार झाल्या. मुलींनी कात टाकून जमाना उलटून गेलाय, पण मुलीला गुलाम आणि दुय्यम समजणाऱ्या, तिला स्वतःच्या तालावर नाचवणाऱ्या, तिच्या स्वतंत्र असण्यावर, वागण्यावर बंधने घालणाऱ्या किडक्या,कुजक्या आणि नासक्या लोकांच्या मानसिकतेत मुलींच्या पायधुळीच्या एका मायक्रो कणाइतकाही फरक पडलेला नाही, हे प्रचंड व्यथित होऊन म्हणावे लागत आहे.
इतके टोकदार शब्द वापरून संताप व्यक्त करण्याची कारणं ही तशीच आहेत. कान, डोळे कितीही गच्च दाबून धरले तरी वर्तमानपत्रातून, न्यूज चॕनल्सवरून, सोशलमीडियावरून मुलींच्या बाबतीतल्या काही अमानवी गोष्टी सेकंदासेकदांला डोकं फुटून जाईल इतक्या वेगात डोक्यावर आदळतात. छेडछाड, शिवीगाळ, असिड हल्ले, अत्याचार, बलात्कार, हुंडाबळी, मुलगी आहे म्हणून गर्भपात, अमानुष लैंगिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या, जबरदस्तीने लग्न, ऑनरकिलिंग, वेश्याव्यवसायासाठी विक्री किती आणि काय काय कारणांनी संतापून जावं! काही महिन्यांच्या निष्पाप बालिकेपासून दुर्बल वृद्धेपर्यंत प्रत्येक बाईला वरीलपैकी कुठल्या ना कुठल्या अत्याचाराला सामोरं जावंच लागतं. स्त्रीला देवीसमान मानून पूजा करणाऱ्या तथाकथित उच्चसंस्कृतीधारक देशातले हे गलिच्छ चित्र आहे.
उदाहरणादाखल कालच वाचण्यात आलेल्या तीन बातम्यांचा उल्लेख करावा लागेल.( होय बातमीच म्हणते कारण संबंधित घटना माध्यमासाठी व आपल्यासाठी केवळ एक बातमी असते.आजची बातमी उद्या शिळी होते. ती कुणाच्या खिजगिणतीतही राहत नाही.) पहिली बातमी होती तेलंगणातल्या नालगोंडा जिल्ह्यातली. सातवीत शिकणारी मुलगी एका मुलासोबत बोलली म्हणून तिच्या जन्मदात्यानेच भिंतीवर डोके आपटून निर्दयीपणे तिची हत्या केली. तिला जाळून टाकले आणि वरून तिने स्वतःच आत्महत्या केली असा बनाव रचला. दुसरी बातमी होती पुन्हा तेलंगणामधलीच.
देशातील गरीब घरातील मुलींना आखाती देशातील वासनांध शेखांना विकून दलाल आपल्या तुंबड्या भरत असल्याची. आणि तिसरी बातमी आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील. एक सेवानिवृत्त एस.टी.चालक मागील चार वर्षापासून आपल्या सज्ञान मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे उघड झाल्याची. धक्कादायक हा शब्दही वांझोटा आहे या सगळ्या घटनांसाठी. या केवळ प्रतिनिधिक घटना आहेत.अशा हजारो घटना आपल्या देशात राजरोजपणे घडतात. आपण वाचतो. हळहळतो आणि विसरूनही जातो. कारण समाजाची स्मरणशक्ती फारच तात्कालिक असते.
कालपासून नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. असं एकही गाव, शहर नाही की जिथं एखाद्या देवीचं मंदिर नसेल. आपली भारतीय संस्कृती देवीमातेची तनमनधन अर्पूण मनोभावे पूजा करण्याची शिकवण देते. आपणही ती शिकवण तंतोतंत अंमलात आणतो. घरातील, बाहेरील सगळ्या स्त्रियांना देवीच्या जागी मानण्याची, त्यांचा आदर सत्कार करण्याचीही शिकवण आपली भारतीय संस्कृती देते. ही शिकवण तुम्ही आम्ही कितीजण वर्तनात आणतो? आपण मातीपासून बनवलेल्या देवीच्या पायावर डोके टेकवून नतमस्तक होतो आणि जिवंत देवीच्या नि-यांना, पदराला हात घालतो. आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देतो. निर्जीव मूर्तीचा उत्सव साजरा करणारे पण सजीव देवीचा लैंगिक, मानसिक छळ मांडणारे तिच्या बाई असण्याचा अवमान करणारे तमाम पुरुष कलियुगातले कौरव आहेत.
असा एकही दिवस जात नाही की ज्यादिवशी एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत नाही, खून होत नाही, छेडछाड होत नाही. ज्या देशात स्त्रीवर असे अमानुष अत्याचार होतात त्या देशाला कुठलाच अधिकार नाही नवरात्रीसारखे सणउत्सव साजरे करण्याचा. हा तर निव्वळ " वरुन कीर्तन आतून तमाशा आहे." रामरहीम, रामलाल, आसारामसारख्या हायप्रोफाईल बाबाबुवांची कृत्ये उशीरा का होईना उजेडात आली.पण रस्त्यारस्त्यावरचे, घराघरातले रामरहिम, आसाराम उजेडात येतीलच असे नाही. ते कपाळाला टिळा लावून देवाधर्माची भजनं गातात पण तिन्हीत्रिकाळ एक वखवखलेला नराधम जागा असतो त्यांच्या आत.
देवीचा जागर मांडणाऱ्या या देशात भीती वाटतेय बाई म्हणून जगताना. घरापासून शाळेपर्यंत किंवा कुठल्याही चौकात, पेठेत आणि मंदिरात एवढंच नाही तर आईच्या गर्भातही आम्हाला सुरक्षित वाटत नाही. डोईवर भीतीची कायम टांगती तलवार असते. समोर दिसणारा प्रत्येक पुरुष आमच्या संशयाच्या भोवऱ्यात असतो. कुणी स्वच्छ मनाने मदत करू धजले तरी आम्ही ती घ्यावीशी वाटत नाही.
मी आणि माझ्यासारख्या तमाम स्त्रीया वाट पाहतोय अशा दिवसाची ज्या दिवशी स्त्रीअत्याचारावरची एकही बातमी वर्तमानपत्रात छापली जाणार नाही, न्यूज चॅनेलवरून प्रक्षेपित केली जाणार नाही. आईबहिणीवरून शिव्यांची लाखोली वाहणं बंद होईल. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात स्त्रीला कुठल्याच कारणाने नागवले जाणार नाही. तिला हवं ते ती नेसेल, हवं ते वाचेल, हवं ते लिहिल, हवं त्याच्याशी बोलेल, हवं त्याच्याशी लग्न करेल. हव्या त्या रंगात रंगून जाईल. मुक्तपणे, स्वतंत्रपणे.
मग त्या दिवशी तुम्ही खुशाल साजरे करा नवरात्रीसारखे उत्सव. खुशाल मांडा देवीच्या नावाचा जागर.
तेव्हा आमचा काहीच आक्षेप नसेल.
(ब्लॉगमध्ये व्यक्त झालेली मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत.)
kavitananaware3112@gmail.com
कविता ननवरे यांचे आधीचे ब्लॉग
खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल
BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement